बहुजन समाजाच्या जागृतीची पहाट उगवीन्याच्या १०० वर्षापूर्वी या जागृतीचे जे अग्रदुत समाजात प्रगट झाले त्यात कार्य कर्तूत्वाने मोठी झालेली, समाजाला आदरणीय झालेले जे लोक होतें त्यात डॉ संतुजी रामजी लाड हे अग्रगण्य व्यक्तिमत्व होते.
राजा राममोहन रॉय यांच्यापासुन या नव्या प्रकारच्या महान संताची परंपरा सुरु झाली. त्यात महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, डॉ भांडारकर, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, हरी पिराजी धायगुडे आदी समाजसुधारक याच थोर परंपरेचे होतें. त्याच्या सोबत डॉ संतुजी रामजी लाड यांनी मोलाचे समाजकार्य केले. डॉ संतुजी रामजी लाड हे अत्यंत उदार अंःकरणाची व नवविचाराच्या तेजाने भारलेली व्यक्ती होती. अशा या महामानवाचे मूळ गाव पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यातील चऱ्होली असुन त्यांचे पंजोबा केरुजी, आजोबा बचाजी हे तेथेच पिढी जात खाटीक जातीचा लहान प्राण्यांच्या मांस विक्रीचा व खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. आजोबा बचाजी साधारण इ स १८०० पूर्वी काही वर्ष आगोदर व्यवसायानिमित्त ठाणे येथे स्थायिक झाले. येथेच डॉ संतुजी लाड यांचे वडील रामजी यांचा जन्म झाला पुढे रामजीचा विवाह पुणे जिल्हयातील चऱ्होली येथील जांभळे घराण्यातील लक्ष्मीबाई यांच्याशी झाला या दाम्पत्या पोटी संतुजी यांचा जन्म इ.स. ४ मार्च १८४१ मध्ये खाटीक-कुटुंबात जन्मलेल्या संतुजी लाड यांनी ठाण्याच्या मिशनरी शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण मुंबईतील मावस बहीण राजुबाई भागोजिराव खराटे यांच्या कडे राहून केलें तर डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व एक निष्णात डॉक्टर बनले. डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचा ‘सत्यशोधक समाज’ आणि ‘भारतीय निराश्रित साहयकारी मंडळ’ यांच्याशी आलेला संबंध व त्या माध्यमांतून डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर समाजसेवक व सत्यशोधक समाजाचे नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोलाचे समाजकार्य केले आहे. डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या समाजकार्य,जीवनकार्यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.
डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या जीवनावर कायम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव राहिला. २४ सप्टेंबर १८७३ बहुजन समाजात स्वाभिमानाचे लोण पोहचवणाऱ्या, वर्षानुवर्ष चालत आलेल्या सामाजिक, धार्मिक गुलामगरीतून त्यांची मुक्तता करणाऱ्या सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली.त्याच विचारांमुळे डॉ. संतुजी लाड सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले आणि पुढे सत्यशोधक समाजाचे एक आघाडीचे नेते बनले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे त्यांना वडीला प्रमाणे मान देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवती भोवती जसे तानाजी -बाजी -नेताजी तसेच ज्योतीबांचे कार्यात लाड – लोखंडे- शिंदे आदी होतें असा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रकारानी करून ठेवला आहे. सत्यशोधक समाजाच्या इ.स. १८८५ च्या ठाणे येथील वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. छत्रपती शाहु महाराज हे धार्मीक वृत्तीचे होते. इ स १८९९ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात नेहमीच्या रीती,रिवाजानुसार शाहु महाराज पंचगंगेवर कार्तिकी स्नानासाठी गेले होते. त्यांच्या समवेत स्नानासाठी गेलेल्या मंडळीत मुंबईचे प्रख्यात समाजसुधारक व विद्वान ग्रंथकार राजारामशास्त्री भागवत हे ही होते. महाराज स्नान करीत असताना मंत्र म्हणणारा नारायणभट वेदोक्त मंत्र म्हणत नसून पुरोणोक्त मंत्र म्हणत आहे हे राजारामशास्त्री भगवंतांच्या लक्षात आले आणि त्यांनी या वस्तुस्थितीकडे छत्रपतींचे लक्ष वेधले. महाराजांनी त्याबाबत नारायण भटजीकडे विचारणा करताच शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगायचे असतात आणि ते म्हणण्यापूर्वी भटजीने स्वतः आंघोळ केलेली नसली तरी चालते असे तऱ्हेवाईक उत्तर त्याने दिले. नारायनभट सांगतो त्याप्रमाणे आपण शुद्र नसून क्षत्रिय आहोत आणि त्यामुळे आपल्या घरातील धार्मिक विधी व संस्कार पुरोणोक्त मंत्राऐवजी वेदोक्त मंत्र म्हणून व्हावेत असा छत्रपतीनी उपर्युक्त घटनेनंतर साहजिकच आग्रह धरला ज्या भट भिक्षुकांनी गृहसूत्रोक्त पध्दतीने वैदीक मंत्राच्या घोषात शाहु महाराजांच्या कुटुंबातील षोडश संस्कारादी धर्मकृत्य करण्यास नकार दिला, त्यांच्या नेमणूक का रद्द करून वतनेही छत्रपती नी काढून घेतली या एकंदर प्रकरणास वेदोक्त प्रकरण असे म्हणतात. खोट्या जातिभेदाला ब्राह्मण उचलून धरतात, जातिनिष्ठ ब्राह्मणाच्या मतपरिवर्तनाची शक्यता नाही म्हणुन छत्रपतींनी १९१० नंतर सत्यशोधक समाजाबद्दलची तटस्थ वृत्ती सोडली ११ जानेवारी १९११ रोजी श्री परशुराम घोसळवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरला सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. भास्करराव जाधव हे अध्यक्ष, अण्णासाहेब लट्टे उपाध्यक्ष, म. ग. डोंगरे सर्वाधिकारी आणि हरी लक्ष्मण चव्हाण कार्यवाह झाले महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळ पसरली रामय्या वेकय्या अय्यावारु आणि डॉ संतुजी रामजी लाड हे जुने सत्यशोधक पुन्हा उत्साहाने कार्यास लागले. डॉ लाड हे १९०७ ते १९१० या काळात ठाणे नगर पालिकेचे सदस्य होते.
डॉ संतुजी रामजी लाड यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची पहिली परिषद १७ एप्रिल १९११ रोजी घेतली तर नाशिक येथे इ.स.१९१२ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. १९१३ साली ठाणे येथे झालेल्या परिषदेचे स्वागाध्यक्ष ही होतें. महात्मा जोतिबा फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे त्यांनी म्हटले होते. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनाचा खर्च डॉ. संतुजी रामजी लाड यांनी केला होता.
१८७७ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक मुखपत्र त्याकाळी चालविले जात असे. पण काही आर्थिक कारणांनी ते डबघाईला आले. त्यावेळी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राला डॉ संतुजी रामजी लाड यांनी कसलाही गाजा वाजा नकरता हजारो रुपयांची झळ सोसली, छाप खाना काढला त्यावेळी डॉ संतुजी लाड यांनी ४०, ००० रुपयांची आर्थिक मदत करून हे वृत्तपत्र बंद पडू दिले नाही. ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक मुखपत्र पुन्हा नव्याने सुरु झाले, पण त्यासाठीं डॉ. संतुजी रामजी लाड यांना आपली सर्व संचित संपत्ति खर्चावी लागली होती. ‘दीनबंधू’ ने इ.स.१८९६ च्या २३ फेब्रुवारीच्या अंकात डॉ. संतुजी रामजी लाड यांचा ‘प्रथम-भाषणकार’ असा उल्लेख केला होता.
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यांसाठी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळामध्ये डॉ. संतुजी रामजी लाड हे एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. तसेच मंडळाच्या पाच आद्य संस्थापकांपैकी डॉ. संतुजी रामजी लाड हे एक होते. त्या पाच ही संस्थापकांची नावे व पदे पुढीलप्रमाणे ; १. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (सरचिटणीस), २. सर नारायण चंदावरकर (अध्यक्ष), ३. शेठ दामोदरदास सुखडवाला (उपाध्यक्ष), ४. नारायणराव पंडित (खजीनदार) आणि ५. डॉ. संतुजी रामजी लाड (अधीक्षक). भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ अनेक सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम चालवत असे, त्याचाच भाग म्हणून मंडळाने इ.स. २२ नोव्हेंबर १९०६ ते इ.स.१९०८ च्या अखेर पर्यंत परळ येथे एक मोफत दवाखाना चालवला होता. या दवाखान्यात डॉ. संतुजी रामजी लाड स्वतः रोज सकाळी ठाण्याहून स्वखर्चाने येत असत. त्यासाठीचा प्रवासखर्चही ते कधी मंडळाकडून घेत नसत. अस्पृश्तेचे प्रमाण त्या काळात अधिक होते. अस्पृश्य वर्गातील रोग्याला डॉक्टर साधे शिवूनही घेत नसत. पण त्या काळात डॉ. संतुजी रामजी लाड अस्पृश्य रोग्याला स्पर्श करून आस्थेवाईक, अतिशय प्रेमळपणाने त्याची तपासणी करीत असत व उपचार करुन औषधोउपचार करीत असत. डॉ. संतुजी रामजी लाड यांच्या सेवावृत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती. डॉ. संतुजी रामजी लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस.पी.नाशिककर हे ही मंडळाच्या दवाखान्याचे काम पाहत असत. डॉ. संतुजी रामजी लाड केवळ दवाखान्यातच उपचार करत असत असे नव्हते, तर ते आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार देखील करत असत. या वैद्यकीय कार्यांव्यतिरिक्त डॉ. संतुजी रामजी लाड यांनी ठाणे येथे रात्रीची शाळाही चालवली होती.
डॉ. संतुजी रामजी लाड हे दीनदुबळ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. स्वभावाने अतिशय प्रेमळ असणारे डॉ. संतुजी रामजी लाड कोणीही संकटांत सापडला असे कळले की, त्याच्या साहाय्यासाठी धावत असत. आपल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी सार्वजनिक कामासाठी व गोरगरिबांच्या साहाय्यासाठीच केला. १८९३ मध्ये पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी दोन पोरक्या मुलीना आपल्या कडे आणले व त्यांचें पित्याप्रमाणे लालन,पालन करून त्यांचा विवाह ही करून दिला. दुर्दैवाने डॉ संतुजी रामजी लाड यांचा एकुलता एक मुलगा देवाघरी गेला तेव्हा वृध्पकाळात त्यांच्या डोक्यावर जणू कुऱ्हाडच कोसळली पण डॉ संतुजी लाड डगमगले नाहीत. अविचलित अंतकरणाने त्यांनी आपल्या कार्यालाच त्यांचे कुटुंब मानले त्यात सर्वस्व अर्पण केले. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात देखील मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलमध्ये ‘हाऊस-सर्जन’ म्हणून त्यांनी काम केले. प्लेग हॉस्पिटलांत संपर्कात आलेल्या एका मुलाचे त्यांनी स्वतः उत्तम रीतीने संगोपन केले होते. अत्यंत निस्वार्थीपणाने सत्यशोधक समाजाची शेवटपर्यंत सेवा करणाऱ्या डॉ. संतुजी रामजी लाड यांचे कार्य वाखाण्याजोगेच आहे. अशा या थोर समाजसेवकाचे इ.स. १९१६ च्या अखेरीस ८ ऑक्टोबर महिन्यात पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले. ते आयुष्यभर ज्या ध्येयासाठी झटले त्याच कार्यासाठी त्यांनी आपली मालमत्ता मृत्युपत्राद्वारे अर्पण केली खऱ्या अर्थानं आपले तन मन धन ही आपल्या आवडत्या सत्यशोधक समाजासाठी अर्पण केली.
डॉ. संतुजी रामजी लाड याच्या सारख्या एका निस्वार्थी थोर सत्यशोधक् समाजाचे अग्रदूत, हिंदुखाटिक समाजाचे भूषण या महान समाजसेवकाचे कार्य, आपणां सर्वांपर्यंत पोहोचावे एवढीच माफक अपेक्षा...