----- तर प्रकाश आंबेडकर हिरो झाले असते !

लेखक - प्रेमकुमार बोके

     ॲड.प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचे आणि अभ्यासू  नेते आहेत.पक्षाकडे एकही आमदार आणि खासदार नसलेले परंतु वर्षभर मेन स्ट्रीम मीडियामध्ये फ्रंट लाईनवर राहणारे कदाचित ते एकमेव नेते असावे.ज्यांच्याकडे अनेक आमदार, खासदार आहे त्यांनाही मीडियामधे जी स्पेस मिळत नाही तेवढी स्पेस मीडियामध्ये मिळवणारे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एकमेव नेते असावे. प्रकाश आंबेडकर म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण आपल्या भोवती फिरवणारा एक अभ्यासक आणि विचारवंत राजकारणी.परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात हिरो होण्याची चालून आलेली संधी स्वतःच्या हाताने त्यांनी गमावली.महाराष्ट्राच्या लोकांच्या हृदयात त्यांनी चांगली जागा निर्माण केली होती परंतु आता त्या जागेला धक्का बसलेला आहे हेही तेवढेच खरे आहे.अति महत्त्वाकांक्षा आणि आपल्या एवढे राजकीय ज्ञान आणि अभ्यास कोणालाच नाही अशा अविर्भावात ते वागत असल्यामुळे भविष्यात रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्यासारखी त्यांची अवस्था होऊ नये असे आम्हाला वाटते.वस्तुस्थिती समजून न घेता, कार्यकर्त्यांचे,अभ्यासकांचे ऐकून न घेता, स्वतःच्याच मनाने निर्णय घेत असल्यामुळे राजकारणात चांगले यश मिळवण्याची क्षमता असूनही आतापर्यंत त्यांना फारसे यश मिळाले नाही.त्यामुळे यापुढे तरी त्यांनी जनतेचा कानोसा घेऊन निर्णय घेतले तरच राजकारणात त्यांना चांगले दिवस येऊ शकतात.

Prakash Ambedkar would have been a hero     अनेकदा रक्ताच्या वारसांपेक्षा विचारांचे वारस महापुरुषांचा विचार जास्त ताकदीने तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.देशात होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांच्या बाबतीत आजही ते घडत आहे.ॲड.प्रकाश आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे वारस आहे.त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे लोक त्यांचा सन्मान करतात.बाबासाहेबांसोबत रक्ताची नाळ जुळलेली असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोकांना त्यांच्याविषयी आपुलकी आणि आदर आहे.परंतु आपल्या देशात बाबासाहेबांच्या रक्ताच्या वारसांपेक्षा, त्यांच्या विचारांचे वारसदार बाबासाहेबांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात हे सुद्धा एक वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने मीच केवळ बाबासाहेबांचा खरा वारस आहे असे समजू नये.सध्या आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झालेली आहे. असे देशातील बहुतांश लोकांप्रमाणेच प्रकाश आंबेडकरांचे सुद्धा मत आहे. अशावेळी या राजकीय संकटाचा एकजुटीने सामना करण्यासाठी काही राजकीय पक्ष एकत्र येत असतील आणि त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सन्मानाने सहभागी व्हावे अशी ते राजकीय पक्ष आणि पुरोगामी सामाजिक संघटनांची सुद्धा इच्छा असेल तर प्रकाश आंबेडकरांनी फार ताणून धरण्याचे कारण नव्हते असे सर्वसामान्य लोकांना वाटणे काही गैर नाही.

     महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना पक्षाच्या ताकदीनुसार जागा सुद्धा दिल्या होत्या.परंतु नेहमीप्रमाणेच आपल्या मित्र पक्षांना शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवण्याची प्रकाश आंबेडकरांची जी सवय आहे, त्यानुसार या वेळीही त्यांनी तेच केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल लोकांच्या मनात असलेला आदर दिवसेंदिवस कमी होत आहे हे प्रकाश आंबेडकरांना जरी मान्य नसले तरी ती वस्तुस्थिती आहे हे लक्षात घेतले पाहिजे.भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रकाश आंबेडकर हे सातत्याने बोलत असतात.आरएसएस वर ही त्यांची नेहमी टीका सुरू असते. असे असताना त्यांची स्वतःची भूमिका मात्र अनेकदा भाजप आणि आरएसएसला पूरक राहिल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दाखवता येतील. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांना जवळून ओळखणारे जे जाणकार लोक आहेत ते आधीपासूनच खात्रीने सांगत होते की,काहीही झाले तरी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत युती करणार नाही.संविधान आणि लोकशाही वाचविण्याबद्दल जरी ते आपल्या भाषणातून जोरजोरात सांगत असले तरी त्यांना अंतरबाह्य ओळखणाऱ्या लोकांचा त्यांच्याबद्दलचा अभ्यास इतका खात्रीलायक आहे की, ते महाविकास आघाडी सोबत युतीच करणार नाही असे जाणकारांचे मत होते आणि ते सत्यात उतरले आहे.आता लोकांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली असताना सात ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या उमेदवारांचे समर्थन करू अशी सारवासारवीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे.परंतु लोकांना जे समजायचे आहे ते समजून चुकले आहे.प्रकाश आंबेडकरांना अत्यंत जवळून ओळखणारा त्यांचा एक कार्यकर्ता तर असा म्हणाला की, प्रकाश आंबेडकरांना अकोला जिल्हा परिषदेशिवाय दुसऱ्या कशातच रस नाही.पाच वर्ष आपले राजकारण आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित चालले पाहिजे हा विचार करून ते वाटचाल करीत असतात.त्यांच्या या राजकारणाचा भाजपला फायदा होतो यावर मात्र बहुतांश लोकांचे एकमत आहे.

     अनेकदा आपल्या ताकतीपेक्षा अवास्तव जागांची मागणी करून मित्रपक्षांना झुलवत ठेवायचे आणि शेवटी आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला जागा मिळत नाही त्यामुळे आमचा अपमान होतो असे जाहीर करून स्वतःची माणसे उभी करायची हा प्रकाश आंबेडकरांचा फंडा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांवर निर्विवादपणे विश्वास ठेवायला राजकीय पक्ष तर सोडा पण सामान्य माणूस सुद्धा तयार नाही.सामान्य लोकांच्या चर्चेत प्रकाश आंबेडकर हे विश्वासार्ह नेते नाही असे सातत्याने बोलले जाते हे कटू असले तरी सत्य आहे.मध्यंतरीच्या काळात त्यांनी घेतलेल्या काही सामाजिक भूमिकांमुळे त्यांची प्रतिमा चांगली निर्माण झाली होती.महाराष्ट्राच्या सोशल इंजिनिअरिंग मध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.परंतु ते धरसोडीची भूमिका घेत असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे लोकांना कठीण जाते.या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावे व देशाला वाचवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका निभवावी यासाठी इंडिया आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले होते.परंतु प्रकाश आंबेडकरांच्या अटी इतक्या अव्यवहार्य असतात की त्या पूर्ण करणे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य नसते.या अटी सुद्धा ते मुद्दाम निर्माण करतात.जेणेकरून आपली मागणी फेटाळल्या जाईल आणि आपण स्वतंत्रपणे उमेदवार उभे करू शकू व याचा फायदा नेहमीप्रमाणे भाजपाला होईल.जनमानसामध्ये सर्वत्र हीच चर्चा आहे.या निवडणुकीत त्यांना हिरो बनण्याची संधी चालून आली होती आणि याचा फायदा त्यांना विधानसभेत सुद्धा खूप झाला असता. लोकसभेत त्यांचे तीन-चार खासदार व विधानसभेत पंधरा-वीस आमदार सहज गेले असते आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात किंग मेकर बनले असते.देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राज्यात राजकीय हिरो बनण्याची संधी त्यांनी स्वतःहून गमावली याचे दुःख वाटते.

     त्यांचे वागणे जर असेच सुरू राहिले तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि रामदास आठवले सारखी त्यांची अवस्था होईल.पण त्यामुळे चळवळीचे खूप नुकसान होईल.आंबेडकरी चळवळीला कमजोर करण्यासाठी जरी काही लोक इतरांना नावे ठेवत असली तरी आंबेडकरी चळवळ खिळखिळी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेते आणि त्यांच्यातील आपसी मतभेद व अहंकार हीच कारणे जास्त कारणीभूत आहे हे वास्तव आहे.आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेतृत्व जवळपास संपुष्टात आलेले असताना प्रकाश आंबेडकर यांच्याकडून चळवळीला मोठी आशा निर्माण झाली होती.परंतु त्यांच्या या अपरिपक्व भूमिकेमुळे त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले.भविष्यात आंबेडकरी चळवळ ही फक्त सर्वसामान्य लोकांच्या भरवशावरच जिवंत राहणार आहे.त्यात आपल्याला कोणताही मोठा नेता दिसणार नाही एवढे मात्र नक्की.त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता तरी आपली अडेलतट्टू भूमिका सोडून सामंजस्याची आणि व्यवहारी भूमिका घ्यावी.केवळ मला संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे असा जप करण्यापेक्षा, संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी जे लोक जीवापाड संघर्ष करीत आहे त्यांच्यासोबत मनापासून सहभागी होणे हीच त्यांच्यासाठी आणि देशासाठी सुद्धा सध्याची नितांत आवश्यकता आहे.

प्रेमकुमार बोके - अंजनगाव सुर्जी

Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209