सातारा : डॉ. राधाकृष्णन यांनी पीएच. डी. चा प्रबंध चोरुन स्वतः च्या नावावर लिहिला. त्यांच्या जन्माच्या अगोदर चाळीस वर्षांपूर्वी समाजसुधारक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात प्रथमतः १८४८ साली सर्वांसाठी आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरु केले. त्यामुळे शासनाने म. फुले यांच्या नावानेच शिक्षक दिन सुरु करावा, अशी मागणी इतिहास संशोधक व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंक कोकाटे यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, म. फुले, सावित्रीबाई फुले यांनी सनातन्यांच्या विरोधाला झुगारुन कष्टकरी, श्रमकरी, वंचित, उपेक्षित, शेतकरी आणिविशेषतः मुलींसाठी देशात प्रथम १८४८ साली शिक्षणाला सुरुवात केली. म. फुले यांनी समाजातील वाईट चालीरिती, अंधश्रद्धा, विषमता, बालविवाह, केशवपनाला विरोध केला. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८६९ साली शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. विधवा विवाहाला चालना दिली. राधाकृष्णन हे मुलींचा जन्म सेवेसाठी असतो, या मताचे होते. आईच्या संस्कारानेच मुले घडतात. त्यामुळे प्रथमतः मुलींना शिकवले पाहिजे, असे १५ सप्टेंबर १८५३ च्या ज्ञानोदया म. फुले यांनी म्हटले आहे.
म. फुले यांच्या साहित्यातून क्रांती झाली. त्यांनी लिहिलेली गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न, शिवरायांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी पुस्तके वाचणारा माणूस जगात कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही. त्यामुळेच राजर्षि शाहू महाराज म. फुले यांना भारताचे 'मार्टिन ल्यूथर' तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांना 'भारताचे वॉशिंग्टन' म्हणत. राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. इथिक्स ऑफ वेदांत, द हिंदू व्यू ऑफ लाईफ, द ब्रह्मपुत्र इत्यादी पुस्तकातून राधाकृष्णन यांनी मनुवाद जपला. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी 'राधाकृष्ण अ बायोग्राफी' या ग्रंथात राधाकृष्णन कसे स्त्रीशिक्षण विरोधी होते हे सांगितले असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.
म. फुले यांचे साहित्य बहुजनांचे दु:ख मांडणारे व ते दूर करणारे साहित्य आहे. राधाकृष्णन यांचे साहित्य बहुजनांच्या हिताचे नाही. त्यांनी ज्या विषयात पीएच. डी मिळवली तो पीएच.डीचा प्रबंध त्यांनी चोरुन स्वतःच्या नावावर प्रकाशित केला. त्याविरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात त्यांच्याविरुद्ध खटला चालला. त्यांच्या नावाने शिक्षकदिन साजरा करणे हा देशाचा, शिक्षणक्षेत्राचा अपमान आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या शासनाने म. फुले यांच्या नावाने शिक्षकदिन जाहीर करावा. महाराष्ट्रातील जनता हा खोटा आणि बदनामीकारक शिक्षकदिन साजरा करणार नाही. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी हा पुरस्कार घ्यायचा का? याचा सद्सत्विवेकबुद्धीने विचार करावा, असेही ते म्हणाले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan, Savitri Mata Phule