महाराष्ट्राला हवे आहेतः एक नवे कर्पूरी ठाकुर ! (पुर्वार्ध)

मुंगेरीलाल के सपने

लेखक - प्रा. श्रावण देवरे

     आपल्या बहुजन समाजाचा ‘अवतार’ कल्पनेवर केवळ विश्वास असतो असे नाही तर, ‘तो’ आल्याशिवाय आपला उद्धार होणारच नाही, असा ठाम विश्वास असतो. त्यालाच जोडून आणखी एक आग्रह त्यांचा असतो, ‘हा अवतार शेजारच्या घरीच जन्मला पाहिजे, आपल्या घरात ती कटकट नको!’ हे अवतार दोन प्रकारचे असतात. एक धार्मिक व दुसरा सामाजिक! धार्मिक अवतार हे शासक-शोषक जाती-वर्गांनी आपल्या हितासाठी कल्पनेतून पैदा केलेले असतात व शासित-शोषित जात-वर्गांवर लादलेले असतात. काही धार्मिक अवतार इतिहास-पुराण काळातील क्रांतिकारक महापुरूषांवर धर्माचा शेंदूर फासून निर्माण केलेले असतात. सामाजिक अवतार हे शासित-शोषित जनतेच्या विद्रोहातून निर्माण होतात. धार्मिक अवतार येतात आणी जादूची कांडी फिरवून जनतेचे दुःख-शोषण नष्ट करण्याचा चमत्कार करतात. अर्थात या भाकडकथाच असतात. मात्र समाजिक अवतार खराखूरा इतिहास घडवतात. शोषित-दुःखी जनतेला संघटित करून त्यांचा विद्रोह विधायक मार्गावर आणतात. अन्याय निवारण्यासाठी समाजव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याची आवश्यकता सांगतात. त्यासाठी लागणारे तत्वज्ञान व कार्यक्रम ते देतात. म्हणून त्यांना अवतार न म्हणता महापुरूष वा महात्मा म्हटले जाते.

Maharashtra OBC Need Karpuri Thakur     असेच एक महापुरूष उत्तर भारतात जन्म घेतात व आपल्या कार्यकर्तृत्वातून जातीव्यवस्था नष्ट करणारे कार्यक्रम राबवितात. त्या महापुरूषाचे नाव आहे- जननायक कर्पूरी ठाकूर! नाभिक-सेन या अत्यंत नगण्य लोकसंख्या असलेल्या मायक्रो जातीत जन्मलेले कर्पूरी ठाकूर खरेखूरे जननायक होते. ज्या बिहारमध्ये ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींच्या सशस्त्र दरवडेखोरांच्या सेना (टोळ्या) होत्या, त्या बिहारमधील कमालीचे शोषण होत असलेल्या दलित-ओबीसी जनतेचे मसिहा होते कर्पूरी ठाकूर! सतत आठ वर्षे विरोधी पक्षनेतेपद, एक वेळा उपमुख्यमंत्री व दोनवेळा मुख्यमंत्री आणी आता मरणोत्तर भारतरत्न, अशा उच्चपदांवर असलेल्या व भारताच्या सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविलेल्या कर्पूरी ठाकूरांची लोकप्रियता किती व कशी होती याची कल्पना येते.

     आज मी या जननायक कर्पूरी ठाकूरांवर का लिहीतो आहे? असे काय असाधारण कार्य केले होते या महापुरूषाने? आताच्या तरूण पिढीला हे सांगण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे, कारण आजचा महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र राहीलेला नसून तो सत्तरीतल्या बिहारप्रमाणे हिंसाचारी, विध्वंसक व खूनी जमीनदार-वतनदारांचा महाराष्ट्र झालेला आहे. सत्तरीतल्या बिहार राज्याला ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार जातींच्या हिंसाचारापासून व नर-संहारापासून मुक्त करण्याची क्रांती जननायक कर्पूरी ठाकूरांनी केली आहे. ब्राह्मण-क्षत्रिय-मराठ्यांच्या हिंसक व खूनी कारवायांपासून महाराष्ट्राला मुक्त करायचे असेल तर आपल्याला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या मार्गानेच जावे लागेल! आणी म्हणून मी म्हणतो, ‘‘आज महाराष्ट्राला हवे आहेत, एक नवे कर्पूरी ठाकूर’’

     उत्तर भारतातील हिंदी राज्यांमध्ये त्यागमूर्ती आर. एल. चंदापूरी व शहिद बाबू जगदेव प्रसाद या महत्तम ओबीसी नेत्यांनी पन्नाशी-साठीच्या काळात दलित-ओबीसी आंदोलन उभे केले. या आंदोलनातून ललईसिंह यादव, रामस्वरूप वर्मा, कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव, अनुपलाल मंडल, बी. पी. मंडल, राम अवधेश सिंह, रामविलास पास्वान, भोला पास्वान असे असंख्य सामाजिक-राजकीय नेते व विचारवंत नेते दलित-ओबीसी जातीतून निर्माण झालेत. त्या काळी ओबीसी चळवळीने उच्चांक गाठला होता. त्याचा परिणाम देशाचा मुख्य सत्ताधारी असलेल्या कॉंग्रेस पक्षावर पडणे स्वाभाविक होते. उत्तर भारतातील राज्यांमध्ये पहिले बिगर-कॉंग्रेसी सरकार बिहारमध्ये 1967 साली स्थापन झाले, त्यात कर्पूरी ठाकूर उपमुख्यमंत्री होते. नंतर 1970 साली ते बिहारचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत. 1970 पर्यंत कॉंग्रेसतर्फे ब्राह्मण-भुमिहार व ठाकूर-राजपूत या जातीतूनच मुख्यमंत्री दिले जात होते. मात्र 1971 साली कॉंग्रेसने प्रथमच बिहारमध्ये ओबीसी मुख्यमंत्री दिला. केवळ ओबीसी चळवळीच्या दबावापोटी कॉंग्रेसला ओबीसी मुख्यमंत्री द्यावा लागला. दरोगा प्रसाद रॉय कॉंग्रेसचे पहिले ओबीसी मुख्यमंत्री झाले.

     ओबीसी समाजाचे भले करण्यासाठी कॉंग्रेसने ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले, असा गैरसमज करून घेऊ नका. ओबीसी चळवळ दडपून टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी ओबीसी मुख्यमंत्री बनवला गेला होता, हे लगेच सिद्ध झाले. मुख्यमंत्री झाल्यावर दरोगा प्रसाद रॉय यांनी दलित विधायक मुंगेरीलाल (पास्वान) यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी कमिशन नेमले. या ओबीसी कमिशनने ओबीसी जातींसाठी 26 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली. दरोगा प्रसाद हे ओबीसी चळवळ नष्ट करण्याऐवजी ओबीसी आरक्षण लागू करीत आहेत, हे लक्षात येताच कॉंग्रेसमधील ब्राह्मण-क्षत्रिय-जमीनदार जातींच्या आमदारांनी दरोगा प्रसाद यांचे सरकार खाली खेचले. अर्थात या उच्चजातीय पक्ष-द्रोहाला तत्कालीन कॉंग्रेस नेत्या इंदिरा गांधींचा पाठींबा होताच! असे प्रकार गुजराथ, महाराष्ट्रातही झालेले आहेत. महाराष्ट्रात दलित+ओबीसी नेत्यांना खाली खेचण्यासाठी सर्वपक्षीय मराठा-ब्राह्मण नेते एकत्र येतांना आपण अनेकवेळा पाहिलेले आहे. यावर मी अनेक वेळा लिहीले आहे.

     ओबीसी आरक्षणाची बदनामी करण्यासाठी व त्याची टिंगल-टवाळी करण्यासाठी ‘‘मुंगेरीलाल के सपने’’ हा वाक्प्रचार रूढ करण्यात आला. त्यावर ब्राह्मण साहित्यिकांनी कांदबरी लिहीली व नंतर टि.व्ही. सिरियलही काढली गेली. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाही विरोधात जे देशव्यापी आंदोलन झाले, त्यात तत्कालीन राज्यस्तरीय ओबीसी नेते ‘‘राष्ट्रीय नेते’’ म्हणून पुढे आलेत. आणीबाणीविरोधी आंदोलन यशस्वी होण्याचे एकमेव कारण म्हणजे या ओबीसी नेत्यांनी जयप्रकाशप्रणित ‘संपूर्ण क्रांतीचा नारा’ देऊन हे आंदोलन शेवटपर्यंत लढलेत. इतर कम्युनिस्ट पक्ष व जनसंघ पक्षाच्या नेत्यांनी इंदिरा गांधींची माफी मागून सुटका करून घेतली. मात्र ओबीसी नेत्यांनी जेलमधूनच 1977 ची लोकसभा निवडणूक लढवली व जिंकलीसुद्धा!

     या राष्ट्रीय नेत्यांमध्ये एक मोठे नाव पुढे आले- ते कर्पूरी ठाकूर यांचे! 1977 साली लोकसभा सदस्य झाल्यानंतर काही महिन्यांनी अनेक राज्यांसोबत बिहारच्या विधान सभा निवडणूक झाली. त्यात मुख्यमंत्री पदासाठी कर्पूरी ठाकूर यांच्या नावासाठी आग्रह सुरू झाला. 228 आमदारांपैकी 144 म्हणजे तीन-चतुर्थांश आमदारांचा पाठींबा मिळवीत कर्पूरी ठाकूर दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झालेत, यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात यायला हवी! त्यावेळी आमदार देवेंद्र प्रसाद यादव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन कर्पूरी ठाकूर यांच्यासाठी विधानसभेची जागा रिकामी करून दिली. या पोटनिवडणूकीत कर्पूरी जी 65000 मतांच्या फरकाने म्हणजे प्रचंड मतांनी निवडूण आलेत.

     दुसर्‍यांदा मुख्यमंत्री होताच जननायक कर्पूरी ठाकूर यांनी मुंगेरीलाल कमिशनच्या शिफारशी लागू केल्यात. ब्राह्मण-क्षत्रिय जमीनदार उच्चजातीयांनी टिंगल-टवाळी करुन हिणविलेले ‘‘मुंगेरीलाल के सपने’’ कर्पूरीजींनी खरे करून दाखविले. ज्या पद्धतीने हे आरक्षण लागू करण्यात आले, त्या पद्धतीला ‘‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’’ असे म्हणतात. देश पातळीवर हा ‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’ गाजला व अजरामर झाला.

     हा "कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला" म्हणजे काय, तो कसा अमलात आणला गेला व त्याचे काय परिणाम झालेत, हे आता आपण लेखाच्या उत्तरार्धात पाहू या! तसेच महाराष्ट्रात कोण नेता कर्पूरी ठाकूरांचा ‘‘अवतार’’ धारण करू शकतो, हे या लेखाचे शीर्षकीय रहस्य उलगडण्याचा प्रयत्न लेखाच्या उत्तरार्धात करु या!   

     तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो !!!

- प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी,  संपर्कः 94 227 88 546
ईमेलः obcparty@gmail.com

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209