परभणी येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याचा थेट ठराव पास करण्यात आला. वाराणसी मतदारसंघात परभणीतील मराठा समाज १ हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच प्रत्येक गावातून २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.
परभणीत झालेल्या या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी, मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी, बारामती आणि ठाणे या चार मतदार संघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येणाऱ्या काळात राजकारणासाठी गाव बंदी पाठोपाठ घरबंदी करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे दाखल्यांची अंमलबजावणी झाला नाही तर प्रत्येक मतदारसंघात २ हजार उमेदवार देणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.