चिपळूण, ता. ५ : जिजाऊ ब्रिगेड ही महिलांसाठी काम करणारी देशातील एकमेव सामाजिक, वैचारिक व आक्रमक अशी महिलांची संघटना आहे. या संघटनेत ग्रामीण भागातील महिलांचाही सहभाग वाढायला हवा. यासाठी गाव तिथे जिजाऊ बिग्रेडची शाखा स्थापन करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी केले.
सावर्डे येथे झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेल्या २५ वर्षांपासून जिजाऊ ब्रिगेडचे काम विविध स्तरावर सुरू आहे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार असो किंवा शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी आंदोलन असो असे अनेक प्रश्न जिजाऊ ब्रिगेडने आजवर हाताळले आहेत. महाराष्ट्रभर विविध उपक्रम व प्रबोधन असे अनेक समाजोपयोगी उपक्रम जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सुरू असतात. यासाठी गाव तिथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा असली पाहिजे. यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांपर्यंत जिजाऊ ब्रिगेड पोहोचेल. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा अनुजा भोसले, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्षा रवीना गुजर, चिपळूण तालुकाध्यक्षा मीनल गुरव, सरला पाटील, नंदा भाळेकर, रोहिणी मोरे आदी उपस्थित होते.