सकल ओबीसी समाज प्रबोधन- जनजागृती मेळावा : ओबीसींनी न्याय्य हक्कासाठी संघटित व्हावे - प्रा. लक्ष्मण हाके

उठ ओबीसी जागा हो, हक्कासाठी संघटित हो !

     जालना - असंघटीत असलेला ओबीसी व भटका विमुक्त जात समुह देशाच्या स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असून राजकीय सत्ता परिवर्तन हाच जात समुह करू शकतो, हे आता लोकसभा निवडणुकांमध्ये दाखवून द्यावे, असे आवाहन राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज (दि. १०) येथे केले.

     येथील आयेशा लॉन्स येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन - जनजागृती मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. विधान परिषदेचे सदस्य राजेश राठोड हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.

OBC Samaj prabodhan Jan Jagriti melava Jalna     यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. हाके पुढे म्हणाले की, आज देशात झालेल्या राजकीय सत्तांतरामुळे देशातील सामाजिक, धार्मिक वातावरण गढूळ झाले आहे, देशातील संविधान, लोकशाही धोक्यात आली आहे, नागरिकांच्या हक्क व अधिकारावर गदा आणली जात आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मंडळींचा आवाज दाबला जात आहे, त्यांच्या विरोधात इडी, सीबीआयच्या चौकशींचा ससेमिरा लावला जात आहे. पंचायत राजमधील ५६ हजार जागा रिक्त झालेल्या आहेत, सातासमुद्रापलिकडून आलेल्या इंग्रजांनी भारतात जातीनिहाय जनगणना सुरू केली होती. आता ही जनगणनाही थांबली आहे. महाराष्ट्र राज्यात ६० टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी व भटका विमुक्त जात समुह हा स्वातंत्र्यानंतरही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. प्रस्थापित समाज व्यवस्थेने मतदानापुरताच गृहीत धरलेल्या ओबीसी समाजाच्या हातात कुठल्याही आर्थिक नाड्या नाहीत, हा समाज घटक कुठल्याही न्याय्य प्रकियेत नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात केवळ ०.४ ते ०.५ टक्के आर्थिक तरतूद करण्यात येते, ही खेदजनक बाब आहे.

     देशातील अस्थिरतेमुळे तसेच ओबीसीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, आता ओबीसी समुह घटकावर आपली उपद्रव मुल्ये सांगण्याची वेळ आली आहे, ओबीसी तसेच भटक्या विमुक्त जात समुहाने संघटीत होवून गावगाड्यातील छोट्या जात समुहालाही संघटीत करून घ्यावे लागणार आहे. सत्ताधारी मंडळींनी जसे निवडणुकीचे व्याकरण आत्मसात केले आहे, तसेच ओबीसी व भटक्या जात समुहाने लोकसभा, विधानसभेत आपले अधिकचे प्रतिनिधी कसे जातील, यासाठी पुढे यावे, राजकीय पक्षाला ओबीसी समाजाला निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार का? असा सवाल विचारला पाहिजे. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी ओबीसी, भटक्या विमुक्त जात समुहाने जागे व्हावे, लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ता परिवर्तन करण्याची संधी या जात समुहाला प्राप्त झाली असून त्यासाठी संघटीत व्हावे, असे आवाहनही प्रा. हाके यांनी यावेळी केले.

     अध्यक्षीय समारोप करतांना विधानपरिषदेचे सदस्य राजेश राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यात ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाची चळवळ जोरदारपणे सुरू असून हा जात समुह ताकदीने पुढे येत आहे. आपण ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाच्या लढ्यासाठी आपण सतत लढत राहणार असून यासाठी आपली आमदारकी पणाला लावू, असेही ते म्हणाले.

     प्रास्ताविक करतांना जालना जिल्हा सकल ओबीसी समाजाचे समन्वयक अशोक पांगारकर म्हणाले की, जालना हे ओबीसी चळवळीचे केंद्र आहे, पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही ओबीसी, भटक्या विमुक्त जात समुहाला संघटीत करीत आहोत, मराठा समाज आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली ओबीसी समाज घटकांना भयभीत करण्याचे प्रयत्न झाले आहेत. ओबीसींचा मराठा सम ज आरक्षणाला कुठलाही विरोध नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, हीच आमची भूमिका आहे. भयभीत झालेला गाव गाड्यातील ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाला संघटीत करून धाडसी पाऊल उचलण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय, मुस्लिम व ओबीसी जात समुहाने एकत्र यावे, असे आवाहनही पांगारकर यांनी यावेळी केले.

     या मेळाव्याचे संचालन कैलास फुलारी यांनी केले. यावेळी बाबुरावमामा सतकर, नारायण चाळगे, राजेंद्र राख, प्रा. सत्संग मुंढे, दीपक बो-हाटे, ओम प्रकाश चितळकर, बळीराम कटके, अॅड. संजय काळबांडे, गजानन गिते, विजय चौधरी, शिवप्रकाश चितळकर, अविनाश चव्हाण, संतोष जमधडे, यांच्यासह ओबीसी, भटक्या विमुक्त संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक दरी निर्माण करण्याचे कार्य करू नका

      सामाजिक आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र अलिकडे सामाजिक दरी निर्माण करण्याचे कार्य विचारांने खुज्या व उंचीनेही खुज्या असलेल्या माणसाकडून होत असल्याचा आरोप प्रा. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता केला. महाराष्ट्रातील ४९२ जात समुहाचे कैवारी असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर आरोप करणाऱ्या मंडळींवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी व भटक्या विमुक्त जात समुहाने सामाजिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडून लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209