देऊळगाव राजा - शहरातील महात्मा ज्योतीराव फुले चौकात स्मारक उभारण्याची मागणी अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी केली आहे.
शहरातील नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय चौकास यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने समाजाच्या मागणीवरून महात्मा ज्योतीराव फुले चौक, असे नामकरण करण्यात आलेले आहे. याच चौकात आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे अथक प्रयत्नातून नगरपरिषद वाचनालय इमारतीचे जागेवर सुसज्ज ग्रंथालयासाठी व अभ्यासिकेसाठी इमारतीचे बांधकामास परवानगी मिळालेली असून त्या ठिकाणी टोलेजंग इमारत काही महिन्यातच उभी राहणार आहे. याच चौकात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारून या चौकात या दोन्ही थोर समाज सुधारकांचे पुतळे लावून सर्व बहुजन समाजाला त्यांच्या विचारांची प्रेरणा देण्याचे काम करावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी २ मार्च रोजी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांना असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षरीसह एका निवेदनाव्दारे केली आहे.