अ भा आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे तिसरे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आले आहे. १६आणि १७ मार्च रोजी सदर संमेलन होईल. सातपुडा प्रतिष्ठान ही सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत संस्था संमेलनाचे आयोजन करणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा माधव सरकुंडे आणि उद्घाटक म्हणून प्रा गंगाधर अहिरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी दिली आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रा माधव सरकुंडे यांनी आदिवासींच्या व्यथा, वेदनांना साहित्याच्या पृष्ठभागावर आणले आहे. टोकदार लेखनासाठी सुप्रसिद्ध असणारे प्रा सरकुंडे हे साहित्य संस्कृतीचे निर्भीड भाष्यकार सुद्धा आहेत. प्रा सरकुंडे यांची 'वाडा' ही कादंबरी, 'सर्वा’ताडमं' हे कथासंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. प्रा.सरकुंडे यांनी वैचारिक लेखन सुद्धा विपुल प्रमाणात केले असून सल,आदिवासी अस्मितेचा शोध, धनगर आदिवासी नाहीत, दोन आदिनायकः रावण आणि एकलव्य आदी वैचारिक लेखन प्रकाशित झालेले आहे.प्रा सरकुंडे यांचा पिंड कविचा असून कवितेमधील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांचे मनोगत, रानपाखरांची संसद, मी तोडले तुरुंगाचे दार, ब्लॅक इज ब्युटिफुल, चेहरा हरवलेली माणसं, माझा दम घोटतोय, तहबंदी, युद्ध अजून संपले नाही इत्यादी काव्य संग्रह वाचकप्रिय झाले आहेत. एकूण पंधरा महत्त्वाच्या पुस्तकाचे लेखक असलेल्या प्रा. सरकुंडे यांनी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा भुषविले असून त्यांचे 'भुमकाल' हे स्वचरीत्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे. उद्घाटक प्रा गंगाधर अहिरे हे सक्षम कवी, लेखक, संपादक व प्रख्यात व्याख्याते आहेत. जेष्ठ कार्यकर्ते व उत्कृष्ट संघटक म्हणून परिचित असलेले प्रा अहिरे हे संपादक आणि स्तंभलेखक सुद्धा आहेत. त्यांचे सीमा सरकताहेत (कवितासंग्रह), समता संगराची पन्नास वर्षे (वैचारिक ग्रंथ), उभा माणूस पेटवा(लोककला, लोकगीतांवरील शिलेदार (व्यक्तिचित्रणं ) उजेडाचा तळाशी (समीक्षा) इत्यादी ग्रंथ वैचारिक भाष्य), वादळाचे जागर (वैचारिक), चिंतनाच्या प्रसिद्ध आहेत. विविध सन्मानिय पुरस्कारांनी सन्मानित प्रा अहिरे साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'परिवर्त' साहित्य संस्थेचे प्रमुख आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचा प्रारंभ संविधान रॅलीने होणार असून संमेलनात एकूण नऊ सत्र नियोजित आहेत यात दोन कविसंमेलन, परिसंवाद, दोन परिचर्चा, दोन एकपात्री प्रयोग,सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील गणमान्य साहित्यिक आणि अतिथी विचारवंतांना साहित्य संमेलनात निमंत्रित करण्यात आले असून डॉ वामन गवई, रविंद्र इंगळे चावरेकर, लोकनाथ यशवंत, रमेश जीवने, प्रकाश राठोड, किशोर बळी, डॉ जलदा ढोके, प्रा प्रगती सुभाष, प्रा. उज्वला गणवीर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सिद्धार्थ खरात उपसचिव महाराष्ट्र शासन, सुनील कडासणे जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा आणि प्रा संजय खडसे उपजिल्हाधिकारी संमेलनाचे असतील.
विशेष स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते प्रसेनजित पाटील यांनी घेतली असून संमेलनाच्या यशस्वी आयोजना साठी विविध समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. संमेलनाला सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भाऊ भोजणे, अभयसिंह मारोडे, वामनराव ढगे, विजय इंगळे, हमीद पाशा,काशीनाथ मानकर, अँड विश्वजित वानखेडे, पंडित गवई, सागर झणके, रवी बोडखे, अँड प्रमोद घाटे, प्रा सिद्धार्थ इंगळे, बाळासाहेब डोसे, विठ्ठल निंबाळकार, डॉ गुलाबराव इंगळे, प्रा सुभाष गुजर, शेख जलील शेख वकील, वासुदेव सुभेदार आदींनी केले आहे.
संमेलन परिसराला भाई के आर पाटील यांचे नाव शेतकरी,शेतमजूर यांच्यासाठी लढा उभारणारे, कायम संघर्ष करणारे बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र स्मृतीशेष भाई के आर पाटील यांचे नाव संमेलन परिसराला दिले. असून वरवट बकाल परिसरात वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी झटणारे स्मृतीशेष भिकमजी उर्फ लालासेठ चांडक यांचे नाव विचारमंचाला देण्यात आले आहे. ग्रंथ दालनाला स्मृतीशेष गायिका किरण पाटणकर यांचे नाव देण्यात आले आहे.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan