उमरगा, सामाजिक विषमता रोखून समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून कलम ३४० अन्वये ओबीसी समाजबांधवांना दिलेल्या आरक्षणाचे कवचकुंडले खिळखिळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी बांधवांनी हा धोका ओळखून अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. असा सुर उमरगा येथे शनिवारी (दि. १६) शासकिय विश्रामगृहात आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण हक्क कृती समितीच्या बैठकीत काढण्यात आला.
अॅड. दिलीप सगर, कॉ. अरूण रेणके, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, प्रेमलता टोपणे, स्नेहा सोनकाटे, पंचायत समितीचे माजी सभापती सचीन पाटील, प्रा आप्पाराव सोनकाटे यांच्या अध्यक्षीय मंडळाच्या उपस्थितीत व काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल ऊर्फ पप्पू सगर यांच्या नियोजनातून ही बैठक घेण्यात आली.
या वेळी कॉ. रेणके यांनी मन, मेंदू व मनगट क्रियाशील करून ओबीसी तील ३४६ जातींच्या आपासातील हेवेदावे दुर करुन संविधानाने मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी बांधवाची वज्रमूठ महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले. अँड. सगर यांनी ओबीसी आरक्षणाचा मुळ गाभा टिकविण्यासाठी अस्तित्वाची लढाई उभी करावी लागेल. असे सांगून कुणाला विरोध म्हणुन नव्हे तर आपल्या हक्कावर गदा येऊ नये याची दक्षता घेण्यासाठी ओबीसींनी एकत्र येण्याचे आवाहन केले. प्रा. रमाकांत पाटील, विक्रम पाचंगे, माजी नगराध्यक्ष श्री. अत्तार, श्री. पाटील, प्रा. आप्पाराव सोनकाटे, राजू सगर, प्रदिप चौधरी, शाहूराज हुलगे, श्रीराम राठोड, देवीदास पावशेरे, अनिता माने, सिद्धेश्वर कलशेट्टी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी बांधव राजकिय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे आवाहन केले. या वेळी एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देण्यात आल्या. यापुढील काळात धरणे आंदोलन व एल्गार सभेच्या नियोजनाची प्राथमिक चर्चा झाली. प्रा. अभयकुमार हिरास यांनी सूत्रसंचलन केले तर विजय सगर यांनी आभार मानले.
आरक्षण हा गरिबी हटवण्याचा विषय नाही तर तो सामाजिक विषमतेचा आहे. राज्यात विशिष्ट समाजाकडून ओबीसी हक्काच्या आरक्षणाचे दार ठोठावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसीची गणती ८० टक्के असल्याने राज्य सरकारला याची जाणीव ठेवावी लागेल. आमच्या हक्काच शैक्षणिक व नोकरीतल्या आरक्षणाला तर धक्का लागूच नये, शिवाय आता राजकीय आरक्षणाची मागणी होत असेल तर ओबीसी बांधव राजकीय पटलावरून विस्थापित होतील. हा सगळा डाव उधळून लावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ओबीसींनी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan