आ. गोपीचंद पडळकरांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणे आणि याप्रकरणी इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल असून, संबंधितावर योग्य कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील ओबीसी एकवटले असून, रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात आ. गोपीचंद पडळकर, माजी खा. समीर भुजबळ, दौलत शितोळे सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली.
आ.गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आता महाराष्ट्रातील ओबीसींनी एकत्र आले आहेत. राज्यात कुणालाही गावबंदी करणे गुन्हा असून, यासाठी सरकारने गावोगावी लावलेले गावबंदीचे बँनर काढून टाकावेत. या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची ओबीसी भटके विमुक्त समाजाची इंदापूर येथे सभा झाली. भुजबळांनी या सभेमधून गावबंदी कायद्याला धरून नसल्याचा पुनरुच्चार केला. सर्वपक्षाच्या नेत्यांना गावबंदी आहे, तर आ. रोहित पवार यांच्या युवा यात्रेचे स्वागत कसे होते?, असा सवालही त्यांनी सभेत उपस्थित केला होता.
या सभेनंत दूध दरासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या विनंतीवरून भेट देण्यास जाणाऱ्या आ. गोपिचंद पडळकर यांच्या दिशेने मराठा आंदोलकांनी चप्पल फेकण्यात आली. ही सभा आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता गरीब मराठा नागरिकांना आरक्षण मिळावे, अशी सर्व ओबीसी नेत्यांची भूमिका आहे. मात्र, काही जणांकडून लोकप्रतिनिधींना गावबंदी, जाळपोळ करण्यात येत आहे. हे कायद्याला धरून नाही, त्यामुळे इंदापूरमध्ये सोमवारी बंद पुकारला होता. जोवर नेत्यांना केलेली गावबंदी उठविली जात नाही, तोवर ओबीसी आंदोलन थांबणार नाही, असे डॉ. शशिकांत तरंगे, पांडुरंग शिंदे, माउली वाघमोडे यांनी स्पष्ट केले. ओबीसी नेत्यांना जाणीवपुर्वक टार्गेट केले जात आहे. ओबीसी नेत्यांना धमक्या देण्यात येत आहेत. या गावबंदी विरोधात सोलापूर, पुणे, सांगली, धाराशिव, नगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्र येणार आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission