भिवंडी: तुमचे आमचे नाते काय 'जय जिजाऊ', 'जय शिवराय' आणि आमच्यावरच हल्ले. छत्रपतींपासून पेशव्यांच्या काळात आगरी-कोळ्यांचेच पराक्रम आहेत. छत्रपतींच्या इतिहासाची ओळख मराठ्यांऐवजी मावळ्यांमुळे असल्याचे लिहिले जाते आणि ते मावळे म्हणजे ओबीसी. त्यामुळे ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आगामी निवडणुकीत कार्यक्रम करा, असे खडेबोल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे - पाटलांना भिवंडीत सुनावले. ते भिवंडीतील सोनाळे मैदानात आयोजित ओबीसी निर्धार मेळाव्यात बोलत होते.
माझ्या कुटुंबाला ओबीसी आरक्षणाची गरज नाही; परंतु आर्थिक शैक्षणिक मागास असलेल्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यासाठी हा ओबीसी समाजाचा
लढा आहे. आता कुठे समाजाला आरक्षण मिळायला लागले तर त्यात वाटेकरी निर्माण केले गेले, असा आरोप करत मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचा विरोध नाही, असे ते म्हणाले. लोकांचे कार्यक्रम करण्याच्या अगोदर स्वतःच्या तब्येतीसह किडन्या सांभाळण्याचा सल्लाही त्यांनी जरांगेंना दिला.
जरांगे उघडपणे बोलल्यावर कारवाई नाही आणि मी बोलल्यावर अशांतता, असे ताशेरेही त्यांनी संबंधित प्रशासनावर ओढले. धमक्या देणाऱ्यांना सलाम करणाऱ्यांच्या विरोधात ओबीसींनी पक्षपात विसरून एकत्रितपणे आगामी निवडणुकीत कार्यक्रम करा. साखळी उपोषणे, मोर्चे, कँडल मार्च, गावागावातून प्रचार प्रसार करा. जनजागरण करून ओबीसीला जागे करा, असे आवाहन त्यांनी ओबीसींना भाषणाच्या शेवटी केले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री महादेव जानकर, ओबीसी राष्ट्रीय महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी अध्यक्ष शब्बीर अन्सारी, कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील, आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी, आमदार रईस शेख, महेश चौघुले, किसन कथोरे, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार सुरेश टावरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे कार्याध्यक्ष यशवंत सोरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ पाटील, प्रकाश शेंडगे, विश्वनाथ पाटील, राजाराम साळवी यांचीसुद्धा समायोचित भाषणे झाली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून कार्यक्रमाची जाहिरात करताना मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित राहणार असल्याची जाहिरात केली होती; परंतु ऐनवेळी या कार्यक्रमास कपिल पाटील यांनी गैरहजेरी लावल्याने अनेकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाकडे एका विशिष्ट समाजाचा मेळावा, असे संबोधित कुणबी समाजसुद्धा बहुसंख्येने गैरहजर राहिल्याचे बोलले जात आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Vishwanath Pratap Singh