वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी फाटा वडीगोद्री येथे दत्त मंदिरात ओबीसी समाज आरक्षण बचाव करीता मंगळवार ५ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
मंगळवारी सकाळी बाजार स्थळ वडीगोद्री ते उपोषण स्थळापर्यत ओबीसी समाज बांधवांनी भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत भागातील मोठा ओबीसी जनसमुदाय उपस्थित होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गावात ढोल ताशांच्या गजरात व ओबीसी बचाव च्या घोषणत ही मिरवणूक उपोषणस्थळी पोहोचली.
ओबीसी आरक्षण तसेच ठेवा मराठा समाजास वेगळे आरक्षण द्यावे आधीच ओबीसी मध्ये अनेक जाती आहे. येथे गर्दी झालेली आहे. या मध्ये जास्त वाटेकरी नकोत. जे खरे कुणबी आहे त्यांना आमचा विरोध नाही. मात्र खोटे प्रमाणपत्र घेऊन कोणी ओबीसी मध्ये घुसत असतील तर त्यांना विरोध आहे. आता ओबीसी एक झाला आहे, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. या उपोषणाबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी फोनवर ओबीसी बांधव यांच्या सोबत संवाद साधला. तसेच आमदार गोपिचंद पडळकर यांनीही फोनवर संपर्क साधून पाठींबा दिला. ओबीसी मधिल छोटे समाज आपल्या न्याय हक्का साठी लढत आहे. आम्ही आपल्या सोबत असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षण बचाव करीता २३ डिसेंबर रोजी नागरीकांनी वडीगोद्री येथे उपस्थित रहावे असे संयोजकांनी सांगितले. साखळी उपोषणास पाठींबा देण्यासाठी अंबड, परतूर, मंठा, पैठण जालना या ठिकाणाहून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने आले आहेत. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी वडीगोद्री गावातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने साखळी उपोषणास बसले. या साखळी उपोषणात साठ गावातील ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत. दरम्यान, साखळी उपोषणाच्या पहिल्यां दिवशी अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट दिली.
अंतरवाली सराटी पासून एक किमी अंतरावर असलेल्या वडीगोद्री येथे वडीगोद्री - अंतरवाली सराटी रोडवरील दत्त मंदिर येथे ओबीसी बांधवांच्या साखळी उपोषणास सुरुवात झाली. हे उपोषण ओबीसी समाजबांधवांच्या आंदोलनाला दिशा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Gautama Buddha, Mandal commission, Savitri Mata Phule