बीड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी काल अचानक बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगडावर जावून संत वामनभाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महंत विठ्ठलशास्त्री यांच्या सोबत बंद दारा आड जवळपास चार तास चर्चा केली. चर्चेचा तपशिल बाहेर आलेला नसला तरी या भेटी विषयी राज्यभरात कुतुहल निर्माण झाले आहे.
श्री क्षेत्र गहिनीनाथगडाला अध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठे स्थान आहे. या गडाचे लाखो भक्त महाराष्ट्रासह इतरही राज्यात आहेत. संत वामनभाऊ महाराजांनी वारकरी धर्माची पताका घेवून समाज प्रबोधनाचे ऐतिहासिक कार्य केले. वामनभाऊ हे महान सत्पुरुष होते. तसेच त्यांना वाचासिध्दी सुध्दा प्राप्त होती. त्यांच्या दर्शनाने अनेकांच्या आयुष्याचे फलित झाले. केवळ ग्रामीण भागातील भक्तांना नव्हे तर मोठ मोठ्या शहरातील उच्चशिक्षीत लोकांना सुध्दा भाऊंच्या दर्शनाचे चमत्कार पहायला मिळाले. त्यामुळे दरवर्षी गहिनीनाथगडावर वेगवेगळ्या राज्यातून लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात. महंत विठ्ठल शास्त्री महाराज यांनी गडाचे महात्म्य आणि पावित्र्य राखून अध्यात्मिक उंची वाढवण्याचे काम केले. लाखो भक्तांची उपस्थिती पाहून विविध राजकिय पक्षाचे नेते सुध्दा गडाच्या दिशेने मार्गक्रमण करु लागले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री, नेते वर्षानुवर्षे गडावर येत असतात. कोणत्याही विशिष्ट जातीला, धर्माला, राजकिय विचारधारेला न मानता सर्वांना सोबत घेवून जाण्याचे काम विठ्ठलशास्त्री महाराजांनी केले आहे. काल पहिल्यांदाच अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे श्री क्षेत्र गहिनीनाथगडावर आले. त्यांचा दौरा नियोजित नव्हता. या दौऱ्याची फार चर्चाही झाली नाही. फक्त गहिनीनाथगडावर दर्शन घेण्यासाठी ते आले होते. सकाळी ११ वाजता त्यांचे गडावर आगमन झाल्यानंतर त्यांनी संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. विठ्ठल महाराजांनी त्यांचा यथोचित सत्कारही केला. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास चार तास एकांतात चर्चा झाली. चर्चेचा तपशिल दोघांनीही सांगितलेला नाही. मात्र ही भेट केवळ अध्यात्मिक स्वरुपाची असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तरीदेखील भेटीचे कुतुहल राज्यभरात निर्माण झाले आहे.