सोलापूर - ओबीसी संघर्ष योध्दा छगनराव भुजबळ तमाम ओबीसी समाजासाठी या वयातही मोठा संघर्ष करीत आहेत ओबीसीचे आरक्षण वाचवायचे असेल तर 'उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो अशी आर्त हाक देत सोलापूर जिल्ह्याची महाएल्गार सभा २४ डिसेंबरच्या आत पंढरपूर येथे घेण्याचे सूतोवाच ओबीसीचे जेष्ठ नेते शंकरराव लिंगे यांनी सोलापूर येथे केले. सोलापूर येथील समाजकल्याण केंद्र येथे ओबीसी मेळाव्याच्या नियोजनासाठी सकल ओबीसी समाजाची बैठक शुक्रवारी पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणात लिंगे यांनी ओबीसी समाजाचा इतिहास मांडताना मंडल आयोग आणि भुजबळ यांचा संघर्ष सांगितला. यापूर्वी अनेक आयोगाने मराठा समाज हा सामाजिक आर्थिक मागास नसल्याचे सांगितले आहे. कुणबी म्हणजे शेतमजूर, सालगडी समजला जातो. मराठा हा कुणबी असू शकत नाही. मात्र सत्तेच्या आणि दहशतीच्या मार्गाने ओबीसीत घुसखोरी होत आहे. हे थांबवून आपल्या पुढील पिढीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी जागे होण्याचे आवाहन केले.
बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन हा लढा लढावा लागणार आहे. इंदापूर येथील सभेलाही आम्ही मोठ्या संख्येने जात असून लवकरच भुजबळसाहेबांची मुंबई येथे भेट घेऊन मेळाव्याची तारीख ठरवणार असल्याचे आबासाहेब खारे यांनी सांगितले.
याप्रसंगी समता परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ गावघरे व माऊली हळवणकर यांनी भुजबळ यांची सभा पंढरपूर येथे घेण्याची मागणी केली. यावेळी सोलापूरचे ओबीसी नेते युवराज चुंभळकर, पंढरपूरचे माऊली हळणकर, समता परिषदेचे माजी अध्यक्ष आबासाहेब खारे, चंदाराणी आतकर, शशिकांत कांबळे, शकील नदाफ, भारत माळी, हंबीरराव गोरे, मुन्ना अनंतकवळस, दीपक ढगे, अॅड राजन दीक्षित, प्रा. भानुदास बनसोडे, यश बनकर, करणराजे गडदे, देवेंद्र यादव, राहुल माळी, मनोज माळी इरफान शेख आदींसह मोठ्या संख्येने समता सैनिक आणि ओबीसी बांधव उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission