मुंबई, दि.७ :- महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला होता. महामानवाला अभिवादन केल्यानंतर अनुयायांनी सुमारे शंभर कोटी रुपये पेक्षा जास्त पुस्तकांची खरेदी केल्याचे समजते. ग्रंथ खरेदीचे सर्व रेकॉर्ड चैत्यभूमीवर मोडल्याचे दिसून आले.
६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी मुंबई येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसागर आला होता. डॉक्टर बाबासाहेब 'आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर चैत्यभूमीवर व परिसरात जागोजागी लागलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्स मधून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी प्रेमी ग्रंथ खरेदी करताना दिसत होते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासकीय मुद्रालयाने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके व विविध भाषणांचे खंड अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिले होते. त्यांचाही अनेक ठिकाणी स्टालस बघायला मिळाले. शिवाय विविध लेखकांची पुस्तके ही विक्रीसाठी उपलब्ध होते. अनेक मोठ मोठ्या प्रकाशकांनी पुस्तकांची दालने उभारली होती. यंदा प्रथमच मोठ्या स्क्रीनवर पुस्तकांची माहिती आलेल्या अनुयायांना दिली जात होती. त्यामुळे ग्रंथ खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानावर गर्दी झालेली बघायला मिळत होती. जगाच्या पाठीवर अशा प्रकारची ग्रंथ खरेदी फक्त चैत्यभूमी मुंबई आणि दीक्षाभूमी नागपूर येथे दिसून येते.