- अनुज हुलके
गतवर्षी वर्धा नगरीत धुमधडाक्यात विद्रोही साहित्य संमेलन पार पडले. प्रस्थापित सारस्वतांना अनपेक्षितपणे धक्का देणाऱ्या या आयोजनातून प्रस्थापित अजूनही सावरलेले नाही. तरी वर्षभराच्या आत अ. भा. साहित्य संमेलनाला आव्हान देत विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर येथे दमदारपणे आयोजित करण्यात येत आहे. त्याची जय्यत तयारी चालू असून विद्रोही साहित्य संमेलनात यंदा रसिक साहित्यिकांच्या विक्रमी उपस्थितीसह वैशिट्यपूर्ण आयोजन असणार आहे. त्यामुळे प्रस्थापित साहित्यिकांसमोर मोठे आव्हान ठाकणार आहे.
अमळनेर ही साहित्यिकांची भूमी बहिणाबाई चौधरी या कवयित्रीने आपल्या प्रतिभेने या मातीचा सुगंध आसमंतात पसरवला. साने गुरुजींच्या श्यामची आई करुणा पसरवत मराठी लेकरांची संस्कार मूल्यांची पर्वणी ठरते. तर सारे रान उठवत शेतकऱ्यांच्या राज्यासाठी प्राणही पणाला लावण्याची विद्रोही गर्जना याच खानदेशी मुलुखात ऐकू येते. क्रांतिकारक उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील यांच्या कर्तुत्वाने तर अंमळनेरच्या कीर्तीचा सुगंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दरवळला.
शाहीर साबळे यांचा शाहिरीचा सह्याद्रीच्या दरीदरीतून दिल्लीच्या तख्तापर्यंत गुंजणारा महाराष्ट्राच्या महिमानाचा नाद अंमळनेरचाच. लीलाताई गृहरक्षक दलाच्या पहिल्या अध्यक्ष म्हणूनही विख्यात. पत्री सरकारमध्ये उत्तमराव पाटील यांच्या सहभागाचे श्रेय, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांचाही या मातीशी संबंध सर्व विदित आहे. अशा या सुपिक भूमित विद्रोही विचाराच्या पेरणीसाठी अंमळनेर नगरी सज्ज झाली आहे. वर्धा येथील विद्रोही साहित्य संमेलनाने विद्रोहीच्या प्रवाहाला गांधीजींची सोबत लाभली. क्रूर रानटी हिंसक वैदिक आर्यब्राम्हणी परंपरेला ठोकून काढणारा विद्रोही प्रवाह बळीराजा, लोकायत, जैन, बुद्ध, लिंगायत, महानुभावांच्या निकराच्या संघर्षातून एकिकडे उदंड होत असताना विद्रोहाची मानवतावादी अहिंसक संयत वैचारिक विचारसूत्रं जराही अधीर होत नाही.अमानुष वैदिक धर्मसूत्रं किलकिली करणाऱ्या बुद्धांच्या अहिंसक साधनशुचितेचा अनुयायी काल विद्रोहाशी जोडला गेला आणि जगाला प्रेम अर्पण करण्याचा खरा धर्म सांगत करुणेचा अनुयायी विद्रोहीचा अंमळनेरच्या वारीचा वारकरी होत असताना नवल ते काय? विद्रोहाची व्याप्ती अशी दसदिशांना व्यापून टाकणारी श्रमिक कृषक समाजाच्या प्रतिभेतून उत्तुंग उठणाऱ्या विद्रोही साहित्याच्या लाटा आता सिंधुजनांचा ललकार ठरणार आहे. ओबिसी भटक्या दलित आदिवासी अल्पसंख्याक कष्टकरी समाजाच्या अंतरंगातील वेदनांचा ठाव घेऊन त्याचे प्रकटीकरण करण्याचा खुला विचारमंच म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन होय. आता ओबीसी जातवार जनगणनेच्या ध्यासाने पेटलेल्या ओबीसीच्या विद्रोहाकडे वळलेल्या पावलांनी प्रस्थापित साहित्य संमेलनात काय शिल्लक राहिल याचा अंदाज येऊ शकेल. मागील वर्षी वर्धा नगरीत विद्रोही साहित्य संमेलनातून त्याची रंगीत तालीम दिसून आली.
मराठीचा सदाशिवपेठी बाज उतरवत महाराष्ट्रीय कोकणी, मालवणी, आगरी, कोळी, खान्देशी माणदेशी,कोल्हापुरी नागपुरी, वऱ्हाडी, झाडीबोली, गोरमाटी, कोलामी इ. च्या साजाने नटलेली माय मराठी अहिराणीच्या माधुर्याने माणसांच्या हृदयांना सांधत आहे. आणि प्रस्थापितांच्या फडात मग शिल्लक काय ते असणार? मनु, वामन, परशुराम, टिळक, चिपळूणकर, सावरकर, गोडसे, गोळवलकर हीच वंशावळ.
फुले कालीन मराठी ग्रंथकार सभेची जी दीनवाणी अवस्था होती त्यापेक्षा वेगळी आजही नाही. साहित्य संमेलनाच्या नावाने केवळ ब्रम्ह्याच्या मुखातून जनलेल्या सारस्वतांच्या सगेसोयऱ्यांचे खानपान मानपान यावरुन अपयशी साहित्य संमेलन टीकेचे लक्ष होत आहे. सरकारी बिदागीतून अर्थात जनतेच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयांची राखरांगोळी करुन वांझोटी साहित्य संमेलनंं आता आणखीनच आक्रसत चालली आहे पण घालमोड्या दादांची मती ताळ्यावर यायची काही लक्षणे दिसत नाही.
विद्रोही साहित्य संमेलन प्रस्थापितांच्या साहित्य संमेलनाला आव्हान देत सामोरासामोर आयोजित केले जाते. ब्राम्हणेतर समाजाच्या स्वयंस्फूर्तीने सहभागाने सत्यशोधक चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली. शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अशा सर्व अंगाने प्रबोधनाच्या पातळीवर पर्यायी व्यवस्था उभी राहत ऐतिहासिक पुनर्मांडणी होत गेली. यात तनमनधनाने, प्रसंगी पदरमोड करून सामाजिक प्रबोधनाचा दैदिप्यमान इतिहास आहे. हीच सत्यशोधकी परंपरा विद्रोहीचीही कायम राहिली आहे. 'एकमूठ धान्य आणि एक रुपया' सामान्य जनतेतून जमा करुन कष्टकरी समाजाच्या पैशातून संमेलन भरवले जाते. कष्टात असलेले प्रतिकाराचे बळ शोषणाविरुद्धचा लढा जिवंत ठेवण्यासाठी पुरेसे आहे. आणि म्हणून श्रमण संस्कृतीचा झेंडा हातात घेऊन अंमळनेरला निघालेली विद्रोहाची वारी प्रचंड आनंददायी, आश्वासक, उत्साहवर्धक ठरणार आहे.
- अनुज हुलके
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule