मागील वर्षी वर्धा आणि यावर्षी अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भेटायला आले. विद्रोहीच्या मांडवात प्रचंड लोकसहभाग, भारी उत्साह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मांडवात रिकाम्या खुर्च्या या पार्श्वभूमीवर दोन्ही संमेलने आपलीच हा गैरसमज पसरवण्यासाठी हे भेटीचे फार्स आहेत.
सतरावे विद्रोही साहित्य संमेलन वर्धा येथे अखिल भारतीयच्या आमनेसामने झाले. 4 व 5 फेब्रुवारी 2023 ला झालेले विद्रोही साहित्य संमेलन समतेचा आवाज बुलंद करणारे ठरले. त्यावेळी वर्धेच्या मुख्य रस्त्याने ओबीसी, दलित, आदिवासी शेतकरी, बहुजनांच्या जीवनातील सुखदुःखाचं दर्शन घडवणारी विद्रोहीची सांस्कृतिक विचार यात्रा बळीराज्याचा उद्घोष करताना दिसली. एक मूठ धान्य आणि एक रुपया सारख्या मोहिमेतून, गोरगरीब सामान्य जनांच्या पैशातून, लोकांच्या सहभागातून, सामान्य लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करणारे, बहुजनांच्या सांस्कृतिक, अस्मिता उजागर करणारे विद्रोही साहित्य संमेलन लोकांना आपले वाटले. कष्टकरी बहुजनांसाठी लढणाऱ्या साहित्यिकांकडे, वक्त्यांकडे असलेली सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक गुणवत्ता , वैचारिक प्रगल्भता, मानवी मूल्यांची स्पष्टता, लोकांनी विद्रोही साहित्य संमेलनात अनुभवली. आईची हत्या करणाऱ्या परशुराम आणि समतेचा विचार पुढे जाऊ नये या दुष्ट हेतुने महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेशी नातं जोडणाऱ्या अखिल भारतीयचे ढोंग करणाऱ्या संमेलनाकडे लोकांनी पाठ फिरवली. गोरगरिबांच्या करातून जमा झालेल्या सरकारी तिजोरीची लयलूट करुन पंचपक्वांनाच्या पंगती वाढल्या, प्रशासनाचा वापर केला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतरही मंत्री बोलावले, प्रचाराची भपकेबाजी केली तरीही लोकांनी खुर्च्या रिकाम्या ठेवल्या. विद्रोही साहित्य संमेलनात मंचावर राजकीय नेत्यांना स्थान न देता विचारवंतांना, शोषित लोकांसाठी लेखनी झिजविणाऱ्या साहित्यिकांचा मानसन्मान केला जातो. याउलट अखिल भारतीय मध्ये साहित्यिकांना दुय्यम स्थान देऊन राजकीय नेत्यांना महत्त्व दिले जाते. शेतकरी, कामगार,ओबीसी,दलित, आदिवासी,अल्पसंख्यांक, स्त्रिया,युवक, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर तर चर्चा टाळली जाते. त्याचा परिणाम लोकांनीही त्यांना टाळले. म्हणूनच वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती चपळगावकर यांनी विद्रोहीच्या मांडवात भेट दिली. त्यासाठी फोन करून वाजागाजा न करता आले. मंडपात बसले. त्यांचा विद्रोहीच्या मांडवात सन्मानही करण्यात आला.
मागील वर्षी महात्मा गांधी आणि विनोबा भावे तसेच संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचा वापर केला. परंतु गांधी का मरत नाही? या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक मा. चंद्रकांत वानखेडे विद्रोहीचे अध्यक्ष असल्याने, अखिल भारतीयचे बुरखे टराटरा फाडले गेले. लोकांमध्ये, मीडियामध्ये झालेल्या फटफजितीचा अनुभव अखिल भारतीयच्या गाठीशी असल्याने, यावर्षी अमळनेर मध्ये साने गुरुजी सारख्या सत्यशोधक विचाराच्या व्यक्तीमत्वाचा वापर करण्याचा बेत आखला गेला. करोडोचा सरकारी निधी आणि इतर मार्गाने मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला गेला. राजकीय कार्यक्रमासारखे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे मोठमोठे फलक लावण्यात आले. मिडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला. परंतु तरीही लोकांचा उडलेला विश्वास मिळवू शकले नाही. शेतकऱ्यांचे शोषण, दलित आदिवासींवर होणारे अन्याय अत्याचार, अल्पसंख्याक मुस्लिमांवर होणारे हल्ले, धार्मिक उन्माद,बलात्काऱ्यांची सुटका आणि मिरवणूक, बेरोजगारी, सरकारी नोकर भरती होत नाही आणि खासगीकरणाचा सपाटा इत्यादी कष्टकरी बहुजन समाजाच्या प्रश्नावर भूमिका घेऊन लोकांच्या बाजुने तोंडही उघडायला तयार नसलेल्या साहित्यिकांचा भरणा असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला अमळनेर मध्येही लोकांनी प्रतिसाद दिला नाही.
दुसरीकडे वर्धेतील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचंड लोक सहभागाने, अखिल भारतीय वाल्यांचा सनातनी चेहरा लोकांसमोर आणण्यात यशस्वी झाल्याच्या अनुभवाने विद्रोहींचा उत्साह देखील वाढलेला होता. विद्रोहीचा वाढत चाललेला प्रवाह अमळनेरला आणखी मोठा झाला. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष मा. प्रतिमा परदेशी आणि संघटक किशोर ढमाले यांनी सत्यशोधकी विचाराच्या विविध पुरोगामी, जनवादी संघटनांची मोट बांधून कसदार विचारवंत, साहित्यिकांचा एकोपा घडवून आणला. बहुजनांचा अस्सल सांस्कृतिक वारसा उजागर करणारी गीते, कविता, लोकनृत्ये, विविध विषयावरील गटचर्चा, आकर्षक विचार यात्रा, विविध जाती, धर्म, भौगोलिक विभागातील साहित्यिक, कार्यकर्त्यांचा सहभाग, सर्वांना प्रवेश, कोणतीही नोंदणी फी नाही, युवक, विद्यार्थी, महिलांचा सहभाग, शिल्पकला, चित्रकला प्रदर्शन इत्यादी वैशिष्टयपूर्ण कृती कार्यक्रम, चर्चासत्रे, रॅपसॉंग, कविसंमेलन, गझल कट्टा, विद्रोही जीवनगौरव पुरस्कार ही विद्रोही साहित्य संमेलनाची वैशिष्ट्ये आहेत. ह्या वैशिष्टयांमुळेच अमळनेरचे विद्रोही साहित्य संमेलन लोकांना आपले वाटले. लोकांची भरगच्च उपस्थिती हेही विद्रोहीचे वैशिष्ट्य ठरले.
प्रख्यात ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन दिशादर्शक ठरले. तसेच प्रख्यात शोध पत्रकार आणि निडर विचारवंत मा. निरंजन टकले यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान तरुणांमध्ये उर्जा भरणारे होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, दडपशाहीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांचा, अध्यक्षांचा सन्मान करण्याची परंपरा विद्रोहीची व्याप्ती वाढविणारी ठरत आहे. यामुळेच वर्धा येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत वानखेडे, मुख्य संयोजक डॉ.अशोक चोपडे, स्वागताध्यक्ष नितेश कराळे, आयोजन समितीतील कपील थुटे,राजेंद्र कळसाईत, श्रेया गोडे, डॉ.विद्या कळसाईत,मिराताई इंगोले, चित्रकार नानु नेवरे इत्यादींना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले. 17 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनातील ज्येष्ठ सत्यशोधक मार्गदर्शक माजी प्राचार्य जनार्दन देवतळे आणि मा. हिराचंद बोरकुटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वर्धा येथील प्रचंड यशस्वी झालेल्या विद्रोही संमेलनापेक्षाही अधिक गर्दी अमळनेर येथील 18व्या विद्रोही साहित्य संमेलनात झाली. मंडपात खुर्च्या अपुऱ्या पडल्या तरी लोकांनी उभे राहून संमेलनातील विचारमंथनाचा लाभ घेतला. सांस्कृतिक विचारयात्रा, उद्धाटनापासून समारोपापर्यंत मंडप भरगच्च राहिला. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अमळनेर येथील मुख्य संयोजक प्रा. लिलाधर पाटील, स्वागताध्यक्ष श्याम पाटील समन्वयक अशोक पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रचंड कष्टातून विद्रोहीचे संमेलन कमालीचे यशस्वी झाले. खऱ्या अर्थाने लोकसंमेलन झाले. याउलट अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खुर्च्या रिकाम्या राहिल्या. विद्यार्थ्यांना बसवून मंडप भरण्याचा प्रयत्न झाला, तरीही विद्यार्थी फार वेळ बसू शकले नाही. आणि रिकाम्या खुर्च्यांची प्रचंड गर्दी अशी स्थिती झाली. आपल्या कराचे पैसे खर्चून, उधळपट्टी केली जाते परंतु लोकांच्या प्रश्नांना, जातिव्यवस्थेच्या प्रश्नांना, बेरोजगारी, महागाईच्या प्रश्नांवर, ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ठोस भूमिका न घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खुर्च्या लोकांनी रिकाम्या ठेवून निषेध व्यक्त केला. एवढी फजिती झाल्यानंतरही झालेल्या ठरावांमध्ये याची पुरेशी नोंद घेतलेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीयचे संमेलनाध्यक्ष मा. रवींद्र शोभणे विद्रोहीच्या मंडपाला भेट देतात. चर्चासत्र सुरू असताना, राजकीय नेत्याप्रमाणे, सोबत दहावीस लोकांचा घोळका घेऊन विद्रोहीच्या मंडपातील लोकांना हात दाखवत मंचाकडे येतात. चर्चासत्र सुरू असताना अशाप्रकारे व्यत्यय आणणे हे शोभणेंचे अशोभनिय वर्तन बघून त्यांना बाजूला करण्याची भूमिका विद्रोहीचे मा. किशोर ढमाले यांनी घेतली. त्यांनी योग्य भूमिका घेतल्याची चर्चा लोकांमध्ये होती. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणे ही बळीवंशाची परंपरा असल्याचे काही सन्माननिय लोकांना वाटत होते. बळीराजाच्या याच गुणाचा फायदा घेत वामनाने घात केल्याची चर्चा देखील होती.
मा. रविंद्र शोभणे यांनी विद्रोहीच्या मांडवात न बोलावता येणे आणि हेही आमचेच संमेलन आहे, येथील लोकदेखील आमचीच आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा गांभीर्याने सत्यशोधक विद्रोही विचारवंतांनी विचार करणे आवश्यक आहे. मिडियाने तशा नोंदी करून ठेवल्या आहेत. आपण देखील आपल्या सांस्कृतिक संघर्षाच्या नोंदी करून ठेवल्या नाही तर विद्रोही संमेलन पण आम्हीच भरवत होतो, असा गैरसमज पेरुन लोकांना भ्रमित करण्याची संधी भविष्यात साधली जाऊ शकते.
बळीराजा आणि वामन संघर्ष हा दोन परस्पर विरोधी संस्कृतीचा संघर्ष असल्याचे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. ग्रंथकार सभा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे नाते स्पष्ट आहे. अखिल भारतीय नाव घेऊन सनातनी व्यवहार अनेकदा स्पष्ट झाले. वामन परशुरामाला आदर्श माणणारे कदापि स्त्री शूद्रातिशूद्र बहुजन समाजाचे हितैसी होऊ शकत नाही. मा. रविंद्र शोभणे सनातनी पालखी खांद्यावर ठेवून विद्रोहीशी नातं सांगू शकत नाही. सनातन्यांच्या फायद्यासाठी राबणाऱ्या शोभणेंनी विद्रोही कडून सन्मानाची अपेक्षा का करावी? विद्रोहीशी नातं सांगायचं असेल, सन्मानाची अपेक्षा असेल तर ग्रंथकार सभेची भूमिका,अखिल भारतीय मराठी महामंडळांचा सनातनी व्यवहाराची जाणीव झाल्याने त्यांच्याशी काडीमोड घेतल्याचे जाहीर केले पाहिजे. त्यांचे प्रतिनिधी बणून, त्यांच्या पालखीचे भोई बनून विद्रोहीशी नातं जोडणे म्हणजे लोकांना आणि स्वतःलाही फसवण्याचा प्रकार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका दालनाला 'महात्मा फुले ते रविंद्र शोभणे', असे नाव देण्यातून आपले बुद्धी दारिद्र्य आणि विकृतपणाचे प्रदर्शन केले. हे अशोभनियच नव्हे तर निषेधार्ह कृत्य आहे. ह्या चुका आहेत की जाणून बुजून समतावादी परंपरेचा अपमान करण्याचे नियोजन आहे, याचीही चर्चा लोकं करणार आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule