डियर आनंद,
कर्नाटकचा 'राष्ट्रीय बसव पुरस्कार' तुम्हाला प्रदान करण्यात आला ही बातमी ऐकून आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. या देशाला लागलेल्या जातीव्यवस्था नामक सनातन रोगाची बदलत्या वास्तवासह आपण जनतेला ओळख करून दिली. जातिव्यवस्था अंताचा व्यवहारिक रोड मॅप सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुक्ती प्रतीकाचे दैवीकरण व ब्राह्मणीकरण होत असताना डॉ. आंबेडकरांच्या समग्र विचार- व्यवहार आणि जीवन संघर्षाची फेरमांडणी करून आपण जातीव्यवस्था अंताच्या लोकशाही क्रांतीचे चक्र गतिमान केले.
या दुर्मिळ व युनिक योगदानामुळे जात वर्ग स्त्री दास्य अंताची चळवळ वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ झाली तसेच समजदारी व व्यवहाराच्या पातळीवर अधिक अचूक, सटीक आणि सखोल होत गेली. तुमच्या विश्लेषणाने जसे व्यक्तिगत चिंतनामधले गुंते सोडवलेत तसेच समूहातले वैचारिक अंतर्विरोध ही सोडवलेत. ज्यांना प्रामाणिकपणे या व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणायचं आहे अशांनी तुमच्य विश्लेषणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि ज्यांना दुकान चालवायचे अशांनी तुमचं चित्र वेगवेगळ्या शिक्क्यांनी रंगवण्याची खेळी खेळलीये. फॅसिस्ट राजवटीने कधी तुम्हाला माओवादी म्हणून तर कधी मायावी आंबेडकरवादी म्हणून अपप्रचारित करण्याचा सतत प्रयत्न केला. 'अर्बन नक्षल' म्हणून तुरुंगवासही घडवला. मात्र आयुष्यातल्या अशा बऱ्याच दमन हल्ल्यांना तुमच्या शब्दांनी कधीच भीक घातली नाही. तुमचे शब्द कधीच दडपले गेले नाहीत. उलट ते अधिकाधिक धारदार आणि परखड होत गेलेत. निर्भीड होत गेलेत. ही धारदार मांडणी, अकाट्य तर्क, खोलवर विश्लेषण व जीवन संघर्ष आपणास एक पब्लिक इंटेलेक्च्युल मध्ये रूपांतरित करते.
एका राज्यातील फॅसिस्ट राजवटीने तुम्हाला देशद्रोही आणि दहशतवादी सांगून तुरुंग कोठडीत सडवलं. पण जामिनावर बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कर्नाटक सरकार तर्फे 'बसव राष्ट्रीय पुरस्कार' माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करणे ही घटना आजच्या अंधार युगातील एक छोटीसी प्रकाशाची किरण म्हणून पाहता येते. बाराव्या शतकातील जातीस्त्रीदास्य व्यवस्था विरोधातील विद्रोही जननायक बसवेश्वर यांच्या नावाचा राष्ट्रीय पुरस्कार दहशतवादाच्या आरोपात अडीच वर्षे तुरुंगात घालवून आलेल्या तुम्हाला मिळणे म्हणूनच ही एक अपूर्व अशी घटना आहे. सत्ताधारी वर्गामध्ये ही एक छोटा वर्ग हिंदुत्व ब्राह्मणी फॅसीझम विरोधात एक खंबीर भूमिका घेऊन हळूहळू उभा होताना दिसतो आहे. हेच या सोहळ्यानिमित्ताने दिसून आले. जात वर्ग स्त्रीदास्यअंताच्या व फॅसीझम विरोधात लढणाऱ्या शक्तींचा एक महाप्रभाव बनेल अशी अपेक्षा या सोहळ्यातून जागी झालेली आहे. म्हणून तुम्हाला मिळालेल्या या पुरस्काराचे आम्हाला अनन्य महत्व वाटते.
आजपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनेकानेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. पुरस्कारासाठी वा पुरस्कारामुळे हुरळून जाऊन भरकटताना तसेच भूमिका ऍडजस्ट करून सेटल होताना कैक लोकांना पाहिलेलं आहे. मात्र तुम्ही या जा वर्ग स्त्री दास्य अंताच्या संघर्ष भूमीत पाळंमूळं खोल रोवून असलेल्या स्व-अस्तित्वाला कधीच हवेत जाऊ दिलेलं नाहीये. तुमच्या भूमिकांमधला, विश्लेषणामधला क्रांतिकारी प्रगल्भ रॅडिकलपणा तुम्ही कधीच ऍडजस्ट केलेला नाहीये. तेव्हा आत असो वा बाहेर, अविचल निष्ठेने कार्यरत असणाऱ्या डॉ. आनंद तेलतुंबडे या आमच्या सहआरोपीस 'बसव राष्ट्रीय पुरस्कार' मिळाल्याबद्दल आम्हा 'एल्गार परिषद' खटल्यातील बंद्यांकडून क्रांतिकारी सदिच्छा व अभिनंदन!
- BK-7
(तळोजा मध्यवर्ती कारागृह)
2 फेब्रुवारी 2024