धुळे - राज्यकत्यांनी आदिवासींचे ब्राह्मणीकरण करून जल, जंगल, जमिनीतून उठविले आहे. वनहक्क कायदा होऊनही सात बारा नाही, यावर संघटितपणे आंदोलन करणे हाच उपाय आहे, असे प्रतिपादन किशोर ढमाले यांनी केले.
आदिवासी गौरव दिनानिमित्त दहिवेल (ता. साक्री) येथे कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. वंजी गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यशवंत माळचे, सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले आदी प्रमुख पाहुणे होते. गौरव दिनानिमित्त दहिवेल गावातून महामानवांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या सत्याच्या अखंडने कार्यक्रमाची सुरवात झाली. मिरवणुकीचे रूपांतर नंतर सभेत झाले. यशवंत माळचे, सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, दीपक जगताप यांनी आदिवासींच्या व्यथा मांडल्या. आदिवासींसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजवंदन करू देणार नाही, असेही जाहीर करण्यात आले. दहिवेल येथे १४ ऑगस्टला 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात येईल, असे ठरले. राकेश सोनवणे, लालाबाई भोये, जीवन गावित, विकास महिरे आदींसह मोठ्या संख्येने स्त्री- पुरुष उपस्थित होते. अश्पाक कुरेशी यांनी सूत्रसंचालन केले.
सत्यशोधक कष्टकरी सभेतर्फे बोरविहीर (ता. धुळे) येथे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रम झाला. झिपाभाऊ सोनवणे अध्यक्षस्थानी होते. सत्यशोधक सभेचे मन्साराम पवार, सुरेश मोरे, लाजरस गावित, रामदास सोनवणे प्रमुख पाहुणे होते. आदिवासी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न, समस्यांवर मनोगत व्यक्त केले. शासन आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आक्रोश व्यक्त करण्यात आला. आदिवासींसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास गरताड (ता. धुळे) येथे १४ ऑगस्टला रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष उपस्थित होते. सुरेश मोरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. महेंद्र सोनवणे, बाळू सोनवणे, प्रकाश सोनवणे, रतन सोनवणे, भरत सोनवणे आदींनी संयोजन केले.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule