कृष्णराव भालेकरांनी १८७२ साली महात्मा जोतीरावांच्या पहिल्या भेटीत मुठेच्या काठी रोकडो बुवाच्या मंदिरात मंडप व स्टेज तयार करुन अज्ञानराव मोठे देशमुख व श्री सत्यनारायण पुराणिक असे दोन उपहास गर्भ वग जोतीराव फुलेंच्या उपस्थितीत सादर केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात जे सत्यशोधकी जलसे निघाले त्यांचे उगमस्थान कृष्णराव भालेकरांच्या वगात सापडते. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी त्यांना अज्ञान, अंधश्रद्धा व अस्पृश्यता इत्यादी मधून बाहेर काढण्यासाठी सत्यशोधक जलशाची भूमिका अत्यंत महत्वाची होती.
ओतुरचे भीमराव महामुनी, भइलवाडी भाऊराव पाटील, कासेगावचे तात्याबा पाटील, बेलुरचे शंकरराव पाटील, काले येथील रामचंद्र घाडगे, शिवभर येथील आबासाहेब फाळके, सातारचे जोत्याजीराव फाळके, कोल्हापुरचे बापूराव घाडगे इत्यादी जलसाकाराचे जलसे महाराष्ट्रभर प्रबोधन करीत होते. भीमराव महामुनी या पहिल्या जलसाकाराचा जलसा सर्वप्रथम विदर्भात झाला. तत्पुर्वी विदर्भात हरिचा जलसा म्हणून गुलाबराव नायगावकरांचा जलसा प्रसिद्ध होता. चिखलीचे पंढरीनाथ पाटील यांच्या सहकार्याने जलशाची निर्मिती होत होती. करजगावकर मंडळीसुद्धा जलशाच्या माध्यमातून प्रबोधन करीत होती. जुन्या अकोला जिल्ह्यात व आताच्या नवीन वाशीम जिल्ह्यात समाष्टि असलेल्या मानोरा तालुक्यातील विठोली या गावात रामजी हागे पाटील यांचा सत्यशोधक जलसा प्रसिद्धीला पावला होता. हागे पाटील यांच्या जलशाने मोठ्या प्रमाणात लोकजागृती केली होती. स्वातंत्र्य चळवळीपर्यंत त्यांच्या जशाचा प्रभाव होता.
रामजी हागे पाटील यांचा जन्म ग्राम विठोली, मानोरा- दिग्रस रोडवरील मनोऱ्यापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असणाऱ्या छोट्याशा खेड्यात, एका कुणबी शेतकरी-शेतमजूर कुटुंबात झाला. त्यांचे वडील भगाजी पाटील हे शेतमजुरीचे काम करीत असत. रामजी पाटील यांचे शिक्षण जेमतेमचं झाले होते. शास्त्री नारोबाजी महाधट पाटील या भागात येऊन गेले होते. पंढरीनाथ पाटलांच्या कार्याचा सुद्धा रामजी पाटलावर प्रभाव पडला असावा. त्यानंतर त्यांनी आपली संपूर्ण ह्यात जलशाचा माध्यमातून बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी घालवली.
१९९८ साली अकोला येथे आठवी सत्यशोधक परिषद झाली. त्या परिषदेला रामजी पाटील उपस्थित होते. त्या परिषदेमध्ये झालेल्या पंधरा ठरावाप्रमाणे रामजी पाटलांना प्रत्यक्ष कार्य गावात केले. या दरम्यान त्यांनी गावात प्राथमिक शाळा काढली. इंग्रजी वर्ग चालवणारी या भागा- तील ही पहिली शाळा होती. भूताराम तेली महिंद्रे, सूर्यभान इंगोले, बालाजी पाटील, गणाजी मिसाळ यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे शिक्षणही येथील प्राथमिक शाळेमध्ये झाले.
स्त्री शिक्षणास उत्तेजन देण्यासाठी त्यांनी घरापासूनच सुरुवात केली. त्यांची सून सुगंधाबाई यांचे नाव सर्वप्रथम शाळेत घातले. गिरोली येथील वस्ताद के. एस. कांबळे यांचे शालेय शिक्षण विठोली येथेच झाले. त्यांच्यावर रामजी पाटलाच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता.
१९१७ साली खामगाव येथे अ. भा. मराठा शिक्षण परिषद झाली त्या परिषदेमधील राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण विषयक विचारांचा प्रभाव कुणबी-मराठा व तत्सम जातींवर पडलेला दिसून येतो. हा काळ बहुजन समाजाच्या प्रचंड मानसिक उलथा- पालथींचा काळ होता. ब्राम्हणेत्तर सत्यशोधक चळवळीने परमोच्च बिंदू गाठला होता. डॉ. पंजाबरा देशमुख यांच्य नेतृत्वाखाली वऱ्हाडात ब्राम्हणेत्तर चळवळ जोगत होती. त्या प्रेरणेने अनेक कार्यकर्त्यांनी १९२४-२५ साली वसतीगृहाची स्थापना केली. त्याच दरम्यान विठोलीत रामजी हागे पाटीलांनी सुद्धा बोर्डींग काढले. गरीब, अनाथ, इतर मागासवर्गीय मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची सोय त्यांनी केली. त्यांच्या घराच्या जागेतच हे बोर्डींग चालू करण्यात आले होते. त्यांची बहीण झांबराबाई यांनी स्वतः बोर्डीगातील मुलांना भाकरी करुन खाऊ घातल्या. यावरुन रामजी पाटील यांचे संपूर्ण घरच याकामी गुंतले होते असे दिसते.
रामजी हागे पाटील यांच्या सत्यशोधकी जलशाच्या प्रभावाने विठोलीत बरीच वर्षेपर्यंत धार्मिक विधी ब्राम्हणांच्या हातून होत नव्हते. तसेच गावात नवरदेव पारावर जात नव्हता. पाटलांनी स्वतः च्या घरातील देव व महालक्ष्मीचे मुखवटे घराच्या भिंतीच्या पायात पुरवून टाकले होते. यावरून ते किती कट्टर सत्यशोधक होते. याचा अंदाज येतो. त्यांच्यावर कबीरांच्या विचारांचाही प्रभाव होता. त्यांच्याजवळ कबीरकृत पदे, दोहरे व कबीर बिजक मूल अशी पुस्तकेही होती.
त्यांच्या जलशाचे कार्यक्रम आजूबाजूच्या परिसरात होत होते. सोयजना, कोंडोली, वग- ली व सोमठाणा इत्यादी गावतसुद्धा त्यांच्या जलसाचे प्रयोग होत होते. त्यांच्या जलशाला मानोरा, मंगरूळपीर व कारंजा भागातून मागणी येत होती. धावंडा येथील आप्पाराव नावाचा कलाकार त्यांच्या जलशात स्त्री पात्र करायचा. तेरवी, पिंडदान व इतर धर्मभोळ्या रुढीपरंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. जलशाच्या माध्यमातून त्यांनी बहूजन समाजाला जागृत करण्यासाठी कार्य केले. रामजी पाटील यांच्या कार्याचा प्रभाव आजही विठोलीत व परिसरात दिसून येतो. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून गावकऱ्यांनी त्यांचा व भूताराम तेली (महिंद्रे) यांचा पुतळा जि. प. प्राथमिक शाळेत उभारला होता.
आज मात्र रामजी पाटील यांच्या सत्यशोधकी जलशाचे पदे लिखीत स्वरूपात मिळत नाही. त्याचा शोधक घेऊनही ते सापडत नाही. याची खंत आहेच. शिवाय त्यांचा पुतळा ज्याठिकाणी उभारला होता. त्याची ही हेळसांड झालेली दिसून येते. यावरून बहुजन समाजाला आजही आपल्या प्रेरणांची योग्य तऱ्हेने जोपासना करता येत नाही, असे दिसून येते. अक्षर साहित्याचे महत्व अज्ञानापोटी त्यांच्याजवळ आजही नाही. कालही नव्हते. याचे कारण म्हणजे या व्यवस्थेने त्यांचे महत्वच त्याला कळू दिले नाही. हे अशा घटनावरुन व्यक्तीचरित्रावरुन स्पष्ट होते.
सतीश जामोदकर, अखंड १२८, चंद्रावतीनगर, साईनगरजवळ अमरावती
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Savitri Mata Phule