कोल्हापूर : महाराष्ट्र हा फुले-शाहू- आंबेडकर यांची भूमी म्हणून ओळखली जातो. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात या थोर पुरुषांचे समतेचे विचार पुढे नेण्याचा, जातपात नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणून यापुढे हा महाराष्ट्र पानसरे यांचीही भूमी म्हणूनही ओळखला जाईल अशा शब्दात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव खासदार डी. राजा यांनी मंगळवारी येथे पानसरे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांचे स्मारक तरुणांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. पानसरे यांच्या कार्याचे कौतुक करतानाच डी. राजा यांनी केंद्र सरकारच्या कार्यावर हल्ला चढवला. पुरोगामी विचारांचा जागर यानिमित्ताने झाला. ते म्हणाले, वर्षाला दोन कोटी रोजगार, काळ्या पैशातून जमा होणाऱ्या रक्कमेपैकी पंधरा लाख रुपये देण्याची गॅरंटी दिली होती त्याचे काय झाले, असे विचारण्याची वेळ आता आली आहे.
या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जात आहे. १४६ खासदारांना निलंबित केले जाते. देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे. राज्यघटना पायदळी तुडवली जात आहे. बेरोजगारी, महागाई वाढत आहे. धर्माधिष्टीत राजकारण केले जात आहे. अशा वेळी पानसरे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची नक्कीच आठवण येते.
राष्ट्रीय सचिव भालचंद्र कानगो म्हणाले, शाहूंचा वैचारिक वारसा पानसरे यांनी सातत्याने जपला. माणसा माणसात भेद, द्वेष निर्माण केले जात आहेत. अशा काळात पानसरे यांचे विचार अधोरेखीत करणारे आहे. मनुष्य मरतो, पण त्याचे विचार मरणार नाहीत. अशा विचार संपविण्यासाठी हत्त्या करणाऱ्या प्रवृत्तींना कोल्हापूरची जनता स्थान देणार नाही.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, पानसरे संपूर्ण आयुष्य गोरगरीब, कष्टकऱ्यांसाठी जगले. समाजाला त्यांनी विवेकवाद, धर्माची चिकित्सा करायला शिकवले. त्यांचे स्मारक समतेची विचाराची प्रेरणा देणारे आहे.
माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी प्रास्ताविकात पानसरे यांच्या कार्याची माहिती दिली. सतिशचंद्र कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी स्मिता पानसरे, विजय देवणे यांचीही भाषणे झाली. या सोहळ्यात पानसरे यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली. स्मरणिकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. सुत्रसंचलन रसिया पडळकर हिने केले.
पानसरे यांचे स्मारक होण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी निधी कमी पडून दिला नाही. एकवेळ काम थांबले असताना त्यांनी भेट दिली. पैसे कमी पडले तर मी माझ्या जवळचे देतो, पण काम थांबवू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या. पानसरे यांचे स्मारक त्यांच्यामुळेच झाले, असे सतिशचंद्र कांबळे यांनी सांगितले. हाच धागा पकडत आमदार बाळासाहेब थोरात यांनी समतेचा विचार देणारे स्मारक उभे केल्याबद्दल सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. खासदार डी. राजा यांनीही त्यांचे कौतुक केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan