अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे राहुल युवक मंडळ आयोजित. शनिवार दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२४ स्थळ : डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह पापड, ता. नांदगाव, जि. अमरावती, पाचवे ग्रामिण आंबेडकरी साहित्य संमेलन भूमिका
आंबेडकरी बांधवानो
सप्रेम जयभीम
साहित्य प्रवाहापासून कोणत्याही समूह वंचित आणि अलिप्त राहु नये. प्रत्येक समुहाच्या आशा, आकांक्षा, महत्वकांक्षा, वैचारिकता साहित्यातून पुढे आल्या पाहीजे. केवळ दु:ख, वेदना आणि अन्यायाचा आलेख मांडणे म्हणजे साहित्य नव्हे तर अन्यायाचा प्रतिकार, अन्यायाचा प्रतिबंध आणि दुःखमुक्तीची प्रेरणा सुद्धा साहित्याने दिली पाहीजे. मूल्यभान असणारे साहित्यच अशी प्रेरणा देऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेल्या मानवमुक्तीच्या लढ्याचे साहित्य हे एक साधन आहे आणि प्रबुद्ध माणुस निर्माण करणे हे या लढ्याचे साध्य आहे. अशा साहित्याला आ आंबेडकरी साहित्य असे म्हणतो.
मूल्यांतराच्या देदीम्यमान घटनेने ग्रामिण भागातील एक समूह आतंरबाह्य बदलला. स्वाभिमानाने तेज:पुंज झाला. ही तेजस्विता केवळ विशिष्ट समूहापर्यंत मर्यादित राहीली नाही तर आसपासच्या माणसांना सुद्धा प्रभावित करुन गेली. सुरुवातीच्या काळातील परकेपणाची जागा आपलेपणाने, सामंजस्याने घेतली. अलिकडच्या काळात आंबेडकरी विचार हाच आपल्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग असल्याची जाणीव बहुसंख्य आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागास असणाऱ्या समुहाला झाली आहे. द्वेषाचा अंधार दूर झाला असून बदलेल्या काळात सर्वांनी एकत्र येऊन देशातील अव्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष केला पाहिले ही भावना तिव्र होत आहे.
१९९० नंतर मुक्त अर्थव्यवस्थेतून जन्माला आलेल्या खाऊजा धोरणाने आणि अलिकडच्या दहा वर्षात कल्याणकारी राज्य या संकल्पनेला गुंडाळून ठेवल्यामुळे कृषी संस्कृतीला जबर हादरा बसला. जमीनिच्या तुकडेकरणातून आणि बेरोजगारीतून शेतीवरचे अवलंबित अधिकाधिक वाढत गेले. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शेती व्यवसायात नको तेवढा हस्तक्षेप वाढला परिणामी बऱ्यापैकी नफ्यात असलेली पारंपारिक आणि नैसर्गिक शेती तोट्यात आली. तथाकथित विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेऊन त्यांना शेतीमुक्त करुन भिकेला लावण्यात आले. समकाळात भांडवलशाही आणि ब्राम्हणशाहीने हातात हात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थाच गिळंकृत केली आहे. हे भिषण वास्तव ज्या टोकदारपणे साहित्यात यायला हवे होते ते आले नाही कारण पारंपरिक ग्रामीण साहित्याने वैचारिक बांधिलकी स्वीकारली नाही. शेतकरी स्वहत्या अधोरेखित करणारी कथा, कविता, कांदबरी शेतकरी स्वहत्येसाठी जबाबदार असणाऱ्या शासनाकडून पुरस्कृत होण्यात गैर वाटले नाही. हा वैचारीक बांधिलकी नसण्याचा प्रकार आहे. अलीकडे यशस्वी झालेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाला नाही ते कशाचे द्योतक आहे याचाही विचार झाला पाहीजे.
ग्रामीण साहित्य हे आंदोलनाचे आणि आंदोलकांचे साहित्य झाले पाहिजे. आंबेडकरी तत्वनिष्ठेतूनच हे शक्य होणार आहे. त्यासाठी आंबेडकरी साहित्य प्रवाह समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचणे काळाजी गरज आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी ग्रामीण माणसांच्या शोषणाची चिकित्सा केली. धर्म सामान्य माणसाचा कसा छळ करतो याची वैज्ञानिक मांडणी फुल्यांनी केली. सत्यशोधकी विचार स्विकारण्याचा आग्रह धरला. हा आग्रह केवळ निरक्षर लोकांसाठीच नव्हता तर शिकल्या सवरल्या बुद्धीजीवी लोकांची सुद्धा याचे अनुकरण करणे अपेक्षित होते. ब्राह्मणेतर असलेली महात्मा फुल्यांची चळवळ कधी ब्राह्मणी छावणीत दाखल झाली हे कळलेच नाही. जातीयतेचे आणि धर्माधतेचे लोन गाव खेड्यात सुद्धा पोहोचले आहे. आपसी द्वेषाला उत्तेजन देऊन माणसांची विभागणी करणाऱ्या धर्मांध संघटनेचे बोर्ड गावागावामध्ये उभे झाले आहेत ही गाव या घटकासाठी धोक्याची घंटा आहे. परस्परांतील असहिष्णुता वाढण्यासाठी अशा अनेक घटना कारणीभूत आहेत. समाज माध्यमातून सामाजिक पर्यावरण दुषित करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. ग्रामीण जीवनासाठी ही वाईट बाब आहे.
महात्मा गांधीच्या मतानुसार आपापले धर्मभेद, जातीभेद कायम ठेवून ग्राम स्वराज आणणे हे आपले उद्दीष्ट नसुन धर्मविरहीत जातीविरहीत माणूस निर्माण करण्याला आपली प्राथमिकता आहे. त्यामुळे महात्मा गांधी नव्हे तर महात्मा फुले आपल्या ग्रामिण साहित्याच्या अधिक जवळचे आहे. थोडक्यात काय तर वर्णाश्रम धर्म नव्हे तर बुद्ध धर्म हाच आपल्या ग्रामीण साहित्याचा पाया आहे आणि असावा. ग्रामीण स्त्री ही आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या कष्टाचे मूल्य कमीच असते ही बाब स्त्री-पुरुष समानतेचा तत्वाला शह देणारी आहे.
ग्रामीण भागातील स्त्रियांच्या कष्टाचे उदात्तीकरण करुन त्यांच्यावर अधिकाधिक कष्ट लादणे हा हेतू नसून आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ग्रामीण स्त्रियांना सुसह्य सामाजिक आणि आर्थिक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. ग्रामीण स्त्री नवे आंबेडकरी आशयसूत्र घेऊन साहित्याच्या केंद्रस्थानी यावी ही आमची इच्छा आहे.
ग्रामीण जीवनातील व्यथा, वेदनांना रंजक करुन त्रयस्थ रसिकांच्या मनोरंजसाठी सादर करणे हाच बहुतेक पारंपारिक ग्रामीण साहित्याचा हेतू राहिलेला आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्य सरंजामी मानसिकतेतून बाहेर पडलेले नाही. ते या रंजनप्रियतेतून बाहेर पडावे आणि क्रांतीकारी परिवर्तनाच्या आशयाने तेजाळून उठावे ही आंबेडकरी साहित्याची भूमिका आहे.
ग्रामीण माणसांचे प्रश्न वैचारिक लढ्याच्या पृष्टभागावर यावे, ग्रामीण माणसांची चळवळ केवळ कर्जमाफी आणि शेतमालाचे भाव या भोवतीच केंद्रित असु नये तर ग्रामीण माणसाने मूल्यधिष्ठित लढाईसाठी सज्ज व्हावे यासाठी साहित्य हे महत्वाची भूमिका बजावू शकते. संवादाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे आणि ग्रामीण भागातून नव्या साहित्सिक प्रतिभा तेजस्वितेने बहरुन आल्या पाहीजेत यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन महत्वाचे ठरत असते. या सर्व बाबींचा विचार करुन परिवर्तनाचे ऐतिहासिक संदर्भ असलेल्या आणि समता, बंधुभावाचे अग्रदूत असलेल्या कृषितज्ज्ञ डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाच्या निमित्याने त्यांचे जन्मगाव असलेल्या पापळ या गावात अं. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे पाचवे आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करत आहोत. साहित्याच्या या महोत्सवातून क्रांतीकारी परिवर्तनाच्या वाटा प्रशस्त होतील याची आम्हाला खात्री आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी आपण सहकार्य करावे आणि सहकुटूंब उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती.
विनित
राहुल युवक मंडळ, पापळ
व
ग्राम पंचायत, पापळ