आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

आंबेडकरी साहित्य ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करणारे : संमेलनाध्यक्ष डॉ. प्रकाश खरात

     यवतमाळ - पारंपरिक मराठी साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण शहरी वाचकांना रूचीपालट म्हणून आले आहे. तोच तोपणा आलेल्या शहरी पांढरपेशा साहित्यापेक्षा वेगळी चव वाटावी म्हणून साहित्यात ग्रामीण चित्रण आले. पारंपरिक मराठी साहित्याच्या तथाकथित लेखकाला ग्रामीण माणसाचे दु:ख मांडण्यात फारसे स्वारस्य नव्हते. त्यांनी मनापासून ग्रामीण मनाचा शोध घेतला नाही. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणे म्हणजे ग्रामीण साहित्य नसून ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करू पाहणाऱ्या साहित्यालाच ग्रामीण साहित्य म्हणता येईल. म्हणून आंबेडकरी साहित्यच ग्रामीण माणसाच्या शोषणाचा अंत करेल असे प्रतिपादन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथे आयोजित पाचव्या आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खरात यांनी केले.

Ambedkar Gramin Sahitya Sammelan Inauguration     यावेळी विचार मंचावर उद्घाटक डॉ. वंदना महाजन, अतिथी डॉ. वामन गवई, डॉ. सीमा मेश्राम, स्वागताध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर खडसे आणि महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे उपस्थित होते. प्रकाश खरात म्हणाले ग्रामीण माणूस व त्याचे जीवन सुखात परिवर्तित करणे हीच खरी साहित्यिकाची लेखनकला होय. ग्रामीण जीवनाची व शोषित मानवी समाजाची पुनर्रचना करणे हेच साहित्याचे कार्य आहे. आंबेडकरी ग्रामीण साहित्याने मानवी मनाच्या व ग्रामीण जीवनाच्या परिवर्तनालाच महत्त्व दिले आहे. म्हणून आंबेडकरी ग्रामीण साहित्य पारंपरिक मराठी ग्रामीण साहित्यापेक्षा निराळे ठरले आहे.

Ambedkar Gramin Sahitya Sammelan Inauguration 2024     उद्घाटक डॉ. वंदना महाजन म्हणाल्या, सत्ता आणि साहित्य यांचा संबंध असतो. समग्र भूमिका न घेता अलीकडच्या काळात संमेलने घेण्यात येतात हे साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने वाईट आहे. आंबेडकरवादाची नव्याने आखणी करून माणसं जोडण्याची प्रक्रिया गतिमान केली पाहिजे. पारंपरिक ग्रामीण साहित्याने स्त्रियांच्या प्रश्नांना भिडण्याचे धाडस केलेले नाही. जातीचे प्रश्न सुटल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न सुटणार नाहीत. हे सत्य पारंपरिक ग्रामीण साहित्यिकांनी स्वीकारून साहित्य निर्मिती केली पाहिजे. साहित्यातून स्त्री समस्यांची मांडणी होणे गरजेचे आहे. आंबेडकरी साहित्यच खऱ्या अर्थाने ग्रामीण माणसाला न्याय देऊ शकते आणि त्यांना प्रतिष्ठा देऊ शकते. अतिथी डॉ. वामन गवई म्हणाले आंबेडकर ही व्यक्ती नसून जाणीव आहे. त्यामुळेच आंबेडकरी साहित्य हे जाणीवचे साहित्य आहे. आंबेडकरी साहित्य हे चळवळीतून आलेलं साहित्य आहे. श्रमिकांच्या दुःखाची मांडणी केवळ आंबेडकरी साहित्यातूनच होऊ शकते. यावेळी स्वागताध्यक्षीय मनोगत प्रा. ज्ञानेश्वर खडसे, महामंडळाची भूमिका डॉ.सीमा मेश्राम, प्रास्ताविक जनार्दन मेश्राम, सदिच्छा संदेश वाचन संजय मोखडे, कार्यक्रमाचे संचालन अश्विनी गडलिंग यांनी तर आभार बाळू खडसे यांनी मानले. संमेलनात परिसरातील साहित्य रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

मनुष्यत्वाच्या उत्थानाचा विचार साहित्यातून जोरकसपणे पुढे यावा : प्रशांत वंजारे

     यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे म्हणाले, अधिकाधिक लोकांपर्यंत साहित्य जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत साहित्याच्या कक्षा रुंदावणार नाहीत. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही श्रोते मराठी साहित्य संमेलनाच्या आलीशान मंडपात येत नसतील आपला साहित्य व्यवहार प्रस्थापितांनी तपासला पाहिजे. साहित्य आपल्या दारी ही भूमिका घेऊन ग्रामीण भागात आयोजित होणारे हे संमेलन अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील नवनवीन प्रतिभा या संमेलनाच्या निमित्ताने साहित्यात दाखल होतील आणि एकूणच मराठी साहित्याला नवा आयाम प्राप्त होईल. आंबेडकरी साहित्य हे मूल्यभान असणारे साहित्य असल्याने या साहित्यातून कोणताही माणूस वजा नाही. मनुष्यत्वाच्या उत्थानाचा विचार साहित्यातून जोरकसपणे पुढे आला पाहिजे असे आग्रह सुद्धा त्यांनी यावेळी केला.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209