विस्थापित मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून ऐरणीवर असताना निवडणुकीच्या तोंडावर शिंदे- पवार फडवणीस या तिघाडी सरकारने केवळ आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा समाजाची घोर फसवणूक केलेली असून मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेले मराठा आंदोलन विस्थापित मराठ्यांचे अर्थात गरीब मराठ्यांचे आहे, प्रस्थापित मराठ्यांनी त्यांच्या विविध निमशासकीय संस्थेत केवळ लाखो रुपये घेऊन नोकऱ्या दिल्या परंतु विस्थापित मराठा समाजाच्या तरुणांना उच्चशिक्षित असून देखील नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. आजही विस्थापित मराठा समाजाचे उच्चशिक्षित मुले रोजंदारीवर शेतात व इतरत्र काम करताना दिसतात, परंतु प्रस्थापित मराठ्यांना त्यांचे काही एक सोयर सुतक नसल्यामुळे प्रस्थापित मराठ्या विरुद्धचा आक्रोश मराठा आंदोलनात झालेल्या घोषणाबाजी वरून स्पष्ट दिसून आला आहे. त्यामुळे मराठा समाजातील विस्थापित व गरीब मराठ्यांनी मा. मनोज दादा जरांगे पाटील यांना नेता मानलेले असून मा. मनोज दादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय प्रमाण मानून विस्थापित गरीब मराठा समाजाने एक मुखाने मा. मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीर पणाने उभे राहण्याची गरज असून येणाऱ्या काळात मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या तिघाडी सरकारला मराठा समाजाने घरचा रस्ता दाखविणे गरजेचे असून प्रस्थापित मराठा आमदार, खासदारांनी विस्थापित मराठा समाजाची मते बळकावून पिढ्यानपिढ्या सत्ता काबीज केली परंतु विस्थापित मराठ्यांना न्याय देण्याचा कधीही प्रयत्न केलेला नाही. त्यामूळे त्यांना त्यांची जागा येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दाखवावी असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ड. नारायण गोले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.