चंद्रपूर : बहुजन मेडिकोज असोसिएशन आणि ओबीसी सेवा संघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि मॉ फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा शनिवार ६ जानेवारी रोजी मातोश्री विद्यालय तुकूम, चंद्रपूर येथे पार पडली. या स्पर्धेला राज्यभरातून तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित जातीव्यवस्थेचे निर्मूलन, कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि महात्मा ज्योतिबा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या तीन पुस्तकावर घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी घोषीत होणार आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम बक्षीस १० हजार रुपये, द्वितीय बक्षीस ७ हजार रुपये रोख, तृतीय बक्षीस ५ हजार रुपये रोख आणि २० प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहेत.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि महापुरुषांचे विचार आजच्या तरुण पिढीमध्ये पोहोचविण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आजची तरुण पिढी वाचनापासून दूर होत असल्याचे चित्र दिवसेंदिवस समाजामध्ये वाढत आहे. त्यामुळे अशा स्पर्धेच्या माध्यमातून वाचन संस्कृती बळकट होते, असे मत स्पर्धेचे मुख्य आयोजक डॉ. विवेक बांबोळे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बहुजन मेडिकोज असोसिएशनचे डॉ. विवेक बांबोळे, गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. सूर्यकांत खनके, ओबीसी सेवा संघांचे प्रा. अनिल डहाके, विचारज्योत फाउंडेशनचे सूरज पी. दहागावकर, विशाल शेंडे, प्रलय म्हशाखेत्री, मातोश्री विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule