चंद्रपूर - महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करावी, मराठ्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये यासह अन्य मागण्यांना घेऊन काढण्यात आलेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचा चंद्रपुरात समारोप करण्यात आला. वडगावफाटा ते दीक्षाभूमीपर्यंत पैदल मार्च यावेळी काढण्यात आला.
विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यातून ही यात्रा चंद्रपूर शहरात पोहोचली. ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोर्राम, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी, बामणीफाटा, बल्लारपूर, विसापूर नांदगावपोडे, कढोली, गडचांदूर, लखमापूर, बाखर्डी, निमणी, कवठाळा, भद्रावती येथे यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. १२ फेब्रुवारीला चंद्रपुरात यात्रेचे आगमन झाले. दीक्षाभूमी येथे यात्रेचा समारोप झाला. मित्रनगर येथे जाहीर सभा झाली. यावेळी उमेश कोराम, प्रा. अनिल डहाके, अॅड. सातपुते, प्रा. सूर्यकांत खनके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनस्वी संदीप गिर्हे यांनी, तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले. आयोजनाकरिता अॅड. विलास माथनकर, लक्ष्मणराव धोबे, विजय टोंगे, नंदू नागरकर, राजू बनकर, प्रा. नरेंद्र बोबडे, सुनील मुसळे, शैलेश जुमडे, विनोद राऊत, डॉ. ताटेवार, डॉ. संजय घाटे, अनिल धानोरकर, अॅड. जगदीप खोब्रागडे, डॉ. गावतुरे यांनी सहकार्य केले.