वडीगोद्री, ता. २९ : ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आजपर्यंत सरकारने म्हटलेले नाही. आरक्षणाबाबत ता. २९ सप्टेंबर रोजी ओबीसी प्रतिनिधींना सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते व ते आश्वासन सरकार नक्की पाळेल असा विश्वास राष्ट्रीय ओबीसी समाजाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला. वडीगोद्री येथे ता. ५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव साखळी उपोषणाला शुक्रवारी तायवाडे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते. यावेळी तायवाडे म्हणाले, सरकारने तीन महिन्यांत आपला शब्द बदललेला नाही. त्यामुळे आम्हाला सरकारवर विश्वास आहे. तरी ओबीसी समाज वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे. आम्ही कोणाला भीक नाही मागत. मात्र आम्हाला मिळालेले आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही साखळी उपोषण करीत आहोत.
महाराष्ट्रात ओबीसी समाज अजूनही वंचित आहे. महाज्योतीचा निधी नाही, त्यासाठी आम्ही मागणी केली आहे. प्रत्येक जिल्हा ठिकाणी १०० मुले, १०० मुलींसाठी दोन हॉस्टेल सुरु होणार आहेत.
कोणाला तरी वाटत होते की ओबीसी झोपलेला आहे, मात्र आम्ही झोपलेलो नाहीत. शासनाने जुनाच जीरआर काढला तर आम्ही काही म्हणालो नाही, मात्र सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीनंतर आम्ही विरोध केला. त्यामुळे सर्व ओबीसी समज जागृत झाला. मरठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी अशा आमच्या मागण्या आहेत.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission