चिमूर : मागील सात डिसेंबरपासून ओबीसींच्या विविध मागण्याकरिता चिमुरात तहसील कार्यालयासमोर दोन युवकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. सात दिवसानंतरही शासनाचे अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली नाही. सातव्या दिवशी अजित सुकारे यांनी शासनाला अल्टीमेटमही दिला होता. परंतु, संध्याकाळी उशिरा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी चिमुरात दाखल होत अजित सुकारे आणि अक्षय लांजेवार यांना निंबुपाणी पाजून उपोषण सोडविले.
ओबीसींच्या अनेक मागण्यांसाठी सरकारने १३ डिसेंबर रोजी शासन आदेश पारीत केला असून, ३१ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात ओबीसीकरिता नवीन ५२ वसतिगृह कार्यान्वित होणार असून यातील बरेच मागण्या पूर्ण होणार असल्याची माहिती देत उपोषणकर्ते अक्षय लांजेवार आणि अजित सुकारे यांना निंबुपाणी देत अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर आणि ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.