नागपूर: जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नाही. ती जाहीर करायचीही गरज नाही. एका बाजूला आपण जातीयता नष्ट व्हावी, असे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला जातनिहाय गणना करतो. त्यामुळे जातीगणनेला आमचा विरोध आहे. मात्र, आरक्षण दिलेच पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री, आमदार यांनी मंगळवारी सकाळी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गाडगे यांनी सर्व आमदार, मंत्र्यांशी संवाद साधला.
गाडगे म्हणाले, जात जन्मापासून मिळते. त्यामुळे जातीची मोजदाद करणे, ती जाहीर करणे आणि जातीय तेढ निर्माण करण्याची आवश्यकता नाही. संघात जातीयता
पाळली जात नाही. संघ जातीचा विचारही करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय स्वार्थासाठी काही मागण्या होत असतात. राजकीय लोकांनी त्या करू नयेत, अशी आमची भूमिका आहे, असेही गाडगे म्हणाले.
निमंत्रण असूनही सत्ताधारी महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार या कार्यक्रमाला आले नव्हते, यासंदर्भात अजित पवार गटातील एका नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी निमंत्रण मिळाल्याचे मान्य केले. मात्र, आम्ही शाहू-फुले आंबेडकर विचारधारेला मानणारे आहोत. त्यानुसार आम्ही आमची भूमिका घेतो. याबाबत भाजपला कळवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आम्ही निमंत्रण दिले होते, मात्र ते का आले नाहीत याबाबत अजित पवार यांच्याशी बोलाा राष्ट्रहित आणि देशभक्तीचे धडे देणाऱ्या संघ परिसरात येण्यासाठी कोणाला मनाई असते. - सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Satyashodhak, obc, Bahujan, Mandal commission, Bharatiya Janata Party