दिनांक 16 फेब्रुवारीला मालेगाव येथे (नाशिक जिल्हा) शिंपी समाज सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघातर्फे रथसप्तमिच्या मुहूर्तावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महिलांचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष स्वातीताई वाणी आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व मालेगावच्या राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या टीमने आयोजित केला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ऐडव्होकेट सौ ज्योतीताई अशोकराव ढोकणे तसेच बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या कार्याध्यक्ष सौ मिनाताई राजेश सातव , सौ अनिताताई दादासाहेब भुसे, ज्येष्ठ समाजसेविका माननीय अलकाताई भावसार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रतीक असलेली मशाल हातामध्ये घेऊन मान्यवरांनी व्यासपीठावर आगमन केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली .कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ स्वातीताई वाणी जिल्हाध्यक्ष नाशिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनात शामलताई सुरते कल्पनाताई चव्हाण सोनाली ताई शिंदे यांनी नृत्य सादर केले तसेच आरती ताई लोहारकर यांनी मी सिंधुताई सपकाळ बोलते आणि भारतीताई बिरारी यांनी मी सावित्री बोलते ह्या एकपात्री नाटिका सादर केल्या. जयश्री शिरोडे आणि स्मिता अमृतकर यांनी स्कीट सादर केले.
यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट ज्योतीताई ढोकणे यांनी नाशिकजिल्हा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे कार्य अतिशय उत्कृष्ट असून डॉक्टर बबनरावजी तायवाडे, राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये काम करीत असताना जिल्हाध्यक्ष स्वातीताई वाणी आणि त्यांची सर्व टीम ओबीसींच्या कल्याणासाठी हा सातत्याने कार्यरत असल्याने खरोखर स्वातीताई वाणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन तथा कौतुक केले. आपल्या मार्गदर्शनात सौ ज्योतीताई ढोकणे यांनीअशा प्रकारची माहिती दिली की राष्ट्रीय ओबीसी महासंघा मार्फत केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे सातत्याने ओबीसींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पाठपुरावा करत असून यामध्ये सर्व ओबीसी बांधवांची जात निहाय जनगणना करावी तसेच केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असावे ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्हास्तरावर शंभरविद्यार्थ्यांसाठी एक आणि शंभर विद्यार्थीनींसाठी एक याप्रमाणे दोन वस्तीगृह प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावे तसेच महाज्योती ही संस्था ओबीसींच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याने या संस्थेस भरगोस निधी देऊन विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करावी जेणेकरून शंभर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाता येईल, नोकऱ्यांमध्ये आणि पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण द्यावे तसेच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ओबीसी महिलांसाठी मतदारसंघ आरक्षित करावे, शासन पुरस्कृत शाळांचे खाजगीकरण होऊ नये जेणेकरून सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या पाल्यांना शिक्षण देता येईल,आणि महत्वाचे म्हणजे 26 जानेवारीला महाराष्ट्र शासनाने जे राजपत्र जारी केले ते ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारे असल्यामुळे ते राजपत्र ओबीसींना अन्यायकारक आहे आणि त्वरित हे राजपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महाराष्ट्र शासनाकडे केलेली असल्याची माहिती सौ ज्योतीताई ढोकणे यांनी कार्यक्रमात महिलांना दिली.
या कार्यक्रमांमध्ये महिलांना तिळगूळ आणि वाण देऊन कार्यक्रमाचा गोडवा वाढवण्यात आला, या कार्यक्रमासाठी मनिषाताई अहिरे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्रीताई धामणे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षदा ताई अहिरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण महिला वर्गाने सहकार्य केले याप्रसंगी मालेगाव मधील हजारोच्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली