प्रयत्नवादी जिजाऊ...!!

अनिल भुसारी, तुमसर, जि भंडारा

     पौराणिक काळापासून विदर्भ भारतातील अलौकिक आणि असामान्य कर्तृत्ववान असणाऱ्या कन्यांची खाण राहिलेला आहे. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी तर श्रीकृष्णाचे ज्येष्ठ पुत्र प्रद्धम्नाची पत्नी शुभांगी ही रुक्मि राजाची कन्या, रघुवंशातील इंदूमती, अगस्तीला साथ देणाऱ्या लोपामुद्रा या सर्व विदर्भातील कन्यांच्या लौकिकाची मालिका समोर नेण्याचे काम सिंदखेडराजा येथे लखोजीराजे जाधव व म्हाळसाराणी यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला जन्मलेल्या जिजाऊने केले. लखोजीराजे जाधव यांच्या दरबारातील रामसिंग भाट व बजरंग भाट यांनी जिजाऊ जन्मा संबंधि म्हटलं आहे....

            "जगदंब कृपेने झाली, मुलगी म्हाळसाबाईला |
              तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वांला ||

Rajmata Jijau     सुमारे चारशे वर्षापूर्वी सिंदखेडराजात  जिजाऊंच्या रूपाने अशी शक्ती जन्माला आली की, तिने दुष्टांचे निर्दालन आणि आबाल वृद्धाचे संगोपन करण्याची प्रेरणा दिली. अन्याय -अत्याचारा विरुद्ध लढण्याची शक्ती या महाराष्ट्रात निर्माण करुन संपूर्ण भारतवर्षाला स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग  दाखविला.
जिजाऊंचा विवाह वेरूळचे मालोजीराजे भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र संस्कृत पंडित शहाजीराजे यांच्यासोबत सन 1610 साली दौलताबाद येथे संपन्न झाला. जिजाऊ - शहाजी राजे यांचा विवाह झाल्यानंतर शहाजीराजेंच्या दरबारातील कवी जयराम पिंडे त्यांच्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात म्हणतात,

"जशी चंपकेशी खुले फुल जाई |
भली शोभली ज्यास जाया जिजाई ||
तिचे किर्तीचा | चंबू जबुदिपाला,
 करी साउली माऊली मुलाला ||
 
     यवनांचा सामान्य रयतेवर होत असलेला अन्याय -अत्याचार बघून, स्वाभिमान हरविलेला राष्ट्र बघून जिजाऊ व शहाजीच्या मनात सर्वसामान्य रयतेला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून  स्वराज्य निर्माण करण्याचे विचार येत होते. शहाजीराजेंनी स्वतंत्र स्वराज्य स्थापनेकरिता परिस्थिती अनुकूल नसतांना सुद्धा प्रयत्न केले. त्यात यशस्वी जरी झाले नसले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत शहाजीराजेंनी केला. शहाजीराजेंच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात जिजाऊ भक्कमपणे त्यांच्या सोबत उभे होत्या. शहाजीराजेंना सुद्धा जिजाऊमधील गुणांची आणि कर्तृत्वाची जाणीव होती. जिजाऊ आणि शाहजीराजेंच्या संसारात एकूण सहा अपत्ये झाली. त्यापैकी चार मुली व दोन मुलगे होते. त्यापैकी चार मृत्यू पावली. जिजाऊंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना 4 मुले झाली; 1623 ला पहिले पुत्ररत्न संभाजी जन्माला आले.  संभाजीराजे सुद्धा बहुभाषिक आणि वडिलांसारखे कर्तृत्ववान होते. कनकगिरीच्या लढाईत लढतांना 1655 ला मृत्यू झाला.  त्‍यानंतर त्यांना 4 मुले झाली; चारही दगावली. 7 वर्षाचा काळ निघून गेला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी येथे जिजाऊला मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले. ज्यांनी पुढे माता - पित्याचा  स्वराज्यनिर्मितीचा संकल्प पूर्ण केला.  

     कौटुंबिक आघात :-  स्वराज्य निर्मितीच्या दृष्टीने भोसले व जाधवांच्या हालचाली सुरु असतांना,  जिजाऊवर मोठा कौटुंबिक आघात झाला. दौलताबाद येथे (1620 - 21) खंडागळे सरदाराच्या हत्तीमुळे दुर्दैवी घटना घडली. भोसले -जाधव समोरासमोर उभे राहिलेत.जिजाऊच्या चुलत दिराच्या तलवारीने थोरले बंधू दत्ताजी मारल्या गेले, आणि वडील लखोजी जाधवच्या तलवारीने चुलत दीर संभाजी मारल्या गेले. सासर आणि माहेर यात वितुष्ट निर्माण झाल्यावर कोणत्याही स्त्रीची काय मानसिकता होऊ शकते? 25 जुलै 1629 मध्ये दौलताबाद मध्ये निजामाने  विश्वासघाताने  वडील लखोजीराजे, भाऊ अचलोजी व भावाच्या मुलाची हत्या केली. सन 1655 ला थोरले पुत्र संभाजीचा मृत्यू आणि 23 जानेवारी 1664 ला पती शहाजी राजेंचा मृत्यू. घरातली अशी हक्काची माणसं सोडून गेल्यावर कोणत्याही स्त्रीची काय अवस्था होईल?  हे आपण समजू शकतो. अशा परिस्तिथीतीतही जिजाऊंनी मात्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प नजरेआड होवू दिला नाही, त्यासाठी आयुष्यभर प्रयत्नरत राहिल्यात.
 
     शिवबावर संस्कार :-  जिजाऊने अत्यंत विपरीत परिस्तिथीतीत पुत्र शिवाजीराजेंचे असामान्य व्यक्तीमत्व घडवून रयतेचे लोककल्याणकारी राज्याची स्थापना त्यांच्याकडून करवून घेतली. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर जिजाऊंच्या संस्काराचा प्रभाव होता. जिजाऊ शिवाजीराजेंना थोर महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्यांच्या मानत शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बळीराज्य निर्माण करण्याचे संस्कार रुजवित होत्या. जिजाऊ 1638 ते 1642  च्या दरम्यान शिवबाराजेना घेवून बंगलोरला शहाजीराजेंकडे होते. तिथे जिजाऊ - शाहजीने शिवबांवर संस्कार केलेत. युद्ध, धर्म, न्याय नीतीचे, भाषा शिक्षण दिले. तिथून पुणेला आल्यानंतर जिजाऊने शहाजीराजेंकडे असलेल्या पुणे जहागिरीचा कारभार स्वतःच्या हाती घेवून शिवाजी राजेंच्या नावाने कारभार सुरु केला. जिजाऊंनी शिवबांना स्वातंत्र्याचे वेड लावले होते. स्वातंत्र्याचे वेड पूर्ण करण्याकरिता स्वतःच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी राजेंना स्वराज्य निर्मितीच्या कार्याला सूरूवात करायला लावले. स्वराज्य निर्मिती करिता शिवरायांच्या सोबतीला तानाजी मालुसरे, जिवाजी महाले, संभू जाधव, शिवाजी काशीद अशी जीवाला जिव देणाऱ्या मावळ्यांची  फौज जिजाऊने दिली. स्वराज्य निर्माणच्या कार्यात जातीपातीचा विचार न करता, जिजाऊ सर्व मावळ्यांवर शिवबाप्रमाणेच प्रेम करायच्या. जिजाऊंच्या मायेच्या प्रेमाने सर्व मावळ्यांना मोहित करून टाकले होते. त्यामुळेच स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सर्वसामान्य रयत सुद्धा प्राण द्यायला तयार असे.  स्त्रीत्वाचा मान - सन्मान राखण्याचा जो गुण शिवरायांमध्ये होता, त्या गुणाचा वारसा महाराजांना जिजाऊ कडूनच मिळाला होता. म्हणूनच स्वराज्यातील स्त्रीया म्हणायच्या....

  "जिजाऊंच्या जीवावर | नाही कुणाची पर्वा ||
आम्ही जिजाऊंच्या लेकी| जशा तलवारीच्या आणा ||

     शिवबाच्या पाठीमागे भक्कम :-   जिजाऊ अत्यंत धाडसी, संकटाला न घाबरता त्यावर मात करणाऱ्या आणि निश्चित केलेल्या ध्येयापासून किंचितही मागे न सरणाऱ्या लोकमाता होत्या. लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करण्याकरिता शिवबाला मृत्यूच्या दाढेत अफजलखाना सारख्या पराक्रमी दुष्ट वृत्तीच्या व्यक्तीच्या भेटीला पाठविणाऱ्या जिजाऊ, तर दुसरीकडे अफझल खानाची स्वतः भेट घेवून अफजल खानाला बेसावध करणाऱ्या जिजाऊ. पन्हाळ्याच्या किल्यावर सिद्धी जौहर च्या वेढ्यात शिवाजी राजे अडकले असता त्यांची सुटका करण्यासाठी स्वतः हातात तलवार घेणाऱ्या जिजाऊ. स्वराज्य संरक्षणाकरिता शिवाजी राजे व बाळ शंभूराजेना आग्र्याला औरंगजेबाची भेट घ्यायला पाठविणाऱ्या व त्यांच्या अनुपस्थित स्वराज्य सांभाळण्या बरोबरच औरंगजेबाच्या रोषाची कोणतीही पर्वा न करता रांगणा किल्ला मोगलांकडून जिंकून स्वराज्यला जोडणाऱ्या जिजाऊ, म्हणजे धाडशी आणि मुत्सद्दीपणाचा जिवंत उदाहरण. आजची स्त्री चुल आणि मुल यापलीकडे विचार तयार नाही किंबहुना तिने त्यातच समाधान मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे. पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. शहाजीराजे -जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला. केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांना वाटतं असे.

     प्रयत्नवादी जिजाऊ:-  जिजाऊ धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याच्या बाबतीत अत्यंत पुरोगामी विचाराच्या होत्या. जिजाऊंनी स्वतः व शिवाजी राजेंना सुद्धा कधी अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या मोहात पडू दिले नाही. शहाजी राजेंच्या मृत्यूनंतर सती न जावून रूढीप्रिय समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. जिजाऊ अत्यंत बुद्धिनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होत्या. त्यांनी सतत शिवाजी महाराजांना  तुकाराम महाराजांची,

*"ओले मूळ भेदी, खडकाचे अंग|
अभ्यासाशी संग, कार्यसिद्धी ||" ही शिकवण दिली.
 
     जिजाऊ कधीच संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, जप- तप, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या. त्यामुळे संकटसमयी त्या हताश – निराश झाल्या नाहीत.आजच्या स्त्रीया मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, नोकरी मिळावी, पदोन्नती मिळावी, निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ, होमहवन, तीर्थयात्रा, नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसतात. जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.

     राज्यभिषेक :-  शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकामागच्या प्रेरणा जिजाऊच होत्या. राजपदाला लोकप्रतिष्ठा आणि धर्म मान्यता मिळवून देणे हा राज्यभिषेकामागचा हेतू होता. राजाला लोकप्रतिष्ठा आणि धर्म मान्यता नसेल तर तो राजा सर्वमान्य होत नाही.
जिजाऊने शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक व त्यांना 32 मण सोन्याच्या सिंहासनावर रयतेच्या कल्याणाकरिता आरूढ झालेले स्वतःच्या डोळ्यांनी बघितले.  त्यांचे आतापर्यंतच्या कष्टाचे व त्यागाचे फलित झाल्याने त्यांना किती - किती धन्य वाटलं असेल.  
 
     शहाजी राजेंसोबत पाहिलेल्या स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे अत्यंत समाधानाने राज्यभिषेकाच्या 12 दिवसानंतर 17 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा व रयतेचा निरोप घेतला.  जिजाऊंनी निरंतर रयतेच्या कल्याणाचा आणि स्वराज्याचा विचार केला. त्यांनी जणू स्वराज्याशींच संसार थाटला होता. शिवरायांना स्वराज्याचे वेड लावून त्यांच्याकडून स्वराज्यनिर्मितीही करुन घेतली, त्यामुळेच त्यांचा राष्ट्रमाता म्हणून गौरव केल्या जातो. 

     जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन...

अनिल भुसारी, तुमसर, जि भंडारा

Satyashodhak, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209