'इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडत नाही,' असे म्हणतात. आधीच्या पिढीतील महापुरुषांनी रचलेला इतिहास सध्याच्या पिढीसमोर आणणे आवश्यक असते. याच उद्देशाने काढण्यात आलेला 'सत्यशोधक' चित्रपट येत्या शुक्रवारी (ता. ५) राज्यभरात प्रदर्शित होत आहे. यात समाजाला प्रगतिपथावर आणणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. यातून फुले दांपत्याचे अज्ञात पैलू उलगडतील. कितीही अवघड परिस्थिती समोर आली, अनंत अडचणी आल्या तरी स्त्री वर्गाला अखंड शिक्षणाची योग्य दिशा दाखविणारे दांपत्य म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई. काम मोठ्या समाजसुधारकांचे . पडद्यावर आणणारे दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी 'सत्यशोधक'ची कथा आपल्या लेखणीतून साकारली आहे. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाशिवाय समाजाच्या सुधारणेसाठी अनेक कार्ये केली, जी अनेकांसाठी अज्ञात आहेत. केवळ समाजसुधारक म्हणूनच नव्हे तर व्यापारी, कंत्राटदार, पत्रकार आणि उत्तम जोडीदार असे त्यांचे विविध पैलू चित्रपटात उलगडतील.
महात्मा फुले सावित्रीबाई यांच्यातील नातेही चित्रपटात दिसेल. या दांपत्याबरोबर कार्य केलेल्या इतरांच्याही भूमिका चित्रपटात आहेत. विशेषतः ट्रेलरमध्ये दिसणारा लहुजी वस्ताद साळवेंचा वावर चित्रपटाची उत्कंठा वाढविणारा आहे. चित्रपटात महात्मा फुले यांची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे. सावित्रीबाई यांच्या भूमिकेत राजश्री देशपांडे आहेत. समता फिल्म्स निर्मित चित्रपट अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने प्रेक्षकांसमोर आणला आहे.