तानुबाई बिर्जे आणि महिला पत्रकार

     सध्या आपल्याला पत्रकारिता क्षेत्रात अनेक महिला ताकदीने काम करताना दिसत आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया दोन्ही मध्ये महिलांचे प्रमाण खूप मोठे आहे.इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये तर बहुतांश ठिकाणी आपल्याला महिलाच दिसून येतात. विविध न्यूज चॅनलवर महिलांनी आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेला आपणास दिसून येतो. भारताच्या वेगवेगळ्या भागातील महिलांनी आपली बुद्धी,कौशल्य,श्रम, विद्वत्ता,हिम्मत या बळावर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा नावलौकिक मिळवला आहे. अनेक महिलांनी शोध पत्रकारिता करून देशातील भ्रष्टाचारी,व्यभिचारी आणि खुनी,कारस्थानी लोकांची मोठमोठी प्रकरणे उघडकीस आणली आहे व त्यांना तुरुंगाची हवा खाण्यास भाग पाडले आहे.या सर्व महिलांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रगतीचा पाया  जगातील पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांनी रचलेला आहे. १२० वर्षांपूर्वी जेव्हा महिलांना पत्रकारिता तर दूरच, परंतु शिक्षण घेण्याला सुद्धा येथील धर्म व्यवस्थेने बंदी घातली होती; अशा काळामध्ये तानुबाई बिर्जे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे.१९०६ ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी "दीनबंधू" वृत्तपत्राचे संपादक पद अतिशय यशस्वीपणे सांभाळले होते.जगातील पहिली महिला संपादिका म्हणून इतिहासामध्ये आपले नाव अजरामर करताना तानुबाई बिर्जे यांनी महिलांना पत्रकारिता क्षेत्रामध्ये येण्यास आपल्या प्रागतिक विचाराने आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाने प्रोत्साहित केले आहे.त्यामुळे आज पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्या महिला अभिमानाने काम करतात आणि आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त करतात; त्यांच्या मागची प्रेरणा ही तानुबाई बिर्जे यांचीच आहे.तानुबाई बिर्जे यांनी त्या काळात जर ही हिंमत दाखवली नसती आणि महिला सुद्धा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करू शकते हे उदाहरण निर्माण केले नसते तर आजच्या काळातील महिला सुद्धा या क्षेत्रामध्ये येण्यास धजावली नसती.

Tanubai Birje and women journalists     केवळ पत्रकारच नाही तर संपूर्ण वृत्तपत्राचे संपादकत्व तानुबाई बिर्जे स्वीकारतात,ते संपादकत्व अतिशय यशस्वीपणे सांभाळून आपल्या वृत्तपत्राला सर्वोत्कृष्ट दर्जा प्राप्त करून देतात, समाजमान्यता मिळवून देतात,लोकांच्या नजरेमध्ये आपली पत्रकारिता आणि संपादकीयता यांचे आकर्षण वाढवितात.त्यामुळे तानुबाई बिर्जे हे नाव पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आज अजरामर झाले आहे.त्यांनी अतिशय ऐतिहासिक काम करून आधुनिक काळातील महिला पत्रकारितेचा पाया रचलेला आहे.आधुनिक काळातील महिलांना या कठीण क्षेत्रामध्ये वळवण्यासाठी  यांनी त्या काळात घेतलेले श्रम आणि दाखवलेली हिम्मत कारणीभूत आहे.पत्रकार आणि संपादक असलेले त्यांचे पती वासुदेवराव बिर्जे यांच्या निधनानंतर दुःखी कष्टी होऊन न बसता किंवा निराश न होता तानुबाई बिर्जे पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलतात.आपल्या पतीने निर्माण केलेली उच्च नीतिमूल्ये जोपासतात.त्यांनी निर्माण केलेला पत्रकारिता क्षेत्रातील दबदबा कायम ठेवून तो वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात आणि आपल्या पतीचे नाव कुठेही कमी न होऊ देता त्यांच्या नावाला सुद्धा अजरामरत्व प्राप्त करून देतात,ही खरी  तानुबाई बिर्जे यांची कमाल आहे.त्यामुळे आजच्या काळातील महिलांनी पत्रकारितेच्या क्षेत्राला वाईट,कठीन,अडचणीचे क्षेत्र न समजता, या क्षेत्रामध्ये आपण इतर क्षेत्रापेक्षा चांगले नाव कमवू शकतो, प्रसिद्धी मिळू शकतो,समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करू शकतो आणि पैसाही मिळवू शकतो या पद्धतीने विचार केला तर निश्चितच तानुबाई बिर्जे यांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो.तानुबाईंनी या क्षेत्रामधील खाचखडगे,अडचणी,धोके,समजून घेतले.या क्षेत्राचा सखोल अभ्यास केला आणि नंतर अतिशय अभ्यासपूर्ण आणि नियोजनपूर्वक पद्धतीने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली.

     हे क्षेत्र फक्त पुरुषांचे आहे आणि या क्षेत्रामध्ये फक्त पुरुषच काम करू शकतात अशी एक पुरुषी अहंकाराची आणि वर्चस्वाची भावना काही लोकांनी निर्माण केली होती.ती जुनाट भावना आणि पुरुषी वर्चस्व झुगारून देऊन महिला सुद्धा या क्षेत्रामध्ये पुरुषापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे हे तानुबाईंनी जगाला दाखवून दिले.त्यामुळे या क्षेत्रात काम करीत असताना, दिनबंधू नावाच्या वृत्तपत्राचा असलेला दबदबा कायम ठेवत त्यांनी कुठेही तडजोड केली नाही.कुठेही आपली नीतिमूल्ये सोडली नाही.कुठेही आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्राची प्रतिष्ठा कमी होईल अशा प्रकारचे काम केले नाही.या क्षेत्रातील सगळे तत्व आणि मूल्य सांभाळून तानुबाई यांनी अत्यंत प्रभावीपणे पत्रकारितेच्या क्षेत्राला नवा आयाम दिला.आपल्या अभ्यासाने या क्षेत्राला नवी दिशा दिली.आपल्या व्यासंगाने या क्षेत्राला हिमालयाच्या उंचीवर पोहोचवले.आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने या क्षेत्रामध्ये महिलांसाठी स्वतंत्र जागा निर्माण केली आणि आज त्याच जागेवर हजारो महिला पत्रकारिता क्षेत्रामध्ये अत्यंत सन्मानाने काम करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करीत आहे.ही संपूर्ण देण तानुबाई बिर्जे यांची असून ज्या विचाराने तानुबाई प्रभावीत होत्या ते विचार सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे होते.ज्योतिबा सावित्रीने महिलांच्या शिक्षणाचा पाया या देशामध्ये रचला आणि महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व गाजवण्यासाठी तयार केले.

     त्या माध्यमातून ज्योतिबा सावित्रीच्या शाळांमध्ये अनेक कर्तुत्ववान महिला तयार झाल्या.अनेक महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व गाजवले.कोणी लेखिका,कोणी कवियत्री,कोणी समाजसुधारक झाल्या.कोणी साहित्यिक,कोणी डॉक्टर,इंजिनीयर झाल्या तर कोणी तानुबाई बिर्जे यांच्यासारख्या महान पत्रकार,संपादिका झाल्या.जोतिबा-सावित्रीने या देशामध्ये शिक्षणाचा जो पाया रचला त्याचे हे फलित होते.सावित्री-ज्योती यांनी लावलेल्या वृक्षाला आलेली ही मधुर फळे होती.पत्रकारितेच्या क्षेत्राला मिळालेली फार मोठी देणगी होती. तानुबाईंनी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले व या क्षेत्राला वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले.विशेषता: या क्षेत्रामध्ये महिला सुद्धा प्रभावीपणे काम करू शकतात हे जगाला दाखवून दिले.त्याच पावलावर पाऊल ठेवून भारताच्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये आज अनेक महिला पत्रकार म्हणून काम करतात.पत्रकार म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात फिरतात.शोध पत्रकारिता करून मोठमोठे गुन्हे बाहेर आणतात आणि गुन्हेगारांना शिक्षा ठोठावली जाते. त्यामुळे आज या क्षेत्रात महिलांनी चांगला प्रभाव निर्माण केला आहे. पत्रकारितेचे क्षेत्र आज महिला पत्रकारांसाठी आशेचा किरण ठरलेले आहे.काही ठिकाणी या क्षेत्रात चुकीच्या घटकांनी प्रवेश केलेला असला, काही ठिकाणी वाईट घटना घडत असल्या आणि काही ठिकाणी पत्रकारिता विकल्या जात असली तरीसुद्धा निराश न होता महिलांनी या क्षेत्राकडे एक करिअर म्हणून पाहिले पाहिजे.तीच खरी पत्रकार दिनानिमित्त तानुबाई बिर्जे यांच्या कार्याला आदरांजली ठरेल.

प्रेमकुमार बोके, अंजनगाव  सुर्जी

Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209