- प्रेमकुमार बोके
भारताचे पहिले कृषिमंत्री असलेले डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. भाऊसाहेब देशमुख यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कृषी यासारख्या अनेक विषयांवर काम केलेले आहे. त्यामुळे भाऊसाहेबांच्या कामाचा आवाका हा विशाल होता. अमरावती जिल्ह्यातील पापळ सारख्या छोट्याशा गावात जन्माला आलेले भाऊसाहेब परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतात आणि भारतात परत आल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी करतात. केवळ आपण एकट्याने शिकून चालणार नाही तर खेड्यापाड्यातील कष्टकरी कामकरी बहुजन समाजाची मुले शिकली पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सर्वसामान्य गोरगरिबांच्या शिक्षणासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेबांनी ग्रामीण भागामध्ये शाळा आणि महाविद्यालये उघडली. त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांची शिक्षणाची व्यवस्था झाली. आज श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ३०० पेक्षा जास्त शाखा आहे. यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, कृषी, विधी, कला, वाणिज्य, विज्ञान यासारख्या सर्व शाखांमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्या ठिकाणी हजारो कर्मचारी आपला उदरनिर्वाह करतात.
डॉ. पंजाबराव देशमुख हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर चालणारे पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विज्ञानवादी विचारांचा अवलंब केला होता. अनिष्ट चालीरीती, घातक रूढी परंपरा यावर भाऊसाहेबांनी कडाडून प्रहार केलेले आहेत. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. गाडगेबाबांनी ज्याप्रमाणे बहुजन समाजाला अज्ञान आणि अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तोच विचार घेऊन भाऊसाहेबांनी पुढे आपली वाटचाल केली. गाडगेबाबांचा आणि भाऊसाहेबांचा खूप स्नेह होता. गाडगेबाबांनी भाऊ साहेबांना अनेकदा त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये मोलाचे सहकार्य केलेले आहे. भाऊसाहेब या देशाचे कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. दिल्ली येथे ८२ दिवसाचे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविले आणि शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या. या कृषी प्रदर्शनाला जगातील मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. भाऊसाहेबांचे हे जागतिक दर्जाचे कार्य पाहून जगातील अनेक नेते आश्चर्यचकित झाले. १९३२ मध्ये मध्य प्रांताच्या कौन्सिल समोर भाऊसाहेबांनी "हिंद देवस्थान संपत्ती बिल" मांडून धार्मिक संस्थानातील पैशाचा उपयोग शिक्षणासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी करावा असा निर्णय घेतला होता. भाऊसाहेबांच्या या निर्णयाला त्या काळात प्रतिगामी वृत्तीच्या लोकांनी विरोध केला. तरीसुद्धा भाऊसाहेबांनी आपली विचारधारा कधीही सोडली नाही. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी भाऊसाहेबांनी आंदोलन केले. अमरावतीच्या इंद्रप्रस्थ थिएटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित करून अस्पृश्यता निवारण परिषद भाऊसाहेबांनी भरविली होती. त्या माध्यमातून समाजातील जातीभेद, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारताच्या राज्यघटना समितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण - कामगिरी केलेली आहे. त्यांनी एकट्यांनी घटना समितीमध्ये ५०० पेक्षा जास्त दुरुस्त्या सुचवल्या होत्या आणि त्यावर गांभीयनि चर्चा होऊन त्या मान्य सुद्धा झालेल्या आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी भारताची राज्यघटना देशाला सोपवल्यानंतर केलेल्या भाषणात भाऊसाहेबांचा अत्यंत सन्मानाने उल्लेख केलेला होता. भाऊसाहेबांनी भारत कृषक समाज, राष्ट्रीय कृषी परिषद स्थापन करून सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी बहुजन समाजाच्या लोकांना जागृत करण्याचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी आपल्या लग्नाच्या कार्यक्रमाचा स्वयंपाक मेहकर समाजाच्या मुलांच्या हातून करून घेतला आणि प्रत्यक्ष आचरणातून अस्पृश्यता निवारण्याचे काम केले. श्राद्ध, तेरवी, उपासतापास नवस, कर्मकांड यासारख्या गोष्टींपासून भाऊसाहेब पूर्ण लांब होते. त्यामुळे आपल्या स्वतःच्या वडिलांच्या श्रद्धाला सुद्धा ते गेले नाही आणि आपली आई नाराज झाली म्हणून त्यांनी आपल्या आईला अतिशय प्रेमाने पत्र लिहून या गोष्टी कशा निरर्थक आहे हे समजावून सांगितले. भाऊसाहेबांचे ते पत्र आजच्या काळात सुद्धा अत्यंत उपयोगी आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्याप्रमाणे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली; त्याचप्रमाणे भाऊसाहेबांनी कर्नाटकातील होदागिरी येथील छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. हे फार मोठे कार्य भाऊसाहेबांनी केले. त्यांनी आपल्या वकिलीची सुरुवात सत्यशोधक जलशाच्या वकिलीने केली. १९२७ ला मोर्शीच्या हिंदू महासभेच्या कार्यक्रमात घुसून त्यांनी लाला लजपतराय यांच्यासमोर जाती निर्मूलनाचा ठराव मांडला.
डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सर्वसामान्य बहुजन समाजाच्या हितासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. राजकारण आणि समाजकारण यांचा अतिशय सुंदर मेळ भाऊसाहेबांच्या जीवनात आपल्याला दिसून येतो. त्यांनी राजकारणातून अतिशय चांगल्या प्रकारे समाजकारण केले. राजकारण करत असताना सुद्धा त्यांनी सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक निर्णय घेतलेले आपणास दिसून येतात. म्हणूनच भाऊसाहेबांच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्या गेले. ज्यामुळे पंजाब सारख्या प्रांतातील शेतकरी आजही भाऊसाहेबांचे नाव अतिशय सन्मानाने घेतात. आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या परिवर्तनवादी विचाराची या देशाला नितांत गरज आहे. देशात जातीयता आणि धर्मांधता प्रचंड वाढलेली असताना भाऊसाहेबांसारख्या पुरोगामी विचारांच्या राजकारणी नेत्याची या देशाला सध्याच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच प्रत्येकाने भाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व अभ्यासणे आजच्या काळाची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
प्रेमकुमार बोके - अंजनगाव सुर्जी
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Indian National Congress