- शहीद भगतसिंग
एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे - सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी परमेश्वराच्या अस्तित्वावर केवळ अहंकारामुळे मी विश्वास ठेवत नाही का ? मला ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या मित्रांशी गप्पा मारताना माझ्या हे लक्षात आले की माझे काही मित्र-माझा मैत्रीचा दावा चुकीचा नसेल तर — माझ्याबरोबरच्या थोड्याशा संपर्कानंतर ह्या निष्कर्षावर आले की देवाच्या अस्तित्वाला नाकारून मी थोडा जास्तच पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, आणि माझ्या अहंकाराने हा अविश्वास (ईश्वरावर) दाखवण्यास भाग पाडले आहे. खरोखरच ही समस्या गंभीर आहे. मानवी कमतरतांपासून मी मुक्त असल्याचा दावा करत नाही. मी फक्त एक माणूस आहे, बस्स, ह्यापेक्षा जास्त कुणी नाही. कुणीही ह्यापेक्षा जास्त असल्याचा दावा करू शकत नाही, माझ्यातही एक उणीव आहे. अहंकार हा माझ्या स्वभावाचा एक भाग आहे. माझ्या साथीदारांमध्ये मी ताठर म्हणूनच ओळखला जायचो. इतके की माझे मित्र श्री. बी.के. दत्त सुद्धा कधीकधी मला तसे म्हणायचे. अनेक प्रसंगी माझी हट्टी म्हणून निंदाही झाली आहे. माझ्या काही मित्रांची अशी गंभीर तक्रार आहे की त्यांची इच्छा नसताना अनेक वेळा मी माझी मते त्यांच्यावर लादतो आणि माझे प्रस्ताव मान्य करून घेतो. ह्यात थोडेफार तथ्य आहे, हे मी नाकारत नाही. ह्याला अहंकारही म्हणता येईल. अन्य प्रचलित मतांच्या विरोधात जेव्हा स्वतःच्या मतांचा प्रश्न येतो, तेव्हा निश्चितच मला स्वतःच्या मतांचा अभिमान आहे. पण तो वैयक्तिक नाही. तो स्वतःच्या मताचा न्याय्य अभिमान असू शकतो, त्याला अहंकार म्हणता येणार नाही. गर्व किंवा खऱ्या अर्थाने 'अहंकार' हा स्वतःबद्दलच्या अवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. ह्या अवाजवी अभिमानानेच तर मला नास्तिकतेकडे वळवले नाही ना ? की ह्या विषयावरील सखोल अभ्यासाने आणि खूप चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अविश्वासापर्यंत आलो ? ह्या प्रश्नाचीच मी इथे चर्चा करू इच्छितो. पण सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की स्वाभिमान आणि अहंकार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
पहिली गोष्ट ही आहे की अवाजवी अभिमान किंवा पोकळ अहंकार हा व्यक्तीला देवावर विश्वास ठेवण्याच्या वाटेतील अडथळा कसा काय ठरू शकतो हे मला समजलेले नाही. प्रत्यक्षात माझ्या अंगात गुण नसताना किंवा माझी लायकी नसताना मला यश प्राप्त झाले असेल तरच मी एखाद्या थोर व्यक्तीची थोरवी नाकारू शकतो. इथपर्यंत समजू शकते. पण ज्याचा देवावर विश्वास आहे, अशी व्यक्ती स्वतःच्या अहंकारामुळे त्यावर विश्वास ठेवणे बंद करेल हे कसे शक्य आहे. दोनच शक्यता आहेत. एक तर माणूस आपल्याला देवाचा प्रतिस्पर्धी समजेल, किंवा तो स्वतःलाच देव मानेल. ह्या दोन्ही परिस्थितींमध्ये तो खरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या परिस्थितीत तो आपल्या प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारतच नाही. आणि दुसऱ्या परिस्थितीतही तो निसर्गातल्या घडामोडींचे पडद्याआडून नियंत्रण करणाऱ्या शक्तीचे अस्तित्व मान्य करतो. तो स्वतःलाच सर्वश्रेष्ठ शक्ती समजतो की त्याच्या पलीकडे कुणी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, हे आपल्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचे नाही. मूळ मुद्दा तर हा आहे की त्याचा विश्वास आहे. तो कुठल्याच प्रकारे नास्तिक नाही. तर, मला हे म्हणायचे आहे की मी ह्यातल्या पहिल्या प्रकारातही मोडत नाही आणि दुसऱ्या प्रकारातही नाही. मी त्या सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्वच मळी नाकारतो. मी ते का नाकारतो, हे नंतर पाया. इथे मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की हा अहंकार नाहीये की ज्यामुळे मी नास्तिक मत बनवायला उद्युक्त झालो. मी स्वतः ती श्रेष्ठ शक्ती नाही की तिचा प्रतिस्पर्धी नाही, की अवतारही नाही. एक गोष्ट निश्चित आहे की मी ह्या विचारांकडे वळण्यास अहंकार कारणीभूत नाही.
हा आरोप खोडून काढण्यासाठी चला, सत्य परिस्थिती काय आहे ते पडताळन पाहू. माझ्या ह्या मित्रांच्या मते दिल्ली बॉम्ब प्रकरण आणि लाहोर कट प्रकरणांमध्ये मला जे अनावश्यक यश मिळाले, कदाचित त्यामुळे माझा अहंकार वाढला. हे बरोबर आहे का हेही तपासून पाया, माझा नास्तिकपणा ही काही अगदी अलीकडची गोष्ट नाहीये. मी जेव्हा कुठलीही प्रसिद्धी नसलेला तरुण होतो व माझे हे वरील मित्र जेव्हा मला ओळखतही नव्हते, तेव्हापासूनच मी ईश्वरावर विश्वास करणे सोडून दिले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा गैरवाजवी अहंकार किमान एक कॉलेजचा विद्यार्थी तरी बाळगू शकत नाही. काही प्राध्यापकांचा मी आवडता विद्यार्थी होतो, तर अन्य काही जणांचा नावडता. पण मी कधी खूप कष्टाळू किंवा अभ्यास विद्यार्थी नव्हतो. अहंकाराच्या भावनेत अडकण्याची तर संधीच कधी मिळाली नाही. मी तर लाजाळ, बुजऱ्या वृत्तीचा मलगा होतो, ज्याच्यात भविष्याबद्दल थोडी निराशावादी प्रवत्ती होती. आणि त्या काळात मी पूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या प्रभावाखाली मी वाढलो ते माझे वडील सनातनी आर्यसमाजी होते. एक आर्यसमाजी बाकी काहीही असो पण नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी लाहोरच्या डी.ए.व्ही. शाळेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर एक पूर्ण वर्ष त्यांच्या वसतीगृहात राहिलो. तिथे सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनव्यतिरिक्त मी तासनतास गायत्रीमंत्राचे पठण करत असे. त्याकाळात मी पूर्णपणे भाविक होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहायला सुरुवात केली. सनातनी धामिर्क मांबाबतीत ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची प्रेरणा मला त्यांच्याच शिकवणीतून मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. त्यांचा ईश्वरावर दृढविश्वास आहे. मला रोज प्रार्थना म्हणण्यास ते प्रोत्साहित करत असत. अशाप्रकारे माझे पालनपोषण झाले. असहकार चळवळीच्या वेळी मी नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथे आल्यानंतरच मी सर्व धामिर्क समस्यांवर चर्चा करणे, उदा. देवाच्या बाबतीत उदारमतवादी विचार करणे, त्यावर टीका करणे, वगैरे गोष्टींना सुरुवात केली. पण अजूनही मी पक्का आस्तिक होतो. जरी शीख किंवा अन्य धर्मातील पौराणिक गोष्टी आणि मतांवर माझा विश्वास बसला नव्हता, तरी त्यावेळपर्यंत मी केस न कापता ते लांबच ठेवत होतो. पण देवाच्या अस्तित्वावर माझा पक्का विश्वास होता.
पुढे मी क्रांतिकारी पक्षाशी जोडला गेलो. तिथे गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा ज्या नेत्याच्या संपर्कात आलो, त्यांचा देवावर अजिबात विश्वास नसूनसुद्धा देव नाकारण्याची त्यांची हिंमत नव्हती. देवाविषयी मी जिद्दीने प्रश्न विचारत राहिल्यानंतर ते म्हणायचे, 'जेव्हा इच्छा होईल तेव्हा पूजा करत जा.' ही नास्तिकताच आहे पण ती स्वीकारण्याचे धाडस नाहीये. दुसरे नेते ज्यांच्या संपर्कात मी आलो ते पक्के श्रद्धाळू होते. त्यांचे नाव आहे आदरणीय कॉमेड सचिंद्रनाथ सान्याल. सध्या ते काकोरी कट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. बंदी जीवन (तुरुंगातील जीवन) ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध व एकमेव पुस्तकात पहिल्या पानापासूनच ईश्वराचे गुणगान केले आहे. ह्या सुंदर पुस्तकाच्या दुसऱ्या भागात शेवटच्या पानावर वेदान्ताच्या कारणामुळे ईश्वराची प्रशंसा करताना त्यांनी केलेला स्तुतिसुमनांचा वर्षाव हा त्यांच्या अजब विचारांचा भाग आहे. २८ जानेवारी १९२५ ला भारतभर वाटले गेलेले दि रेव्हल्यूशनरी (क्रांतिकारी) हे पत्रकसुद्धा त्यांच्याच विचाराचा परिणाम आहे, असा सरकारी पक्षाचा दावा आहे. अशा प्रकारच्या गुप्त कामांमध्ये कोणताही प्रमुख नेता निःसंशयपणे स्वतःला पसंत असलेले आपलेच विचार मांडतो. बाकी कार्यकर्त्यांना त्याविषयी मतभेद असले तरी आपली सहमती दाखवावी लागते. त्या पत्रकामध्ये एक संपूर्ण परिच्छेद सर्वशक्तिमान देवाची कार्ये आणि लीला ह्याने भरलेला होता. हा सर्व गूढवाद आहे. मला जे म्हणायचे आहे ते हे की ईश्वरावरचा अविश्वास ही कल्पना क्रांतिकारी पक्षात सुद्धा रुजलेली नव्हती. काकोरीच्या प्रसिद्ध चारही शहीदांनी आपले शेवटचे दिवस भजन-प्रार्थना ह्यामध्ये घालवले होते. रामप्रसाद बिस्मिल एक सनातनी आर्यसमाजी होते. समाजवाद आणि साम्यवादाच्या क्षेत्रात खूप अभ्यास असूनही राजन लाहिरी हे उपनिषदे व गीतेतील श्लोक पठण करण्याची आपली इच्छा आवरू शकले नाहीत. मी त्यांच्यातील एकच व्यक्ती पाहिली जिने कधीच प्रार्थना केली नाही आणि ते म्हणत असत, तत्त्वज्ञान माणसातील दबळेपणा किंवा त्याच्या ज्ञानाची मर्यादा ह्यांची निष्पत्ती आहे. ते ही आज आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहेत. पण त्यांनीही कधी देवाच्या अस्तित्वाला नाकारण्याची हिंमत दाखवली नाही.
ह्यावेळपर्यंत मी एक आर्दश स्वप्नाळू क्रांतिकारक होतो. आतापर्यंत आम्ही दुसऱ्यांचे अनुकरण करत होतो. पण आता सर्व जबाबदारी स्वतः पेलण्याची वेळ आली होती. काही काळ तर अपरिहार्य प्रतिक्रियांमुळे पक्षाचे अस्तित्वच अशक्य वाटू लागले होते. उत्साही साथीदारांनी – नव्हे नेत्यांनी — आमची खिल्ली उडवायला सुरुवात केली. आपल्या कार्यक्रमामध्ये काही अर्थ नाही ह्यावर एक दिवस माझी स्वतःची खात्री पटते की काय अशी भीती मला काही काळाकरता वाटायला लागली. तो माझ्या क्रांतिकारी आयुष्यातला निर्णायक क्षण होता. अभ्यासाची हाक माझ्या मनात कानाकोपऱ्यात घुम् लागली होती: विरोधकांनी केलेल्या युक्तिवादाचा सामना करण्यासाठी अभ्यास कर; आपल्या मतांच्या समर्थनार्थ युक्तिवाद करण्यासाठी अभ्यास कर. मी अभ्यासाला सुरुवात केली. ह्यामुळे माझ्या जुन्या विचारांमध्ये आणि विश्वासामध्ये आर्शयकारकपणे सुधारणा झाली. आमच्या पहिल्या साथीदारांमध्ये असलेली हिंसात्मक कृती करण्याच्या आकर्षणाची जागा आता गंभीर विचारांनी घेतली. आता गढवाद आणि अंधश्रद्धांना अजिबात जागा राहिली नाही. वास्तववाद आमचा पाया बनला. अत्यंत कठीण प्रसंगी गरज असेल तरच हिंसेचा आधार घेणे उचित ठरेल. अहिंसा हे सर्व लोकचळवळींचे अपरिहार्य तत्त्व असायला हवे. हे झाले कार्यपद्धतींविषयी. पण सगळ्यात महत्त्वाचे हे की ज्या आदर्शासाठी लढायचे त्याची स्पष्ट कल्पना हवी. त्यावेळी खास असे क्रांतिकारी काम होत नव्हते, त्यामुळे मला जगभरातल्या इतर क्रांत्यांच्या आदर्शाचा अभ्यास करण्याची चांगली संधी मिळाली. अराजकतावादी नेता बाकनिनचा मी अभ्यास केला, साम्यवादाचे जनक मार्क्स थोडेफार वाचले, पण स्वतःच्या देशात यशस्वीपणे क्रांती घडवून आणणारे लेनिन, ट्रॉट्स्की व इतरांच्याबद्दल बरेच वाचले. ते सर्व नास्तिक होते. बाकुनिनचे ईश्वर आणि शासन हे पुस्तक ह्या विषयावरचा मर्यादित पण चांगला अभ्यास आहे. नंतर मला निरलंब स्वामींचे सहज ज्ञान (कॉमन सेन्स) हे पुस्तक मिळाले. ह्यात फक्त गूढ नास्तिकता होती. ह्या विषयाकडे माझा ओढा वाढला. १९२६ सालच्या शेवटापर्यंत हे विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्याचे नियंत्रण करणाऱ्या अशा सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे अस्तित्व ही उघड उघड बकवास आहे असे मी मान लागलो होतो. मी माझा अविश्वास प्रदर्शित केला. ह्या विषयावर माझ्या मित्रांबरोबर वाद घालायला सरुवात केली. मी जाहीरपणे एक नास्तिक म्हणून ओळखला जाऊ लागलो. पण ह्याचा अर्थ काय हे मी पुढे सांगेन.
मे १९२७ मध्ये मला लाहोर येथे अटक झाली. ही अचानक झालेली अटक होती. पोलीस माझा शोध घेत आहेत ह्याबद्दल मला जराही कल्पना नव्हती. एका बागेतून जात असताना अचानकपणे पोलिसांनी मला घेरल्याचे माझ्या लक्षात आले. त्याप्रसंगी मी अत्यंत शांत होतो ह्याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटले. कसलीही संवेदना किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वेच्या पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला एक महिना काढायला लागला. बरेच दिवस पोलीस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्यावरून मला असे वाटले की त्यांना माझा काकोरी दलाशी असलेला संबंध आणि माझ्या क्रांतिकारी आंदोलनासंबंधी कार्यांची काही माहिती होती. त्यांनी मला सांगितले की: जेव्हा खटला (काकोरी कट) चालू होता तेव्हा मी लखनौला होतो; त्यांच्या सुटकेसाठी आम्ही एका योजनेवर चर्चा केली होती; त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही काही बॉम्ब मिळवले होते; आणि १९२६ मध्ये चाचणी घेण्यासाठी त्यातला एक बॉम्ब आम्ही दसऱ्याला जमलेल्या गर्दीत फेकला. त्यानंतर माझ्या भल्यासाठी त्यांनी मला सांगितले की जर मी क्रांतिकारी पक्षाच्या कार्यक्रमावर प्रकाश टाकणारे एक निवेदन दिले, तर मला अटक केली जाणार नाही, उलट मला न्यायालयात खबऱ्या म्हणून उभे न करता सोडून दिले जाईल व त्याशिवाय इनामही दिले जाईल. त्यांच्या ह्या प्रस्तावावर मला हसायला आले. त्या सगळ्याला काही अर्थ नव्हता. आमच्यासारखा विचार करणारे, निष्पाप लोकांवर बॉम्ब फेकत नाहीत. एके दिवशी सकाळी गुप्तचर खात्याचे वरिष्ठ अधिकारी श्री. न्यूमन माझ्याकडे आले. बराच वेळ सहानुभूतिपूर्वक बोलल्यानंतर त्यांनी मला, त्यांच्या दृष्टीने, एक अत्यंत दुःखद बातमी दिली. ते म्हणाले, त्यांनी मागितल्याप्रमाणे मी निवेदन दिले नाही, तर काकोरी कटासंबंधी विद्रोह केल्याबद्दल व दसरा बॉम्बस्फोटात निघृण हत्यांबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल. त्यांनी मला असेही सांगितले की मला शिक्षा देण्यासाठी (फाशीची) त्यांच्याकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. मी जरी पूर्णपणे निरपराध होतो, तरी पोलीस त्यांना हवे ते करू शकतात ह्याबद्दल माझी खात्री होती. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. पण आता मी एक नास्तिक होतो. मला माझी स्वतःची कसोटी घ्यायची होती की फक्त शांत आणि आनंदी दिवसांमध्येच मी नास्तिक असल्याची बढाई मारतो की अशा कठीण प्रसंगीसुद्धा मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो. बऱ्याच विचारांती मी हा निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारे मी देवावर विश्वास ठेऊ शकत नाही किंवा देवाची प्रार्थना करू शकत नाही. एक क्षणही मी प्रार्थना केली नाही. हीच खरी कसोटीची वेळ होती आणि त्यात मी यशस्वी झालो. थोड्या वेळाकरताही काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवायची इच्छा मी केली नाही. आता मी एक पक्का नास्तिक होतो आणि आजपर्यंत आहे. त्या कसोटीला खरे उतरणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.
'विश्वास' कष्टांची तीव्रता कमी करतो, एवढेच नाही तर सुखावहसुद्धा करतो. देव माणसाला सांत्वना देणारा एक आधार बनू शकतो. त्याच्या शिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. तुफानात आणि वादळात स्वतःच्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नाही. अशा कसोटीच्या क्षणी जर अहंकार असलाच तर पार वितळून जातो आणि माणूस सर्वसाधारण श्रद्धांना ठोकरण्याचे धाडस करू शकत नाही. आणि जर केलेच, तर त्यातून हाच निष्कर्ष निघतो की त्याच्याजवळ फक्त अहंकार नाही तर दुसरी कुठलीतरी शक्ती आहे. आज अगदी अशीच परिस्थिती आहे. खटल्याचा निकाल काय लागणार हे आधीच माहीत आहे. एका आठवड्यात निर्णय दिला जाईल. मी माझे आयुष्य एका ध्येयासाठी अर्पण करत आहे ह्या विचाराखेरीज आणखी कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? देवावर विश्वास ठेवणारा हिंदू पुढचा जन्म राजाचा असावा अशी अपेक्षा करू शकतो, एक मुसलमान किंवा ख्रिश्चन आपल्या कष्टांचे आणि त्यागाचे बक्षीस म्हणून स्वर्गात समृद्धी आणि आनंद मिळेल ह्याची स्वप्ने पाहतो. पण मी कशाची अपेक्षा करावी? मला माहीत आहे की ज्या क्षणी माझ्या गळ्याभोवती फास आवळला जाईल आणि माझ्या पायाखालची फळी काढली जाईल, तोच पूर्णविराम असेल तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर, माझ्या आत्म्याचा तिथेच शेवट होईल. बस्स इतकेच. पुढे काही राहणार नाही. ज्यात खूप काही गौरवशाली यश मिळालेले नाही असे एक छोटेसे संघर्षमय जीवन, हे स्वतःच एक बक्षीस असेल—अर्थात तसे मानायचे धैर्य माझ्यात असेल तर. हेच सर्वकाही आहे. निःस्वार्थी, इहलोकी व परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी समपिर्त केले आहे, कारण ह्यापेक्षा वेगळे काही करणे मला जमलेच नसते. ज्या दिवशी अशा मानसिकतेचे भरपर स्त्री-परुष आपल्याला आढळतील, की जे मानवजातीची सेवा आणि पीडित मानवाची मुक्ती ह्याखेरीज दुसऱ्या कशाही करता आपले आयुष्य वाहून घेऊ शकणार नाहीत, तो दिवस मुक्तीच्या युगाची नांदी ठरेल. ते शोषकांना, जुलमी सत्ताधीशांना, पिळवणूक करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी उत्साहित होतील. हे सगळे, ते ह्या जन्मी पुरस्कार मिळवण्यासाठी. पुढच्या जन्मी राजा होण्यासाठी किंवा स्वर्गात जागा मिळण्याची अपेक्षा ठेवन नव्हे, तर मानवजातीच्या मुक्तीसाठी करतील. मानवजातीच्या मानेवरील गुलामीचे जोखड उलथून टाकण्यासाठी, स्वातंत्र आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना हा मार्ग अंगिकारावा लागेल. त्यांच्या स्वतःसाठी धोकादायक असलेल्या पण त्यांच्या महान आत्म्यासाठी असलेल्या एकमेव उत्कृष्ट मार्गाने जायला ते तयार होतील का? त्यांच्या उदात्त ध्येयाबद्दल त्यांना असलेल्या अभिमानाला अहंकार म्हणून त्याचा चुकीचा अर्थ तर लावला जाणार नाही ? अशी घृणित विशेषणे लावण्याचे धाडस कोण करेल? मी तर म्हणतो अशी व्यक्ती एकतर मूर्ख असेल किंवा धर्त तरी. पण त्याला आपण क्षमा करूया कारण त्याला त्यांच्या मनातील उच्च विचार, भावना, आवेग ह्यांची तीव्रता जाणव शकत नाहीत. त्याचे हृदय मांसाच्या गोळ्यागत मृत आहे. अनेक हितसंबंधांचे झापड असल्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली आहे. स्वतःवर ठाम विश्वास असणे ह्या गुणाला अहंकार म्हटले जाते, हे खूप दुःखदायक आहे पण त्याला इलाज नाही.
तुम्ही जा आणि एखाद्या प्रचलित धर्माला विरोध करा; जा आणि एखाद्या नायक किंवा महान व्यक्तीची जिच्याबद्दल साधारणपणे असा विश्वास व्यक्त केला जातो की ती टीकेच्या पलीकडे आहे कारण ती चुका करू शकत नाही-टीका करा, तर तुमच्या युक्तिवादाची ताकद हजारो लोकांना तुम्ही अहंकारी असल्याचा आक्षेप घ्यायला विवश करेल. हे मनाच्या ताठरपणामुळे होते. टीका आणि स्वतंत्र विचार, हे दोन्ही एका क्रांतिकारकासाठी अनिवार्य गुण आहेत. महात्माजी थोर आहेत, म्हणून कोणी त्यांची टीका करता कामा नये; ते उच्चस्थानावर आहेत, म्हणून त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट — मग ती राजकारणाविषयी असो किंवा धर्म, अर्थशास्त्र किंवा नीतिशास्त्राविषयीबरोबरच आहे. तुम्हाला पटत असो वा नसो, तुम्ही म्हटलेच पाहिजे की हो, हेच बरोबर आहे.' ही मानसिकता विकास घडवून आणू शकत नाही, ती स्पष्टपणे प्रतिगामी आहे.
आमच्या पूर्वजांनी सर्वशक्तिमान परमेश्वराबद्दल विश्वास निर्माण केला होता, त्यामुळे जो कोणी ह्या विश्वासाच्या खरेपणाला आव्हान देईल किंवा त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका घेईल, तो धर्मभ्रष्ट व विश्वासघातकी गणला जाईल. जर त्याचा युक्तिवाद इतका भक्कम असेल, की प्रतिवाद करून खोडून काढता येणार नाही आणि त्याची श्रद्धा इतकी ठाम असेल की ईश्वरी कोपाने त्याच्यावर संकट कोसळण्याची भीती दाखवली तरी डळमळणार नाही तर त्याची घमेंडखोर म्हणन आणि त्याचा स्वभाव अहंकारी आहे म्हणून निंदा केली जाईल. त्यामुळे ह्या निरर्थक वादात वेळ का दवडायचा? मग ह्या सगळ्या गोष्टींवर वाद घालण्याचा प्रयत्न तरी का करायचा? हा दीर्घ वाद अशासाठी, कारण सर्वसामान्य जनतेसमोर हा प्रश्न पहिल्यांदाच उपस्थित झाला आहे, आणि आज प्रथमच ह्यावर वस्तुनिष्ठपणे चर्चा होत आहे.
पहिल्या प्रश्नाचा विचार करता, मला वाटते की अहंकारामुळे मी नास्तिकतेकडे वळलो नाही हे मी स्पष्ट केले आहे. माझ्या युक्तिवादाची पद्धत योग्य आहे की नाही हे वाचकांनी ठरवायचे आहे, मी नाही. मला माहीत आहे की सध्याच्या परिस्थितीत देवावरील विश्वासाने माझे आयुष्य सोपे झाले असते आणि माझ्या मनावरचा भार कमी झाला असता. देवावरच्या माझ्या अविश्वासाने वातावरण अत्यंत नीरस बनवले आहे आणि परिस्थिती एक बिकट रूप धारण करू शकते. थोडासा गूढवाद तिला (परिस्थितीला) काव्यमय बनवू शकतो. पण माझ्या नशिबाला सामोरे जाताना मला अशा संभ्रमाची आवश्यकता नाही. मी वास्तववादी आहे. विवेकाच्या जोरावर मला माझ्या अंतस्थ स्वभावावर मात करायची आहे. ह्या ध्येयात मला नेहमीच यश मिळाले आहे असे नाही. पण प्रयत्न करत राहणे हे माणसाचे कर्तव्य आहे. यश संधीवर आणि वातावरणावर अवलंबून असते.
भगत सिंग के और कुछ लेख और किताबे
मैं नास्तिक क्यों हूँ ? - शहीद भगत सिंह - 1931
Why I am an Atheist - Bhagat Singh 1930