Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Phule Shahu Ambedkar
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

मी नास्तिक का आहे - शहीद भगतसिंग

     दुसरा प्रश्न हा आहे की जर हा अहंकार नव्हता, तर मग ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल पूर्वापार चालत आलेल्या आणि आजही प्रचलित असलेल्या श्रद्धा नाकारायला काहीतरी कारण असायला हवे. आता मी ह्याच गोष्टीकडे वळतो आहे. होय, कारण आहे. विवेकबुद्धी असलेला कोणीही माणूस आपल्या सभोवतालच्या परिस्थितीला तर्कसंगतपणे समजून घेऊ इच्छितो. जिथे सरळ पुरावे नसतात, तिथे तत्त्वज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मी आधी म्हटल्याप्रमाणे माझे काही क्रांतिकारी साथी म्हणायचे की तत्त्वज्ञान माणसाच्या दुबळेपणाचे लक्षण आहे. आपल्या पूर्वजांनी जेव्हा रिकाम्या वेळात ह्या जगाचे रहस्य त्याचा भूतकाळ, र्वतमानकाळ आणि भविष्यकाळ, त्याचे 'का' आणि 'कसे' हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सरळ पुराव्यांच्या अभावी प्रत्येकाने हे प्रश्न आपापल्या पद्धतीने सोडवले. निरनिराळ्या धर्मातील मूलभूत तत्त्वांमध्ये जो फरक दिसतो, त्याचे कारण हेच आहे. कधीकधी हा फरक शत्रुत्व किंवा संघर्षाचे रूप धारण करतो. पूवेर्कडील आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात तर फरक आहेच, पण प्रत्येक भूगोलार्धातल्या मतप्रणालींमध्येही फरक आहे. आशियातल्या हिंदू धर्मात आणि मुस्लिम धर्मात कुठलाही सारखेपणा नाही. भारतातसुद्धा बौद्ध आणि जैन धर्म हे ब्राह्मणवादाहून खूप वेगळे आहेत. पुन्हा ब्राह्मणवादातही आर्यसमाज आणि सनातन धर्म अशी परस्परविरोधी मते आहेत. चार्वाक हा प्राचीन काळातील आणखी एक स्वतंत्र तत्त्वज्ञ होता, त्या काळातच त्याने ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान दिले होते. ही सगळी मते मूलभूत प्रश्नांबाबत एकमेकांपासून भिन्न आहेत आणि प्रत्येकाला वाटते की आपलेच बरोबर आहे. हेच तर दुदैर्व आहे. आम्ही जुन्या काळातील ज्ञानी व विचारवंतांचे अनुभव आणि विचारांना भविष्यातील अज्ञानाच्या विरोधातील लढाईचा आधार बनवून हा गहन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. ह्याऐवजी आम्ही आळशासारखे ते तर आम्ही सिद्ध झालोय त्यांच्या सांगण्यावर निःसंशय विश्वास ठेवून त्या विश्वासाचेच स्तोम माजवत आहोत. आणि अशा त-हेने मानवी विकासात अडथळा आणण्याचा गुन्हा करत आहोत.

Mi Nastik Ka Ahe - Author Shaheed Bhagat Singh      विकासासाठी सज्ज असलेल्या प्रत्येकाला रूढीवादी विश्वासाच्या प्रत्येक पैलूवर टीका तसेच त्यावर अविश्वास व्यक्त करावा लागेल आणि त्याला आव्हान द्यायला लागेल. प्रत्येक प्रचलित मताच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक अंगाने विवेकाच्या कसोटीवर घासून घ्यायला लागेल. खूप तर्कशुद्ध विचार करून जर कुणी कुठल्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झाला, तर त्याच्या विश्वासाचे स्वागत करू. त्याचा तर्क चुकीचा, भ्रामक आणि कधीकधी खोटाही असू शकतो. विवेक हा त्याच्या जीवनाचा मार्गर्दशक असल्यामुळे त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होऊ शकते. पण घट्ट विश्वास आणि अंधश्रद्धा धोकादायक आहेत. त्या माणसाला मूर्ख आणि प्रतिगामी बनवतात. जो माणूस स्वतः वास्तववादी असल्याचा दावा करतो, त्याला सर्व प्राचीन विश्वासांना आव्हान द्यावे लागेल. जर ते तर्कशुद्ध विचारांचा हल्ला सहन करू शकले नाहीत, तर कोसळून पडतील. अशा वेळी त्या व्यक्तीचे पहिले काम हे की तमाम जुन्या विश्वासांचा संपूर्ण निःपात करून नवीन तत्त्वज्ञानाच्या उभारणीसाठी जागा स्वच्छ करायची. ही नकारात्मक बाजू झाली. ह्यानंतर खरे काम सुरू होते ज्यामध्ये पुनर्बाधणीसाठी जुन्या मतांमधल्या काही गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. माझ्यापुरते म्हणाल तर मी हे आधीच मान्य करतो की मी ह्याविषयावर फार अभ्यास करू शकलेलो नाही. आशियाई तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची माझी खूप इच्छा होती पण मला तशी संधी मिळाली नाही. पण ह्या वादाच्या नकारात्मक बाजूचा विचार केला तर प्राचीन श्रद्धांच्या ठामपणाविषयी प्रश्न उत्पन्न करण्याइतपत तरी माझी खात्री झाली आहे. निसर्गातील घडामोडींचे संचालन व नियंत्रण करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ शक्ती अस्तित्वात नाही ह्याबद्दल माझी पक्की खात्री आहे. आमचा निसर्गावर विश्वास आहे. प्रगतीचे ध्येय माणसाने आपल्या सेवेसाठी निसर्गावर विजय मिळवणे हे आहे. ह्याला दिशा देण्यामागे परमात्मा नाही. हेच आमचे तत्त्वज्ञान आहे.

     नकारात्मक बाजूबद्दल बोलायचे तर आम्ही आस्तिक लोकांना काही प्रश्न विचारू इच्छितो: 

     तुमच्या श्रद्धेनुसार जर ही पृथ्वी किंवा हे विश्व त्या सर्वव्यापी, सर्वशक्तीमान अशा परमेश्वराने निर्माण केले आहे, तर त्याने मुळात हे सर्व का निर्माण केले हे कृपया मला सांगाल काय? दुःख आणि संकटांनी भरलेले हे जग—असंख्य दुःखांच्या निरंतर आणि अनंत युतिने ग्रासलेले! एकही प्राणीमात्र सर्वार्थाने सुखी नाही.

     कृपा करून हाच त्या जगनियंत्याचा नियम आहे असे सांगू नका. तो जर कुठल्या नियमांनी बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही. मग तो आपल्यासारखाच गुलाम आहे. कृपा करून ही त्याची आनंदक्रीडा आहे असेही म्हणू नका. नीरोने तर एक रोम जाळून खाक केले. त्याने फक्त काही लोकांची हत्या केली होती. त्याने फारच थोडे दुःख निर्माण केले, निव्वळ आपल्या आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी. आणि इतिहासात त्याचे काय स्थान आहे? इतिहासकार त्याचा कोणत्या नावाने उल्लेख करतात? सगळ्या कडवट विशेषणांचा त्याच्यावर वर्षाव होत असतो. नीरोचा निषेध करण्यासाठी जुलमी, निर्दयी, सैतान सारख्या शब्दांनी पानेच्या पाने भरली आहेत. एका चंगेजखानने स्वतःच्या सुखासाठी हजारोंचे प्राण घेतले आणि आज आपल्याला त्याच्या नावाचा तिरस्कार आहे. तर मग दररोज, दर तासाला नव्हे दर मिनिटाला असंख्य दःख देणाऱ्या आणि अजूनही देत असलेल्या सर्वशक्तिमान, अनादिअनंत नीरोचे कसे काय समर्थन करता? प्रत्येक क्षणाला चंगेजखानच्या दृष्कत्यांनाही मागे टाकणाऱ्या त्याच्या दष्कत्यांचा कसा स्वीकार करता ? मी विचारतो की खरोखरच नरक असलेल्या, अनंत आणि खोलवर वेदना देणाऱ्या ह्या जगाला त्याने निर्माणच का केले? त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराजवळ मनुष्य निर्माण न करण्याची ताकद होती तर मग त्याने माणसाची उत्पत्ती का केली? ह्या सर्व प्रश्नांची तुमच्याकडे काय उत्तरे आहेत? तुम्ही हेच म्हणाल की कष्ट सहन करणाऱ्या निदोर्ष लोकांना पुढच्या जन्मी चांगले बक्षीस देण्यासाठी आणि चका करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी हे घडत आहे. ठीक आहे. ठीक आहे. भविष्यात तुमच्या शरीरावर नाजूकपणे आणि आरामदायक मलमपट्टी करता यावी म्हणून आज आपल्याला जखमी करण्याचे धाडस करणाऱ्या त्या व्यक्तीचे तुम्ही अजून किती काळ समर्थन करणार आहात? एका भुकेलेल्या सिंहासमोर माणसाला फेकून द्यायचे आणि जर त्या माणसाने त्या जंगली जनावरापासून आपला बचाव करून स्वतःला वाचवले तर नंतर त्याची अगदी बडदास्त ठेवायची, हे काम करणाऱ्या ग्लॅडिएटर संस्थेच्या व्यवस्थापकांचे काम कितपत योग्य होते? म्हणूनच मी विचारतो, 'त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराने ह्या विश्वाची आणि त्यात माणसाची निमिर्ती का केली? स्वतःच्या मनोरंजनासाठी? तर मग त्याच्यात आणि नीरोमध्ये काय फरक आहे ?'

     मुसलमान आणि ख्रिस्ती बांधवांनो! हिंदू तत्त्वज्ञानामध्ये आणखी काही युक्तिवाद असू शकतात. मी तुम्हाला असे विचारतो की वरील प्रश्नांची तुमच्याकडे काय उत्तरे आहेत ? तुमचा तर पुनर्जन्मावर विश्वास नाही. त्यामुळे तुम्ही हिंदूंसारखा हा युक्तिवाद देऊ शकत नाही की पूर्वजन्मीच्या पापाचे फळ म्हणून निष्पाप व्यक्तींना यातना भोगाव्या लागतात. मी तुम्हाला असे विचारतो की त्या सर्वशक्तिशाली परमेश्वराने विश्वाच्या निमिर्तीसाठी सहा दिवस मेहनत का केली आणि वर असे का म्हणाला होता की सर्व काही ठीक आहे. त्या विधात्याला आजच बोलवा, आणि मागील इतिहास त्याला दाखवा. त्याला सद्य परिस्थितीविषयी अभ्यास करू दे आणि मग आपण पाह की सर्व काही ठीक आहे असे म्हणायचे धाडस आजही त्याला होते का ?

     तुरुंगातल्या अंधाऱ्या खोल्यांपासून, झोपडपट्टीत आणि वस्त्यांमध्ये उपाशीपोटी तडपत असलेल्या लाखो माणसांच्या समूहापासून ते त्या शोषित कामगारांपर्यंत — जे भांडवलशाही पिशाच्चाच्या रक्तशोषणाची क्रिया धाडसाने किंवा खरेतर, निरुत्साहाने पाहत आहेत तसेच मानवी शक्तीचा विनाश पाहत आहेत, जे पाहून साधे तारतम्य असलेल्या कोणाही माणसाच्या अंगावर भीतीने काटा येईल; आणि जास्तीचे उत्पादन गरजू लोकांना वाटण्याऐवजी समुद्रात फेकून देण्याला चांगले समजणाऱ्यांपासून ते राजांच्या महालांपर्यंत — ज्यांचा पाया माणसांच्या हाडांवर उभा आहे ... सर्व त्याला पाहू दे आणि मग म्हणू दे की सर्व काही ठीक आहे.' का आणि कशासाठी ? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही गप्प आहात? ठीक आहे, मग माझे म्हणणे मी पुढे नेतो.

     आणि हिंदूंनो तुम्ही, तुम्ही म्हणता की जे लोक आज कष्ट सोसत आहेत, ते पूर्वजन्मीचे पापी आहेत. ठीक आहे. तुम्ही म्हणता की आजचे शोषक गेल्या जन्मात साधूपुरुष होते, म्हणून आता ते सत्तेचा आनंद उपभोगत आहेत. मला हे मान्य करायला लागत आहे की आपले पूर्वज फार धूर्त होते. त्यांनी तर्क आणि अविश्वासाच्या सर्व प्रयत्नांना फोल ठरवण्याची ताकद असलेले तत्त्वज्ञान बनवले. पण ह्या गोष्टी कुठपर्यंत टिकाव धरतात ह्याचे विश्लेषण करण्याची गरज आहे. 

     न्यायव्यवस्थेच्या अत्यंत मान्यवर व प्रसिद्ध कायदेपंडितांच्या मते, गुन्हेगारावर होणाऱ्या परिणामाच्या आधारावर शिक्षा फक्त तीन किंवा चार कारणांनी उचित ठरवली जाऊ शकते. ती अशी — सूड, भीती आणि सुधारणा. आज सर्व पुरोगामी विचारवंतांनी बदला घेण्याच्या सिद्धांताची निंदा केली आहे. भीतीच्या सिद्धांताचा शेवटही तोच आहे. फक्त सुधारण्याचा सिद्धांतच आवश्यक आहे आणि तोच मानवाच्या प्रगतीचा अविभाज्य भाग आहे. अपराध्याला अत्यंत योग्य आणि शांतताप्रिय नागरिक म्हणून समाजामध्ये परत येता यावे हा ह्याचा उद्देश आहे. पण घटकाभर आपण मान्य केले की काही माणसांनी (पूर्वजन्मी) पाप केले आहे तर अशांना देव कोणत्या प्रकारची शिक्षा देतो? तुम्ही म्हणता की तो त्यांना गाय, मांजर, झाडंझडप, पशू, वगैरे जन्म देऊन जगात पाठवतो. तुमच्या मते ह्या दंडांची संख्या ८४ लक्ष आहे. मी तुम्हाला असे विचारतो की ह्याचा माणसाची सुधारणा होण्याच्या दृष्टीने काय परिणाम होतो? पाप केल्यामुळे मी गेल्या जन्मी गाढव होतो असे सांगणारी किती माणसे तुम्हाला भेटली आहेत. एकही नाही? आपल्या पुराणांमधले दाखले देऊ नका. माझ्यापाशी आता तुमच्या पुराणकथांना काहीही स्थान नाही. आणि तुम्हाला हे ठाऊक आहे का की गरीब असणे हे जगातील सगळ्यात मोठे पाप आहे? गरिबी हा एक अभिशाप आहे, एक दंड आहे. मला असे विचारायचे आहे की माणूस आणखी जास्त गुन्हे करायला प्रवृत्त होईल अशा शिक्षा सुचवणाऱ्या कायदेतज्ज्ञाची तुम्ही प्रशंसा कराल काय? तुमच्या ईश्वराने हा विचार केला नव्हता का? त्यालाही ह्या सगळ्या गोष्टी मानवजातीला भोगाव्या लागणाऱ्या अपरंपार कष्टांच्या मोबदल्यात अनुभवातूनच शिकायच्या होत्या का? एखाद्या चांभार किंवा भंग्यासारख्या गरीब आणि अशिक्षित कुटुंबात जन्म घेणाऱ्या माणसाच्या नशिबी काय वाढून ठेवलेले असते असे तुम्हाला वाटते? तो गरीब आहे त्यामुळे तो शिकू शकत नाही. उच्च जातीत जन्माला आल्यामुळे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांकडून त्याचा तिरस्कार केला जातो. त्याचे अज्ञान आणि त्याची गरिबी, तसेच त्याला मिळणारी अपमानास्पद वागणूक ह्यामुळे त्याच्या मनात समाजाबद्दल निष्ठुरता निर्माण होते. समजा त्याने एखादे पाप केले, तर त्याचे परिणाम कुणाला भोगावे लागतील? देवाला, त्याला स्वतःला की समाजातल्या बुद्धीवंतांना? मगरूर आणि अहंकारी ब्राह्मणांनी ज्यांना ज्यांना कानात गरम शिसे ओतण्याची शिक्षा मिळत असे, अशा माणसांना मिळणाऱ्या शिक्षेचे काय? त्यांनी जर एखादा गुन्हा वा अपराध केला, तर त्याला जबाबदार कोण आणि त्याचा वार कोण सहन करणार? माझ्या प्रिय मित्रांनो, हे सर्व सिद्धांत मूठभर प्रस्थापितांचे युक्तिवाद आहेत. ह्याच तत्त्वज्ञानाच्या आधारे ते त्यांनी बळकावलेली सत्ता, संपत्ती आणि श्रेष्ठत्वाचे समर्थन करतात. होय, बहुदा अप्टन सिंक्लेअरने कुठेतरी असे लिहिले आहे की माणसाला फक्त आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास ठेवायला लावा आणि मग त्यानंतर त्याची सर्व संपत्ती व मालमत्ता खुशाल लुबाडा ! अजिबात कुरकुर न करता तो त्यामध्ये तुम्हाला मदत करेल. धर्मोपदेशक आणि सत्ताधारी ह्यांच्या युतीमुळेच तुरुंग, वधस्तंभ, दंडुका आणि हे तत्त्वज्ञान जन्माला आले आहे.

     मला पुढे असेही विचारायचे आहे की जेव्हा माणूस पाप किंवा गुन्हा करत असतो तेव्हाच त्याला तुमचा तो सर्वशक्तिमान परमेश्वर त्यापासून परावृत्त का करत नाही? हे तर तो अगदी सहज करू शकतो. त्याने युद्ध करणाऱ्या राजांना का ठार मारले नाही किंवा त्यांच्यातील युद्धाची उर्मी गाडून का टाकली नाही, आणि ह्याप्रकारे महायुद्धामुळे मानवतेवर पडलेल्या संकटापासून त्याने का नाही वाचवले? भारताला स्वतंत्र करण्याची भावना त्याने इंग्रजांच्या मनात का नाही निर्माण केली? उत्पादनाच्या साधनांवर असलेला आपला व्यक्तिगत मालकी हक्क सोडावा अशी भांडवलदारांच्या मनात परोपकाराची भावना तो का उत्पन्न करत नाही आणि अशा प्रकारे सर्व श्रमिकांचीच नव्हे तर संपूर्ण मानवी समाजाची भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्तता तो का करत नाही? समाजवादी तत्त्वज्ञानाच्या व्यवहार्यतेविषयी तुम्हाला वाद घालायचा आहे ना, मी तो प्रत्यक्षात उतरवण्याचे काम तुमच्या परमेश्वरावरच सोपवतो. सर्वसामान्यांच्या हिताचा प्रश्न असेल तर लोक समाजवादाच्या तत्त्वज्ञानाला मानतात, पण तो व्यावहारिक नसल्याच्या सबबीखाली विरोध करतात. चला तर, तुमच्या परमेश्वरालाच येऊन सर्व गोष्टी योग्य प्रकारे करू दे. आता आडवळणाने त्याचा युक्तिवाद करू नका, त्याचा काही उपयोग नाही. मला तुम्हाला हे सांगायचे आहे की ईश्वराची इच्छा आहे म्हणून इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत असे नव्हे, तर त्यांच्याकडे ताकद आहे आणि आपण त्याला विरोध करण्याचे धैर्य दाखवत नाही म्हणून आहे. देवाच्या सहाय्याने त्यांनी आपल्याला गुलामीत ठेवलेले नाही, तर बंदुका, रायफली, काडतुसे, बॉम्ब, पोलीस आणि सैन्याच्या आधारे ठेवले आहे. समाजाच्या विरोधातील सगळ्यात निंद्य अपराध — एका देशाने दुसऱ्या देशाचे शोषण करणे ते यशस्वीपणे करत आहेत. ह्याला कारण आपली उदासीनता आहे. कुठे आहे परमेश्वर? आणि काय करतोय तो? मनुष्यमात्रांच्या ह्या यातनांचा तो आनंद लुटतोय का? तो नीरो आहे, तो चंगेजखान आहे, त्याचा सर्वनाश होवो!

     ह्या विश्वाच्या उत्पत्तीची आणि ह्या मानवाच्या उत्पत्तीची व्याख्या मी कशी करतो हे तुम्हाला विचारायचे आहे का ? ठीक आहे, मी सांगतो. चार्ल्स डाविर्नने ह्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ते वाचा. सोहन स्वामींचे कॉमन सेन्स हे पुस्तक वाचा. काही प्रमाणात तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. विश्वाची उत्पत्ती एक नैसगिर्क प्रक्रिया आहे. तेजोमेघाच्या आकाराच्या विविध पदार्थांच्या आकस्मिक मिश्रणातून पृथ्वीची निमिर्ती झाली. कधी? इतिहासात बघा. अशाच प्रकारच्या घटनेमुळे जीवजंतू जन्माला आले आणि बऱ्याच कालावधीनंतर माणस. प्रजातींची उत्पत्ती हा डाविर्नचा ग्रंथ वाचा, त्यानंतरची सर्व प्रगती ही माणसाने सतत निसर्गाशी केलेल्या संघर्षातून आणि त्याच्यावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नातून झाली आहे. ही ह्या घटनेची कदाचित सर्वात संक्षिप्त व्याख्या आहे.

     तुमचा दुसरा युक्तिवाद हा असू शकतो की एखादे मूल जन्मतःच आंधळे किंवा पांगळे निपजते, ते पूर्वजन्मी केलेल्या पापामुळे नाही तर मग कशामुळे? जीवशास्त्रज्ञांनी ह्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामते सर्व दोष आईवडिलांचा आहे — जे आपल्या त्या कामाबाबत बेजबाबदार किंवा अडाणी आहेत, जे अपत्याला जन्मापूर्वीच विकलांग बनवतात.

     निव्वळ बालिश असला तरी साहजिकच तुम्ही मला आणखी एक प्रश्न विचाराल आणि तो प्रश्न हा आहे की जर देव अस्तित्वातच नाही तर मग लोक त्यावर विश्वास कसे ठेवायला लागले ? ह्यावर माझे थोडक्यात पण स्पष्ट उत्तर आहे — जसे ते भूतपिशाच्च्यांवर व दुष्ट आत्म्यांवर विश्वास ठेवायला लागले, तसेच ईश्वरावरही विश्वास ठेवायला लागले. फरक इतकाच आहे की देवावरचा विश्वास जगत्व्यापी आहे आणि त्याचे तत्त्वज्ञानही विकसित आहे. शोषणकर्ते परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देऊन लोकांना आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात, तसेच स्वतःच्या विशेष स्थानाला मान्यता प्राप्त करून घेतात. काही उग्रपरिर्वतनवादी (रॅडिकल) ह्याच्या उत्पत्तीचे श्रेय त्या शोषणकर्त्यांच्या प्रतिभेला देतात, पण मला ते मान्य नाही. सर्व धर्म, संप्रदाय, पंथ आणि अशा अन्य संस्था, शेवटी पिळवणूक करणाऱ्या संस्थाच्या, व्यक्तींच्या आणि वर्गाच्या समर्थक बनतात ह्या मूलभूत गोष्टीबाबत त्यांच्याशी माझा विरोध नाही. राजाविरुद्ध बंड करणे प्रत्येक धर्मात नेहमीच पाप समजले जाते. 

     ईश्वराच्या उगमाबद्दल माझा विचार हा आहे की माणसाला आपल्या मर्यादा, दुबळेपणा आणि त्रुटी समजल्यानंतर सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी, सर्व संकटांना धैर्याने तोंड देण्यासाठी, तसेच समृद्धीच्या आणि भरभराटीच्या काळात स्वतःला आवर घालण्यासाठी माणसाने देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण केले. स्वतःचे व्यक्तिगत नियम आणि पालकांची उदारता असलेल्या अशा देवाची संकल्पना जास्त मोठी करून रंगवली गेली. माणूस समाजाला घातक ठरू नये म्हणून त्याला भीती घालण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी देवाचा कोप किंवा व्यक्तिगत नियमांची कल्पना केली गेली. जेव्हा त्याच्या पालकत्वाच्या गुणांची व्याख्या केली जाते, तेव्हा त्याचा उपयोग माता-पिता, बंधू, भगिनी, सखा आणि मदतनीस अशा रूपात होतो. जेव्हा सर्व मित्र विश्वासघात करतात किंवा दर लोटतात, तेव्हा त्याला आधार द्यायला एक खरा मित्र आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे व काहीही करू शकतो ह्या कल्पनेने धीर मिळतो. आदिमानवाच्या काळात ही गोष्ट समाजासाठी उपयोगी होती. संकटाच्या काळात ईश्वराच्या संकल्पनेने माणसाला मदत होते. 

     मूर्तिपूजा, धर्मातील कोत्या समजुती ह्यांविरुद्ध समाज जसा लढला, तसेच ईश्वराच्या श्रद्धेविरुद्धही लढावे लागेल. अशाप्रकारे माणस जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करू पाहतो आणि वास्तववादी बनू लागतो. तेव्हा देवावरच्या श्रद्धा त्याला एका बाजूला फेकून द्यायला पाहिजेत. सर्व कष्ट व संकटे ह्यांचा समर्थपणे सामना करण्याचे शौर्य दाखवायला हवे, माझी अवस्था आज नेमकी अशीच आहे. हा माझा अहंकार नाही. मित्रांनो! माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच मी नास्तिक बनलो आहे. ईश्वरावर विश्वास आणि रोजची देवपूजा व प्रार्थना—ज्याला मी माणसाचे सर्वात स्वार्थी आणि खालच्या दर्जाचे काम मानतो—ह्यामुळे मला मदत होईल की माझी परिस्थिती आणखी बिकट होईल मला माहीत नाही. सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या नास्तिकांबद्दल मी वाचले आहे, म्हणूनच, अगदी वधस्तंभापर्यंतच्या अंतिम घटकेपर्यंत मी ताठ मानेने उभा राहू इच्छितो.

     मी ह्या विचारांवर किती प्रामाणिक राहतो ते पाहायचे आहे. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितले. मी जेव्हा त्याला माझ्या नास्तिक असण्याबद्दल सांगितले, तेव्हा तो म्हणाला, 'तुझ्या अखेरच्या दिवसांत तू देवावर विश्वास ठेवू लागशील बघ.' मी म्हणालो, 'नाही माझ्या मित्रा, असे होणार नाही. असे करणे ही माझ्यासाठी अपमानास्पद बाब आहे आणि ती माझी हार असेल. स्वार्थी हेतूसाठी मी प्रार्थना करणार नाही.' वाचक आणि मित्रहो, ह्याला तुम्ही अहंकार म्हणाल काय? जर तो असेल, तर मी त्याचा स्वीकार करतो.

- शहीद भगतसिंग



You might like This Books -

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209