धुळे, ता. १४ : दोंडाईचा येथील आनंदनगरमधील रहिवासी निवृत्त शिक्षक गणेश नारायण पाटील उपाख्य जी. एन. पाटील (वय ७९) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव कुटुंबीयांनी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागास दान केले. (स्व) पाटील मूळचे कंडारी (जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत. त्यांनी जळगाव येथील भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये सेवा दिली. शिस्तबद्ध व विद्यार्थिप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. ते २००३ मध्ये निवृत्त झाले. नंतर ते दोंडाईचा येथे सहकुटुंब स्थायिक झाले. अनेक वर्ष दोंडाईचातील हस्ती पब्लिक स्कूलच्या शिक्षक- पालक संघाचे सक्रिय सदस्य राहिले. त्यांनी मरणोत्तर देहदानाची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार कन्या चारुशीला पवार, वैशाली पाटील, तेजोमयी देशमुख, पूर्ती शिंदे, नेहा पाटील व जावई यांनी (स्व) पाटील यांचे पार्थिव दान केले. यातून वैद्यकीय विद्यार्थी हितासाठी समाजापुढे आदर्श निर्माण केला.