कोल्हापूर : जातवार जनगणना केली जात नसल्यामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे. भावी पिक्यांच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक व राजकीय अस्तित्वासाठी आरक्षण टिकवणे काळाची गरज आहे. आरक्षणाची जननी असलेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत जातवार 'जनगणना झालीच पाहिजे, या मागणीसाठी ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णयही झाला.
कोल्हापूर जिल्हातील ओबीसी, भटके विमुक्तांच्या सुमारे ६५ पेक्षा अधिक समाज संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचा मेळावा बुधवारी वैश्यवाणी समाज बोर्डिंगमध्ये झाला. यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंज, मारुतराव कातवरे, भोई समाजाचे राजेंद्र ठोंबरे, वैश्य समाजाचे राजेंद्र केसरकर, मुस्लिम ओबीसी समाजाचे गणी आजरेकर, धनगर समाजाचे बबनराव रानगे, नगरसेवक राहुल चव्हाण, जहाँगीर अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रस्ताविकात ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार म्हणाले, भारत देश घडविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य हजारो जातीमध्ये विखुरलेल्या गोरगरिब कष्टकरी, श्रमजीवी सेवाकरी ओबीसी प्रवर्गातील जन्मजात कारागिरांनी केले आहे. या लोकांची राजकीय, शैक्षणिक आणि नोकयातील आरक्षणामुळे होत असलेली प्रगती पहावत नसल्याने केंद्र व राज्य सरकारमधील तसेच आरक्षण विरोधी उच्चवर्णीय - उच्चवर्गीय लोकांनी विविध प्रकारचे न्यायालयीन खटले दाखल करून ओबीसी आरक्षणच संपविण्याचा डाव मांडला आहे.
बैठकीत ओबीसी आरक्षण आंदोलनास गती देण्याबाबत समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच, जातवार जनगणनेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असा निर्धारही व्यक्त केला. यात ओबीसी जनमोर्चाच चिटणीस सयाजी झुंजार, सुतार लोहार समाजाचे अध्यक्ष व्ही. डी. लोहार, सोनार समाजाचे अध्यक्ष सुधाकर पेडणेकर, परीट समाजाचे गजानन लिगम, नाभिक समाजाचे बाबासाहेब काशीद, जैन पंचम शीतल मंडपे, वडर समाजाचे रामजी पवार, डवरी समाजाचे दत्तात्रय डवरी, बागडी समाजाचे गणपतराव बागडी, स्वकुळ साळी समाजाचे वसंतराव काजवे, कोल्हाटी समाजाचे आजिस औंधकर, शाबू दुधाळे, लोहार समाजाचे संजय : लोहार, तांबट समाजाचे सूरज बड़के आदींचा समावेश होता. यावेळी मंगल निपानीकर, मालती सुतार, राधा मेस्त्री, शैला मोरे, माधुरी वडके, रेखा परमाळे, रूपाली रोडे-मकोटे आदी उपस्थित होते.
स्वागत ज्ञानेश्वर सुतार यांनी, सूत्रसंचालन रूपाली सातार्डेकर यांनी तर आभार मोहन हजारे यांनी मानले.