क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तसेच महिलांना शिक्षणाचे दालन खुले करून दिले. त्यामुळे आजच्या समाजात स्त्री सन्मानाने जीवन जगत आहे. मुलींनी सावित्रीमाता फुलेंच्या विचारांचा वारसा पुढे चालवावा असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी केले.
प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय मुलींचे कंधार येथे सावित्रीमाता फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे, सावित्रीमातेच्या वेशभूषेतील मुलींचा सत्कार व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ.राजश्री शिंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मिरा शिरसागर, प्रतिभा खैरे, मनीषा कुरुडे आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार सौ.वर्षाताई यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीमाता फुले यांच्या वेशभूषेतील मुलींना शालेय साहित्य देऊन सौ. वर्षाताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. भोसीकर म्हणाल्या की, ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून, समाजातील सर्व हक्कापासून वंचित ठेवले जात होते. त्यावेळी सावित्रीमाता फुले यांनी स्वतः अंगावर शेण, माती, दगड झेलून स्त्रियांसाठी शाळा सुरु केली. स्त्रियांना शिक्षणाचे दालन खुले करून दिले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया सर्व क्षेत्रात काम करत आहेत. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळाले. सर्व हक्क मिळाले. हे सर्व क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे घडले. म्हणून सर्व मुलींनी संकल्प करून त्यांच्या विचारांचा वारसा चालवत उच्च शिक्षण घेऊन आपले व आपल्या कुटंबाचे नाव उज्वल करावे व सर्व पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावे असे त्या म्हणाल्या.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan