- ज्ञानेश वाकुडकर
काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सध्या अस्तित्वात नाही, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले. एकूणच त्यांनी काँग्रेसऐवजी आपली ताकद किंवा संभावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या बाबतीत जास्त व्यापक आहे, असा संकेत देण्याचा प्रयत्न केला.
व्यापक विचार करता देशात सध्या दोनच राजकीय विचारधारा प्रभावीपणे कार्यरत दिसतात. पहिली काँग्रेसची सर्वसमावेशक विचारधारा आणि दुसरी भाजपची तालिबानी किंवा मनुवादी/वर्णवादी विचारधारा ! कम्युनिस्ट विचारधारा सध्यातरी मागे मागे हटत आहे, असे दिसते. ती सर्वव्यापी होण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी दिसत नाही. समाजवाद उत्तरप्रदेशात नावापुरता उरलेला आहे. आंबेडकरवाद कागदोपत्री आहे. गांधी, फुले, शिवाजी, पेरियार यांच्या मदतीशिवाय आंबेडकरवाद राजकीयदृष्ट्या पुढे जाऊ शकेल असे वाटत नाही. दक्षिणमध्ये पेरियार प्रभावी आहेत. बीएसपी हा पक्ष कधीही आंबेडकरवादी नव्हता. त्यातल्यात्यात प्रकाश आंबेडकर यांना थोडेतरी श्रेय द्यायला हवे. ते मध्ये मध्ये खटपट जरूर करतात. पण त्यांची खिचडी बहुधा डाकू लोकांच्याच उपयोगी पडताना दिसते ! विश्वासार्हता हा त्यांच्या बाबतीतला सर्वात मोठा अडसर आहे.
फुले, शाहू, आंबेडकरवाद मांडण्याचा प्रयत्न सामाजिक चळवळींच्या माध्यमातून सुरू असला, तरी त्याला राजकीय व्यवहार्यता दिसत नाही. स्वतःचा निश्चित राजकीय कार्यक्रम अशा कोणत्याही संघटनेकडे नाही. उत्तरप्रदेशात मायावती यांनी पुन्हा पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवले हे खरे असले, तरी त्यांना आंबेडकरवादी म्हणायचे म्हणजे छातीवर दगड नव्हे पर्वत ठेवूनच बोलावे लागेल.
आंबेडकरवादी लोकांनी गांधींचा कितीही विरोध केला, तरी बुद्धाच्या सम्यक विचारांचे प्रतिबिंब गांधीवादी राजकारणातच दिसते, ही खरी गंमत आहे. तेच आंबेडकरवाद्यांचे दुखणे आहे. सम्यक विचारधारा स्वीकारल्याशिवाय त्यांना भवितव्य नाही. पण त्यासाठी त्यांची मानसिक तयारी नाही. ज्या व्यापक अर्थाने आणि उद्देशाने बाबासाहेबांनी बुद्धाचा हात धरला, गुरू मानले, त्याचा आंबेडकरी पक्ष किंवा नेत्यांनी किती प्रमाणात अंगीकार केला, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांना गांधीद्वेश, हिंदू द्वेष, सरसकट ब्राम्हणद्वेष आणि व्यक्तिपूजा यातून बाहेर यावे लागेल. सम्यक दृष्टीने राजकीय धोरण आखावे लागेल आणि तसे प्रत्यक्ष कृतीतून दिसले, तरच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. तरच त्यांना भवितव्य आहे. अन्यथा उत्तरप्रदेशचे मॉडेल तर देशाने अनुभवले आहे ! केवळ सत्ता म्हणजे आंबेडकरवाद आहे का ?
वरील सर्व गोष्टींचा विचार करता काँग्रेस आणि भाजपा हेच दोन राष्ट्रीय पक्ष शिल्लक राहतात. त्यातही पक्ष आणि टोळी ह्यातला मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. दूरदर्शी धोरण आणि विधायक निर्मिती हे पक्षाचं काम आहे. उलट, दुसऱ्याने निर्माण केलेल्या संपत्तीपैकी जास्तीत जास्त संपत्ती कमीतकमी वेळात ओरबाडणे हा डाकू लोकांचा कार्यक्रम असतो. जे लुटून सोबत नेता येत नाही ते उध्वस्त करून टाकणे, याकडे डाकूंचा कल असतो. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या घटांनाचा आढावा घेतल्यास डाकूंचे खरे चेहरे आपल्या नजरेसमोर स्पष्टपणे दिसतील.
कधी कधी पाटलाचा अतिरेक होतो, आपलेही कान भरले जातात, आपणही भरकटतो. पण पाटलाला पर्याय निर्माण करण्याऐवजी थेट डाकुंची मदत आपण घेतो. आपल्याला सोयीचा सौदा आणि स्वतःचे कमिशन हवे असते. आणि मग काही वेळासाठी का होईना, पण साऱ्या गावावर डाकुंचा कब्जा होतो. पण राज्य चालवणं आणि डाका घालणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. हे अलीकडे आपल्याही लक्षात आलेलं आहे.
मुख्य मुद्दा असा की, ममता बॅनर्जी काँग्रेसचा पर्याय होऊ शकतात का ? एकूण परिस्थिती पाहता सध्यातरी ते शक्य नाही. त्या त्यांच्या राज्यात शक्तिशाली जरूर आहेत. पण बाहेर पाच खासदार तरी निवडून आणू शकतील का ? शिवाय लोकसभेच्या वेळी मोदी विरोधी सारीच मते ममता यांना थोडीच मिळणार आहेत ? काही काँग्रेसला जातील. काही कम्युनिस्टांना जातील. खुद्द बंगालमध्ये लोकसभेत काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांनाही जागा मिळतील, याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात, लोकसभेचे निकाल हाती आल्यावर अनेक नवी समीकरणं समोर येतील. ही शक्यता लक्षात घेता आणखी एखादे देवेगौडा अनपेक्षितपणे प्रधानमंत्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण तरीही काँग्रेसला डावलून हे शक्य होईल असे दिसत नाही.
सध्याची परिस्थिती पाहता युपी मध्ये भाजपाचा सफाया होणार हे नक्की आहे. काँग्रेसच्या जागा अप्रत्याशितपणे वाढतील. लोकसभेत अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यामध्ये चढाओढ असेल. खुद्द ममता बॅनर्जी यांच्या राज्यातून काँग्रेसला लोकसभेसाठी काही जागा नक्कीच मिळतील. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगढ, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, आसाम आदी राज्यात काँग्रेसच्या जागा वाढण्याची भरपूर शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांना कुठे संधी आहे ? त्रिपुराच्या दोन आणि बंगालच्या ४२ अशा ४४ मधून त्यांना मिळून मिळून किती जागा मिळणार आहेत ? बंगालमध्ये सर्वाधिक जागा मिळतीलही. पण इतर राज्यात काय ? उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वाटणी होईल. अशावेळी अखिलेश यादव देखील आकड्यांच्या बाबतीत ममतांच्या पुढे जाऊ शकतात. मात्र दुसरी कोणतीही पार्टी काँग्रेसची बरोबरी करू शकणार नाही. म्हणजे मुख्य लढत भाजपा आणि काँग्रेस अशीच राहणार आहे.
केवळ एखाद्या विषयात सर्वच्या सर्व मार्क मिळवून होत नाही. पास होण्यासाठी इतरही विषयात किमान काही मार्क्स मिळवावे लागतात. काँग्रेस वगळता बहुतेक सारे पक्ष एका एका राज्याचे मास्टर आहेत. ते काँग्रेसची बरोबरी करू शकत नाहीत. आम आदमी पार्टी बाहेरच्या राज्यात हातपाय हलवतांना दिसते. पण केजरीवाल यांची कल्हई तशीही उखडायला लागली आहे. काँग्रेस अगदीच कोमात गेल्यासारखी झाली होती म्हणून, आपचा भाव अचानक वधारला होता. पण काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण व्हायला लागल्याबरोबर केजरीवाल यांची मागणी आपोआप कमी होईल, यात संशय नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, भाजपा सोबत कधीही जाणार नाही, असा एकमेव पक्ष काँग्रेस हाच आहे. बाकी ममता, मायावती, नितीशकुमार वगैरे वगैरे सारे लोक केव्हा पलटी मारतील याचा भरोसा नाही. भाजपला सुद्धा त्याची कल्पना आहे. त्यामुळे सारे विरोधक कळत नकळत काँग्रेसलाच खच्ची करण्याचा प्रयत्न करतात.
मुळात काँग्रेस असो, महात्मा गांधी असो की सोनिया-राहुल किंवा प्रियंका गांधी असो, यापैकी कुणीही भाजपा वगळता इतर कुणाचेही घोडे मारलेले नाही. ते आपले सर्वसमावेशक राजकारण करत आलेत. तरीही विरोधक त्यांचा द्वेष का करतात ? त्यांचा द्वेष करण्यापेक्षा आपण कोणते दिवे लावले, याचा शोध का घेत नाहीत ? म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहणार आणि त्यांनी तुम्हाला मदत करावी, तुमचे गोडवे गावे, तुम्हाला निवडून आणावे, अशी अपेक्षा करायची, हा कोणता शहाणपणा आहे ?
अर्थात, प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात. काँग्रेसच्याही काही चुका झाल्यात. पण तरीही थेट स्वातंत्र्याच्या लढाईपासून देशाला देश म्हणून उभे करण्यात काँग्रेसचे जेवढे योगदान आहे, त्याच्या पासंगाला तरी इतर कुणी पुरेल का ? इतर कोणत्याही पक्ष किंवा नेत्यापेक्षा काँग्रेस जास्त समाजाभिमुख होती आणि आहे, यात संशय नाही. त्याचाच परिणाम म्हणून मनमोहनसिंग दोनवेळा प्रधानमंत्री होऊ शकलेत. बाळासाहेब ठाकरे यांचा अपवाद वगळता बाहेरच्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची हिम्मत विरोधकापैकी इतर कोणत्या पक्षांनी दाखवली आहे ?
तेव्हा, काँग्रेसला कमी लेखण्याची चूक विरोधी पक्षातील इतरांनी करू नये. २०१४ च्या आधी मायावती गुडघ्याला बाशिंग बांधून देशभर पत्रिका वाटायला लागल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून उत्तरप्रदेशात बसपा साफ झाली. लोकांनी त्यांच्यापेक्षा मोदींना निवडले. आता ममताच्या उतावीळपणामुळे लोक काँग्रेसला जास्त जवळ करतील, याबद्दल संशय नाही. कारण मोदी यांना देशातून हद्दपार करायचे जनतेने ठरवले आहे. मायावती आणि ममता यांच्यामध्ये काही बाबतीत नक्कीच साम्य आहे, जे बरेचदा लोकांना आवडत नाही. शरद पवार यांच्यासारखा नेता हे सारे प्रकार मनापासून स्वीकारणे शक्य आहे का ? ते उद्याचे उद्या बघू ! पण उताविळपणा करून ममतांनी देशपातळीवर स्वतःची प्रतिमा खराब करून घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकी नंतर अचानक चढलेला त्यांचा ग्राफ झटक्यात खाली आलेला आहे. असो.. आपण उद्याची वाट बघू या !
तूर्तास एवढेच..
-
ज्ञानेश वाकुडकर - अध्यक्ष लोकजागर