जिल्हा परिषद निवडणूक भंडारा : आरक्षण नाही तर मतदान नाही, असा प्रवित्रा घेतल्यानंतर आता 'कृपया मत मागायला येवू नका', अशा पाट्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ओबीसींच्या घरावर लागल्या आहेत. या पाट्या पाहून निवडणुकीतील उमेदवार मात्र संभ्रमीत झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडणुका स्थगित झाल्याने ओबीसी समाजात संताप व्यक्त होत आहे.
इतर मागासवर्गीयांना आरक्षण पुन्हा बहाल करणारा राज्य सरकारच्या वटहुकूमाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढून नामाप्र प्रवर्गातील निवडणुकीला स्थगिती दिली. भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होत आहे.
जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक या आदेशामुळे स्थगित झाली. त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक झाल्या. आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी थेट भूमिका घेतली. ठिकठिकाणी सभा घेवून या निर्णयाचा निषेध केला जात आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेवू नका. घोषित निवडणुका स्थगित करा, अशी मागणी होवू लागली आहे.
अशातच आता भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ओबीसी बांधवांनी आपल्या घरावर पाट्या लावणे सरू केले आहे. भंडारा तालुक्यातील पिंपरी पुनर्वसन येथे ओबीसी समाजाच्या घरावर पाट्या झळकत आहे. आम्हाला आरक्षण नाही तर केवळ आम्ही मतदानच करायचे काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. घराच्या दर्शनी भागात लावलेल्या पाट्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता निवडणुकीत ओबीसी बांधव कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
ओबीसींचे आज राजकीय आरक्षण गेले उद्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आरक्षण जाण्याची भीती आहे. त्यामुळे आताच ओबीसी समाजाने जागृक होण्याची गरज आहे. त्यामुळेच आम्ही आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमीका घेतली. ओबीसी समाज बांधव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करणार नाही. -संजय मते, मुख्य संयोजक, ओबीसी क्रांतीमोर्चा,
आम्हाला राजकीय आरक्षण नाही तर कुणाला आम्हाला मत मागण्याचाही अधिकार नाही. आमच्या घरी कुणीही मत मागायला येवू नये. आम्ही मतदानही करणार नाही. -सुरेश सावरकर, पिंपरी पुनर्वसन.
निवडणुकीसाठी आमच्याकडे कुणी मत मागायला येवू नये. आधी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देवून निवडणूका घेतल्या तरच आम्ही निवडणुकीत मतदानाला जावू. - लहानू कातोरे, पिंपरी पुनर्वसन,
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan