भुजबळ सांगा कोणाचे ? नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने !

- ज्ञानेश वाकुडकर
 

     नाशिक येथे होऊ घातलेले तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या वैचारिक मानसिकतेच्या लोकांचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही ! साहित्य निर्मितीसाठी सरोगेटेड तंत्राने गर्भार राहणाऱ्या लोकांचा हा कळप आहे. या निमित्ताने एकत्र येवून हे लोक आपसात स्वतःचे साहित्यिक शौक भागवून घेत असतात. मात्र अशा संमेलनांना सरकार लाखो रुपये देत असते. हा पैसा तुमचा आमचा असतो, म्हणून या लोकांच्या चालबाजीची दखल घेणे अनिवार्य ठरते. 

     हे लोक सरकारी पैसा तर घेतातच, पण तेवढ्याने यांची भूक भागत नाही. पोटाला उशी बांधून फिरणाऱ्या 'साहित्यगर्भारांचे' डोहाळे पुरवणारा आणखी एखादा टेंपररी बाप यांना हवा असतो ! अन्यथा, अशा 'ठेवलेल्या' साहित्यिक निर्मितीच्या बाळंतपणाची जबाबदारी कोण घेणार ? बारश्याचा खर्च कोण करणार ? त्यासाठी मोठा 'चोरखिसा' असलेला बळीचा बकरा निवडला जातो. त्यालाच स्वागताध्यक्ष म्हणतात ! 

 Nashik Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Chhagan Bhujbal    हा स्वागताध्यक्ष नावाचा 'पुण्यात्मा' नको नको त्या औरस-अनौरस प्रतिभावंत आत्म्यांचे अगदी कमरेत वाकून स्वागत करतो. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो. आणि आपणही जणू विचारवंत आहोत, अशा समजुतीने त्याच्याच पैशाने तयार झालेल्या भव्य स्टेजवर कोपऱ्यात जाऊन बसतो. काही प्रतिभावंत साहित्यिक देखील तोंडी लावण्यापूरते स्टेजवर उपस्थित असतात. ते तसे ठेवावेच लागतात. मात्र त्यांचा उपयोग आणि महत्त्व तंतोतंत चड्डीच्या नाड्याएवढेच असते !

     अर्थात संबंधित संमेलन खरंच विचारवंतांचे असेल, सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांचे असेल, तर अशा संमेलनाला आर्थिक सहकार्य करणे, त्यातील मान्यवरांचे नम्रपणे स्वागत करणे, ही नक्कीच गौरवाची गोष्ट आहे. अशा मान्यवर लोकांच्या समोर जर एखादी प्रतिष्ठित धनवान व्यक्ती किंवा सत्तेतील मोठी व्यक्ती नम्रतेने झुकत असेल, तर दोघांचाही मान वाढतो. संमेलनाचीही उंची वाढते. प्रतिष्ठा वाढते. समाजातही सकारात्मक संदेश जातो. मात्र, अनेक चोरखिसे असणाऱ्या प्रत्येक मंत्र्याकडे तेवढी समज किंवा शहाणपणा असावा, अशी अपेक्षा आपल्याला करता येणार नाही, हेही खरं आहे !

     तथापि, ना. छगन भुजबळ हे 'वैचारिक दिवाळखोर' अशा विशेष गुणवत्ता श्रेणीतील नाहीत. ते महात्मा फुल्यांचे नाव घेवून आपले राजकारण करत असतात ! त्यामुळेच त्यांची या साहित्य संमेलनाच्या बाबतीतली भूमिका अनाकलनीय आहे ! ते जर स्वतःला फुल्यांचे सामाजिक, राजकीय वारसदार समजत असतील, तर त्यांच्या या भूमिकेचा अर्थ कसा लावायचा ? त्यांचा खरा चेहरा नेमका कोणता समजायचा ? बहुसंख्य भंगार असलेल्या संमेलनातील लोकांच्यासमोर वाकण्याची लाचारी त्यांच्यासारख्या नेत्याने का पत्करावी ? त्यातून समाजात कोणता संदेश जाईल ?

     मुळात नाशिक येथील साहित्य संमेलन कुणाचे आहे, हा प्रश्न नाहीच ! स्वतः नामदार छगन भुजबळ नेमके कुणाचे आहेत, हा खरा प्रश्न आहे ! ते महात्मा फुल्यांच्या विचारांचे पाईक आहेत की त्यांच्यावर मारेकरी घालणाऱ्या विकृतीचे भरकटलेले समर्थक आहेत, हा खरा प्रश्न आहे ! 

     छगन भुजबळ हे मंडल समर्थक आहेत, असे सांगितले जाते. ते तसे सुरुवातीला होते, हेही खरे आहे. पण नंतर मात्र लगेच त्यांनी घुमजाव केले होते, हेही वास्तव आहे. त्यांनी मंडल आयोगाच्या समर्थनासाठी शिवसेना सोडली, असा जो प्रचार केला जातो, त्यातही तथ्य नाही. पार्टी सोडण्याची कारणे वेगळीच आहेत. मात्र इतर राजकीय नेत्याप्रमाणे 'फेक पैसे, घे मेळावा..' असे प्रयोग मध्ये मध्ये त्यांचेही सुरू असतात. एखादे निवेदन, कधी सभागृहात डायलॉगबाजी ही तर राजकीय नेत्यांना करावीच लागते. ते फारसे मनावर घेण्याचे कारण नाही ! मात्र या साहित्य संमेलनातील त्यांच्या भूमिकेच्या निमित्ताने या साऱ्या गोष्टींचा नव्याने आणि वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे ! ओबीसी - बहुजन चळवळीच्या भवितव्यासाठी ते अनिवार्य आहे, आवश्यक आहे ! हा कुणाच्या वैयक्तिक भावनेचा प्रश्न असू शकत नाही !

     या पार्श्भूमीवर ना. छगन भुजबळ यांची या संमेलनाबाबतची भूमिका नक्कीच निषेधार्ह आहे ! 'भुजबळ नक्की कोणाचे' हे या निमित्ताने समस्त महाराष्ट्राने समजून घेतले पाहिजे. ओबीसी - बहुजन चळवळींनी समजून घेतले पाहिजे. ओबीसी मेळाव्यासाठी जेवढा खर्च केला नसेल, त्याच्यापेक्षा कितीतरीपट अधिक खर्च ते या संमेलनासाठी करणार आहेत, हे ही लक्षात घेतले पाहिजे. तुमच्यासमोर ते ताठ मानेने टेचात वावरले असतील, पण इथे मात्र ते कमरेत वाकून वागणार आहेत, हेही लक्षात असू द्या ! 

     ...तेव्हा ना. भुजबळांनी महात्मा फुल्यांच्या विचारांचा मान राखून या संमेलनातून माघार घ्यावी, अशी मी नम्र अपेक्षा करतो. 

     अन्यथा, त्यांच्या दुटप्पी कृतीचा जाहीर निषेध करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. लोकजागरचा अध्यक्ष म्हणून, साहित्य पंढरीचा वारकरी म्हणून आणि ओबीसी - बहुजन - समतावादी चळवळीचा पाईक म्हणून मला हे अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते ! 

     तूर्तास एवढेच..

ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष लोकजागर  9822278988

Satyashodhak, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209