- प्रेमकुमार बोके
९४ वे तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमधे ३-४-५ डिसेंबर २०२१ ला होवू घातले आहे.डाॕ.जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत.हे संमेलन जरी मराठी माणसांच्या नावाने होत असले तरी संमेलनाची रुपरेषा पाहता संपूर्ण साहित्य संमेलनावर एकाच विशिष्ट जातीच्या लोकांनी कब्जा केलेला दिसून येतो.काही बहुजनही आहेत; पण ते फक्त नावापुरते ,चटणीसारखे तोंडी लावायला ! छगन भुजबळ यांच्यासारख्या बहुजन समाजातील ताकदवान माणसाला स्वागताध्यक्ष करून त्यांच्या हातून प्रचंड पैसा गोळा करुन घ्यायचा आणि आपली हौस भागवून घ्यायची असा हा खटाटोप आहे. छगन भुजबळ हे महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने चालणाऱ्या समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. परंतु मराठी साहित्य संमेलनाविषयी महात्मा फुले यांचे काय मत होते हे कदाचित त्यांना माहित नसावे ! आणि माहित असले तरी फुलेंच्या मताकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नसावी. परंतु १८८५ मधे महात्मा फुले साहित्य संमेलनाविषयी न्या.महादेव गोविंद रानडे यांना लिहिलेल्या पत्रात जे बोलले, ते आजही तंतोतंत लागू पडते हे भुजबळ साहेबांना सांगावेसे वाटते.
नाशिकच्या संमेलनातील काव्य,गीत मैफीलीच्या माझे जीवीची आवडी या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर नजर जरी टाकली तरी हे संमेलन कोणाचे आणि कोणासाठी आहे हे सुज्ञ माणसाच्या सहज लक्षात येते.म्हणूनच १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी हे संमेलन मूठभर पांढरपेशा वर्गाचे असून तिथे बहुजनांच्या व्यथा, वेदना, प्रश्न यांना कोणतेही स्थान नाही हे कठोरपणे सांगून या संमेलनाला जाहीर विरोध केला व तिथे येण्यास रानडेंना स्पष्टपणे नकार दिला होता. १३५ वर्षानंतर परिस्थिती आजही बदललेली नाही. अजूनही तीच वर्णश्रेष्ठत्वाची व जाती अहंकाराची मानसिकता कायम आहे. म्हणूनच आतापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या यादीवर नजर जरी फिरविली तरी ९० टक्के अध्यक्ष हे एकाच जातीचे दिसतील. यावर्षीचे अध्यक्षही त्याच कुळातील आहेत. या लिखानाला एखादा महाविद्वान जातीयवादी लिखान म्हणून सहज धुडकावून लावेल. परंतु त्यामुळे वस्तुस्थिती मात्र बदलत नाही हे सत्य साहित्यीकांनी लक्षात घेतले पाहिजे. पैसा सरकारचा म्हणजेच जनतेचा वापरायचा आणि थोरवी मात्र आपल्याच जातीच्या लोकांची गायची हा सर्वात मोठा जातीयवाद आहे. समतेच्या तत्वाला सुरूंग लावण्याची ही कृती निषेधार्य आहे. परंतु दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय असलेल्या बहुजनांच्या नेत्यांना हे लक्षात येत नाही ही फार दुःखाची बाब आहे. छगन भुजबळ नेहमीच महात्मा फुलेंचे नाव घेतात, त्यांचे पुतळेही उभारतात; परंतु ब्राम्हणी व्यवस्थेला पुरक असलेल्या लोकांना जर त्यांचे पाठबळ मिळत असेल व त्यांचे कारस्थान भुजबळांच्या लक्षात येत नसेल तर पुतळे उभारून काहीच साध्य होणार नाही. छगन भुजबळांना नेहमी सहकार्य करणारे अत्यंत विद्वान, व्यासंगी, वाणी आणि लेखणीवर प्रचंड प्रभुत्व असलेले डाॕ. हरी नरके हे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष का होवू शकत नाही असा प्रश्न भुजबळांना पडू नये याचे आश्चर्य वाटते.
बहुजन समाजात अत्यंत विद्वान आणि सर्वोच्च शिखरावर पोहचलेले अनेक प्रतिभावंत साहित्यीक होते आणि आजही आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा देणारी ७७ पुस्तके लिहिली; परंतु ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होवू शकले नाही. मृत्यूंजय सारखी अजरामर कलाकृती निर्माण करणारे शिवाजी सावंत, बलुतं सारखी उत्कृष्ट कादंबरी लिहिणारे दया पवार हे ही अध्यक्षपदाच्या लायक समजले गेले नाही. सध्या हयात असलेले व ५० पेक्षा जास्त वैचारीक आणि वास्तववादी पुस्तकांची निर्मिती करणारे थोर साहित्यीक डाॕ. आ. ह. साळुंखे, इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख, कवीवर्य डाॕ. विठ्ठल वाघ, डाॕ.यशवंत मनोहर, डाॕ. अशोक राणा, डाॕ. प्रतिमा इंगोले यांच्यासारखी अनेक प्रचंड प्रतिभाशाली माणसे बहुजन समाजात असतांना ते मात्र अध्यक्ष होवू शकत नाही याला काय म्हणावे ? कोणी काहीही म्हणो, हा पूर्णपणे जातीयवाद आहे आणि तो ठरवून नियोजनपूर्वक केला जातो हे बारकाईने अभ्यास करणाऱ्यांच्या सहज लक्षात येते. मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांच्याच नावे का ? असे प्रश्न विचारायचे नसतात. कारण असे प्रश्न विचारणारा जातीयवादी ठरत असतो. त्यामुळे बहुजन समाजातील साहित्यीकांनी आता तरी हे षडयंत्र ओळखले पाहिजे आणि महात्मा फुलेंनी १८८५ मधे साहित्य संमेलनाविषयी दिलेला महत्वपूर्ण इशारा व मराठी साहित्य संमेलनावर टाकलेला बहिष्कार या गोष्टी ध्यानात घेवून येणाऱ्या काळात अभ्यासपूर्वक आपली कृती निर्धारीत केली पाहिजे.
प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, ३० नोव्हेंबर २०२१