मायणी दि. २८ नोव्हेंबर : भारताचे संविधान हे सर्व नागरिकांच्या उन्नतीशी बांधील आहे. संविधानाने पूर्व परंपरेतील विषमता नाकारून सर्वांना मूलभूत मानवी अधिकार प्रदान केले. संविधानाने उद्घोषिलेली मानवी मूल्ये भारतीय परंपरेतूनच आलेली आहेत. या संविधानातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी झाली तर देशाचा मानवी विकासाचा निर्देशांक निश्चितच सुधारेल, असे प्रतिपादन बामसेफचे राज्य महासचिव एम. डी. चंदनशिवे यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य महाविद्यालय आणि भारतीय संविधान सुरक्षा संवर्धन सन्मान राष्ट्रीय अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी होते.
प्रारंभी डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. संविधानाच्या सरनाम्याचे वाचन कवयित्री उषा खोपडे-देशमुख यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय अंकुश चव्हाण यांनी करून दिला. यावेळी डॉ. जितेंद्र कदम, डॉ. सोपान सुरवसे, प्रा. संभाजी कदम, प्रा. धनराज आवळे, प्रा. डॉ. महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मोकाशी म्हणाले, संविधानाने हक आणि अधिकार यांसोबतच जबाबदारीही दिलेली आहे. सामाजिक आर्थिक विषमता लवकर संपणे संविधानाला अभिप्रेत आहे. वंचित समूहांना मुख्य प्रवाहात आणणे ही आपली जबाबदारी आहे. आभार प्रदर्शन डॉ. उत्तम टेंबरे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. विलास बोदगिरे यांनी केले.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan