महामानव फाउंडेशनच्या वतीने पहिल्या भव्यदिव्य संविधान जागर सप्ताहाच्या निमित्ताने २६/११/२०२१ रोजी आयोजित सांगता समारोप कार्यक्रम शिर्डी जवळील निमगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सचिनची बनसोडे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते बाबा खरात यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संविधान निरक्षरता ही भ्रष्टाचाराला जन्म देते. संविधान साक्षरता ही "समता-न्याय-बंधुता" निर्माण करण्यासाठी प्रेरणा देते. त्यामुळे संविधान समजण्यासाठी संविधान जागर करणे महत्वाचे पाऊल ठरेल.
महामानव फौंडेशनचे अध्यक्ष शिमोन जगताप यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, संविधान समजण्यासाठी संविधान जागर कार्यक्रम घेण्यात आला आहे. इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय संविधान नव्हे, इंडियन पिनल कोड हा संविधानाचा एक भाग होय. संविधान समजून घेणे म्हणजे हक्क - अधिकार व कर्तव्य यांची जाण असणारा नागरीक होय. "संविधान जागर" कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधान सहज-सोपे करुन सांगण्यासाठी फौंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. याला भरभरुन प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात विश्वकर्मा प्रतिष्ठानाचे संस्थापक विष्णुजी गरुड म्हणाले की, "आरक्षणासाठीच संविधान कळाले की काय असा प्रश्न आजची सामाजिक परिस्थिती पाहता वाटते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही फक्त आरक्षणाच्या मर्यादे पुरतेच समजून घेतल्याचे चित्र आपल्या अवतीभोवती दिसते.
वास्तविक पाहता भारताचे संविधान म्हणजे सर्व मानवसमूहालाच नव्हे तर निसर्गातील सजीव सृष्टिला न्याय देण्याचं वचन अधोरेखित करत आहे. भारताच्या संविधानाचा मूळ गाभा हा संपुर्ण मानवतेच्या कल्याणाचा आहे. संतांचा,क्रांतीकारकांचा विचारही मानव कल्याणाचाच होता. मात्र या देशातील वर्णव्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या संस्थानिक व पुरोहित वर्गाच्या हातात स्वातंत्र्यपुर्व काळात कारभार होता म्हणून वर्णव्यवस्थेचे बळी ठरलेल्या समूहाचा विचार करुन संविधानात्मक न्याय अधोरेखित केला गेला.. भारताच्या संविधानात न्यायिक भूमिका मांडताना गरीब श्रीमंत,स्री पुरुष असा भेदभाव केला नाही. संविधानाने लोकप्रतिनिधी ही संकल्पना जन्माला घातली ती केवळ जनता व प्रशासन यांच्यात सनदशीर मार्गाने दुवा साधण्यासाठी. गाव,शहर,जिल्हा,राज्य,आणि देशाचा सामुहिक विकास व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी. हे होत असताना जर कोणी अनैतिक पध्दतीने काम करत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी संविधानात तरतुद आहे. मात्र स्वातंत्र्या नंतर या देशातील सत्तेची सूत्र लोकशाहीच्या गोंडस नावाखाली राजकीय पक्षांच्या ठेकेदारांकडे गेली. यांनी जनतेवर असे बिंबवले की, निवडणुका पैश्यावाल्यांनी लढवाव्यात. निवडणुकीत दंडेलशाही करुन गोर गरीबांना विविध प्रकारचे आमिषं दाखवुन निवडणुका जिंकल्या जातात.
आरक्षणा पुरते संविधान समजून घेणे,किंवा संविधानाने विशिष्ट वर्गाला आरक्षण दिले, असे समजणे म्हणजे प्रत्येक नागरीकाने स्वताची फसवणुक करण्यासारखे आहे.
आंतरजातीय विवाह करणे,गरीब श्रीमंती दरी दुर करणे असे कार्यही संविधानाला अभिप्रेत आहे.
कार्यक्रमासाठी मा. मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे साहेब,माजी सैनिक भानुदास गाडेकर, पंचायत समिती अध्यक्ष हिराबाई कातोरे,सरपंच शिल्पा कातोरे,कल्पना जगताप प्रमुख उपस्थितीत होते. संविधान जागर सप्ताह यशस्वी करण्यासाठी कानिफ तांबे, रमेश मकासरे, विनोद राऊत, सतीश बनसोडे, बाजीराव बनसोडे, अनिल सोमवंशी, अरुण मोकळ, रवींद्र गायकवाड, अनिल गायकवाड, नानासाहेब काटकर, बाजीराव बनसोडे,सतिश बनसोडे बोरळे, अजित पवार,सचिनजी बनसोडे आदी उपस्थित होते. महामानव-संस्था कार्यकर्त्यानी विशेष परिश्रम घेतले..शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिमोन जगताप म्हणजे आभार मानले.