मोदी : काँग्रेससाठी वरदान, संघ-भाजपासाठी शाप !

     लेखाचे शीर्षक बघून काहीतरी विचित्र लिहिलं आहे, असं वाटेल. पण अशा अर्थाची मांडणी मी २०१४ च्या पूर्वीपासून करतो आहे. मध्ये मध्ये काही लेखातून तशा अर्थाचे लिहीत आलो, बोलत तर नेहमीच असतो !

Narendra Modi is Protector of Congress     २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई मुक्कामी एक काँग्रेसचे तत्कालीन खासदार आणि माजी मंत्री, एका प्रतिष्ठित साप्ताहिकाचे संपादक आणि एक विधान परिषदेचे आमदार यांच्याशी स्वतंत्र भेटी झाल्यात. हे अर्थातच भाजपविरोधी विचारधारेचे म्हणजेच डोके ठिकाणावर असलेले लोक होते. नुकतीच मोदींची प्रचारप्रमुख म्हणून निवड झाली होती. पुढे निवडणुका होत्या. आणि काँग्रेसचे भवितव्य काय, हा साधारण चर्चेचा विषय होता.

     काँग्रेस खासदारांशी बोलताना मी दोन मुद्दे मांडले होते. एक – काहीही झाले तरी २०१४ ला काँग्रेसचे सरकार असणार नाही. मग ते तिसऱ्या आघाडीचे असेल किंवा भाजपा आणि मित्रपक्षांचे असेल. आणि दोन – मात्र मोदी यांची भीती काँग्रेसने बाळगू नये. मोदींमुळे सर्वात मोठे नुकसान संघाचे होणार आहे. यातील दुसरा मुद्दा सर्वांसाठीच धक्कादायक होता. त्यावर सुरुवातीला कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. कारण मोदी हे संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत, यावर ते ठाम होते. ते सत्य देखील आहे. त्यामुळे मनोमन त्यांनी मलाच वेड्यात काढले असावे. पण जसजसा मी माझी मांडणी करत गेलो, तसतशी त्यांची खात्री पटायला लागली. शेवटी तिघेही थक्क झालेत. त्यांनी मान्य केलं, की हा विचार आमच्या डोक्यातही कधी आला नाही. आजच्या लेखाचे हेडिंग हे त्याच मांडणीचा सारांश आहे.

     हा लेख लिहित असताना मोदी यांनी अत्यंत विचित्र अवस्थेत तीन काळे कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. त्याबद्दल त्यांनी माफी वगैरे मागत असल्याची भाषा जरी केली असली, तरी मुजोरी मात्र तशीच कायम होती. कायदे चुकीचे होते आणि म्हणून मागे घेत आहोत, अशी भावना जराही दिसली नाही. सुमारे सातशे शेतकऱ्यांचा आपल्याच हेकेखोरपणामुळे बळी गेला, याबद्दल जराही खंत त्यांना वाटली नाही. मोठी मजबुरी आहे आणि त्यातून निसटण्यासाठी सुरू असलेला कावेबाजपणा त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होता. लोकांनाच ते कायदे आणि त्यांचे फायदे बरोबर समजले नाहीत, असा उर्मटपणा बोलण्यात होता. असो.

     मुळ मुद्दा असा, की मोदी हे काँग्रेससाठी वरदान आहेत आणि संघ, भाजपा साठी शाप आहेत. खरुज आहेत. त्यासाठी आपण खालील मुद्दे लक्षात घेऊ या..

• मोदी यांच्या उदयामुळे भाजपला कधी नव्हे एवढी दांडगाई, दादागिरी करण्याची परंपरा स्वीकारावी लागली.
• त्या आधी भाजपाचा चेहरा म्हणून बाजपेयी यांच्याकडे बघितले जात होते. अडवाणी यांच्या रथयात्रेच्या निमित्ताने वादग्रस्त बाबरी मशीद पाडणे आणि त्यानंतरचे देशभर उसळलेले दंगे ही अडवाणी यांची देण होती. त्यामुळे भाजपची संसदेतील सदस्य संख्या वाढली असली तरी, अडवाणी यांची दंगेखोर अशी प्रतिमा निर्माण झाली होती. देशात त्यांचे विरोधक वाढले होते. त्याचवेळी पक्षांतर्गत आणि इतर हिंदुत्ववादी समुहामध्ये लोकप्रियता देखील वाढली होती. तरीही पंतप्रधान पदासाठी मात्र अडवाणी ऐवजी बाजपेयी निवडण्यात आलेत. भाजपला आपली प्रतिमा चांगली करण्याची संधी मिळाली.
• मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगे झाले. नरसंहार झाला. मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हणण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली होती. त्यांच्याबद्दल जागतिक पातळीवर तीच प्रतिमा अधोरेखित झाली होती. त्यांना अमेरिकेने व्हिसा देखील नाकारला होता.
• त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या माया कोडणानी यांना दंगा प्रकरणात दोषी ठरविण्यात आले होते.
• त्यांचेच गृहमंत्री असलेले अमित शहा यांना न्यायालयाने राज्याबाहेर तडीपार केले होते.
• अशा प्रकारचा ‘दैदिप्यमान’ इतिहास फक्त मोदी यांच्याच नावावर होता. त्यांच्यासमोर अडवाणी यांची रथयात्रा आणि नंतरचे दंगे अगदीच किरकोळ वाटतात.
• नितीन गडकरी पक्षाचे तिसऱ्यांदा अध्यक्ष होऊ नयेत म्हणून मोदींनीच त्यांचा काटा काढला, असे बोलले जाते.
• संजय जोशी या संघाचा ‘खासम खास’ असलेल्या संघ आणि भाजपच्या नेत्याचा ‘सीडी गेम’ सुद्धा मोदी-शहा यांनीच केला, असेही बोलले जाते.
• संजय जोशी यांना दुसऱ्यांदा कार्यकारिणीतून काढण्यासाठी मोदी यांनी संघाला ब्लॅकमेल केले. स्वतःला प्रचार प्रमुख म्हणून घोषित करावे, असाही संघ आणि पक्षावर दबाव आणला, हेही सर्वश्रुत आहे.

आता आपण पुढील घटनाक्रम बघू या..
• मोदींच्या हातात पक्षाची सारी सूत्र आलीत. आणि तेव्हापासूनच पक्षात गुंडागर्दीला राजरोस प्रतिष्ठा मिळाली.
• एकाच राज्यातून पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष ही दोन सर्वोच्च पदे मोदी यांच्या मनमानी कारभाराचे प्रतिक आहे (कारण हे संघाच्या परंपरेत किंवा शिस्तीच्या विरुद्ध आहे).
• एक तडीपार व्यक्ती चक्क भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हा संघाच्या वस्त्रहरणाचा जाहीर कार्यक्रम मोदी यांच्यामुळे निर्विघ्न पार पडला. मोदींच्या दहशतीपुढे संघ काहीही बोलू शकला नाही.
• मोदी यांच्यानंतर गुजरातचा नवा मुख्यमंत्री करताना मोदींनी संघाला विचारले सुद्धा नाही.
• पंतप्रधान आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद मोदी आणि शहा यांनी आपसात वाटून घेतले. संघाला पार विकलांग करून सोडले.
• अर्थातच मोदी-शहा यांच्या एकूणच पवित्र राजकीय चारित्र्याचा प्रभाव पक्षावर पडला. मॉबलींचींग उजळ माथ्याने सुरू झाले.
• संघ कारस्थानी आहे. तो पडद्यामागे राहून भानगडी करतो. पण मोदी-शहा यांची ख्याती बघून भाजपमधील ‘पराक्रमी’ लोक खुलेआम कायदा हातात घेण्याची हिम्मत करू लागले. मोदी-शहा प्रोत्साहन देत आहेत, अशी हवा निर्माण झाली.
• न्यायाचे/न्यायधिशांचे खून, त्यांच्यावर दबाव, विरोधकांना धमक्या, ब्लॅकमेलिंग हे सारे प्रकार या काळात प्रतिष्ठित झालेत. मोदीराज्यात त्यांना राजमान्यता मिळाली. अशा लोकांचे कौतुक होऊ लागले.
• संघाचे लोक आधी आपली ओळख जाहीरपणे देत नसत. आता ‘आम्ही संघाचे’ म्हणून ते अभिमानाने सांगायला लागले.
• नोटबंदीचा प्रचंड मोठा निर्णय मोदी यांनी थेट शेखचिल्ली सारखा अचानक जाहीर करून टाकला.
• राफेलमध्ये मध्ये राजरोस दलाली खाल्ली गेली.

अशी आणखीही बरीच उदाहरणे आहेत. मात्र मोदीमुळे भाजप-संघाला कधी नव्हे ते पंचतारांकित दिवस बघायला मिळालेत..

तरीही मोदी संघासाठी शाप कसे ? काँग्रेससाठी वरदान कसे ?

     पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचे किडे अंगणापर्यंत सहज येत असतात. शहाणे झाडू बेसावध असतील तर.. हेच किडे थेट देव्हाऱ्यापर्यंत देखील पोहचू शकतात. २०१४ नंतर देशात अशा जीवांची संसदेतील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ही सारी पुण्याई मोदी यांच्या खात्यात जमा आहे. काँग्रेससारखा पक्ष गलितगात्र झाला. त्यामुळे पुढची पन्नास वर्षे आपल्याला सत्तेतून कुणीही हटवू शकत नाही, असा उन्माद भाजपा आणि संघाच्या चालण्याबोलण्यातून ओसंडू लागला होता. विकावू मीडियाच्या सौजन्याने भाजपातील घुबडांचे रातोरात राजहंस झालेत. शेणकिड्यांचे डायनासोर झालेत. गल्लीबोळातल्या बेडकिणीही म्हशीपेक्षा जास्त फुगल्या. समोरची व्यक्ती कोण आहे, समाजातील तिचे स्थान काय, वय काय, आपली औकात काय, याचा जराही विचार न करता समोरच्याचा पाणउतारा करू लागल्या. (अजूनही प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवर त्याची दोन ठळक उदाहरणं आपण रोजच बघत असतो.) 

     अर्थात, संघ - भाजपमध्ये सारेच 'त्या' लायकीचे आहेत, असं मी म्हणत नाही किंवा तसं मानतही नाही. इतर पक्षात सारेच सज्जन आणि भाजपमध्ये सारेच वाईट असा त्याचा अर्थ नाही. अपवाद सर्वच बाबतीत असतो. वरवरचा का असेना, पण संघाला एक सामाजिक चेहरा आहे. (.. म्हणजे, २०१४ पूर्वी होता) संघाच्या विविध संस्था आहेत. ते एक एकप्रकारचे दीर्घकालीन आणि अदृश्य सापळे आहेत. संघाची आतली कारस्थानं लोकांना माहीत असण्याची तशी फारशी शक्यता नव्हती. 

     डाकूंचे खरे चेहरे लोकांना माहीत नसतातच. नेमके सावज हेरणारे वेगळे, प्रत्यक्ष डाका घालणारे वेगळे आणि लुटीचा माल विकण्यासाठी लागणारे लोक वेगळे असतात. कुणी सावकार, व्यापारी, कधी गावचा पाटील, तर कधी सरपंच देखील त्यात असतो. पाटलाच्या घरी नोकर चाकर असतात. मेहनत करतात. पगार घेतात. पाटील सणासुदीला नोकरांना, त्यांच्या मुलांना नवे कपडे देतो. मिठाई देतो. कधी मुलांची फी भरायला मदत करतो. अशावेळी नोकराच्या किंवा त्याच्या कुटुंबाच्या नजरेत मालक तर देवदूतच असणार नाही का ? नोकराला काय माहित, की आपला मालक डाकूंच्या टोळीचा हस्तक आहे ? 

     २०१४ नंतर साऱ्या निंदनीय किंवा अवैध गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त झाली. म्हणजे त्याचा अतिरेक झाला. त्या आधी त्या अस्तित्वात नव्हत्या असा मात्र त्याचा अर्थ नाही. नीतिमत्तेच्या, देशभक्तीच्या व्याख्या बदलून गेल्या. 'छिनालपणा' हा प्रतिष्ठेचा नवा मापदंड झाला.. लाल दिव्यातून मिरवू लागला ! नव्या शोले मध्ये खुद्द 'जय - विरू' आता व्हिलन ठरले. बसंती गब्बरसिंगची फॅन झाली. त्याच्या 'मनकी बात' मध्ये तल्लीन झाली. साम्भा, कालिया नवे साईड हिरो झालेत. कंगना किंवा अर्णव सारख्या बाजारू लोकांनी एखाद्या मुख्यमंत्र्याला जाहीरपणे 'तू-मी' करावं, खुल्या धमक्या द्याव्यात, हे अती होत होतं. मात्र अशा सडक छाप लोकांना झेड सिक्युरिटी देताना मोदी - शहा यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

     सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोलणारा कुणीही, म्हणजे अगदी तो विद्यार्थी, शिक्षक, महिला असो की पुरुष असो, विचारवंत असो की समाजसेवक असो सारे देशद्रोही ठरू लागले. कुणाला पाकिस्तानी, कुणाला आतंकवादी, कुणाला नक्षली ठरवण्यात खुद्द मोदी यांना अलौकिक सुखाचा आनंद मिळत होता. त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र प्रकारचा भाव दिसत होता. हे लक्षण काही ठीक नाही.

     कहर म्हणजे, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना सरकारी पातळीवरून आधी खलिस्तानी म्हटलं गेलं. कुणी आतंकवादी म्हटलं. कुणी मवाली म्हटलं. कुणी बब्बर खालसा म्हटलं, तर कुणी आंदोलनजिवी म्हटलं. कधी त्यांचे पाणी तोडलं. वीज तोडली. त्यांच्या वाटेवर काटेरी कुंपण उभं केलं. हायवेवर मजबूत भिंती उभ्या केल्या. मंत्री पुत्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले, तरीही मोदी चूप राहिलेत. अमित शहा मिश्रा नावाच्या गुंड मंत्र्याला पाठीशी घालत राहिले. आंदोलनात सुमारे सातशे शेतकऱ्यांचा बळी गेला. ते सारे आतंकवादी होते, देशद्रोही होते, असाच प्रचार मोदी - शहा आणि त्यांची टीम उर्मटपणे करत राहिली. काय वाटेल ते बोलत राहिली. देशाला मूर्ख बनवत राहिली. मूर्ख समजत राहिली. 

     या साऱ्याचा परिणाम म्हणून लोकामध्ये प्रचंड नाराजी पसरली. मागे राहून कुटील कारवाया करणारे आणि ऐनवेळी फाटेस्तोवर पळणारे पराक्रमी स्वयंसेवक बाबरी मशीद प्रकरणात सर्वांनी पाहिले होते. पण मोदीमुळे त्यांना नवी शक्ती मिळाली. चंदनतस्करांच्या पुढच्या पिढीला मोदी यांच्यामध्ये स्वतःचा बाप दिसू लागला यातच सारं आलं. त्याचा परिणाम युपी आणि इतर राज्यातील निवडणुकीत स्पष्टपणे दिसणार आहेत. पश्चिम बंगाल किंवा नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी यांचं डिपाॅझिट जप्त होऊ शकेल, अशी कुणी स्वप्नातही कल्पना केली होती का ? पण तो चमत्कार घडला, जनतेने घडवला. यांच्या मंत्र्यांना फिरणं कठीण झालं. भाजपच्या आमदार, खासदारांना चक्क नागडे करण्यापर्यंत लोकांचा राग अनावर झाला आहे. आणि ह्या साऱ्या विकृतीच्या पाठीमागे आरएसएस आहे, याची स्पष्ट जाणीव आता देशाला झाली आहे. कधी नव्हे ते संघाचेही भयानक रूप लोकांनी या सात वर्षात पुन्हा पुन्हा पाहिले आहे. काहीही झाले तरी पुन्हा भाजपा नको, ही आता लोकांची भावना झाली आहे. आणि याला जबाबदार फक्त मोदी आहेत !

     समजा, मोदी यांच्याऐवजी सुषमा स्वराज, राजनाथसिंह, नितीन गडकरी किंवा इतर कुणीही प्रधानमंत्री झाले असते, तर त्यांनी एवढा उधम केला असता का ? एवढी दादागिरी केली असती का ? त्यांनी भ्रष्टाचार केला नसता असं नव्हे, पण नोटबंदी सारखा मूर्खपणाचा निर्णय घेतला असता का ? नोटबंदीमधल्या पैशाने भाजपा कार्यालयाच्या रूपात भ्रष्टाचाराची स्मारकं देशभर उभी केली असती का ? शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याची संघामुळे त्यांची इच्छा झालीही असती, तरी त्यांनी राजरोस ते पाप केलं असतं का ? थेट आतंकवादी लोकांना लोकसभेचं तिकीट देण्याएवढी मुजोरी त्यांनी दाखवली असती का ? गंगेच्या पाण्यावर प्रेतं तरंगतील एवढी भीषण परिस्थिती निर्माण होऊ दिली असती का ? तडीपार लोक त्यांच्या मंत्रिमंडळात थेट गृहमंत्री होऊ शकले असते का ? काही झालं तरी त्यांनी उघड उघड अशी आपली औकात दाखवली नसती, एवढं मात्र नक्की ! हिंदू - मुस्लिम करत राहिले असते. गुपचूप घर भरत राहिले असते. विरोधकांनाही इडी ऐवजी 'बिडी-काडी' देवून मिळून मिसळून खात राहिले असते. शरद पवारांच्या मागे गडकरींनी खरंच इडी लावली असती का ? ममतांना कुणी 'दीदी ओ दीदी' म्हणून टपोरीपणा केला असता का ? फार काय, दुसरे कुणीही पंतप्रधान असते तर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत एवढ्या द्वेषभावनेने वागले का ? 

     महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार येण्याला मोदी - शहा यांची मुजोरी कारणीभूत आहे. त्यांच्यामुळेच फडणवीस यांचा डबल फुगा एवढा फुगला यात संशय नाही. असे अतिरेकी उपद्व्याप या लोकांनी केले नसते तर, त्यांचे कपटही एवढ्या लौकर लोकांच्या लक्षात आले नसते. पार्टी अशी सपशेल नागडी झाली नसती. आणि पर्यायाने लोकही एवढ्या लौकर त्यांच्या विरोधत रस्त्यावर आले नसते. हळू हळू आणि जाती धर्माची अफू देवून लुटण्याचा त्यांचा कार्यक्रम आणखी किमान १५/२० वर्ष तरी सुरळीत सुरू राहिला असता. काँग्रेसमध्ये तसेही त्राण उरले नव्हते. त्यामुळे काँग्रेस पार्टी हळूहळू कुजत गेली असती. प्रादेशिक पक्षांना हाताशी धरून भाजपनेही काँग्रेसला संपवले असते. नंतर प्रादेशिक पक्षांनाही संपवले असते. भाजपाशिवाय दुसरा राष्ट्रीय पक्ष या देशात पुढची अनेक वर्षे औषधालाही शिल्लक राहिला नसता. 

     पण भस्मासुराला अवदसा आठवली. त्यानं चक्क भोळ्या शंकराच्या डोक्यावरच हात ठेवला. शेतकऱ्यांची ताकद मोदी-शहा त्यांच्या लक्षातच आली नाही. ते त्यांच्याच जीवावर उठलेत. आणि कोमात गेलेला देश शेतकरी आंदोलनामुळे पुन्हा खडबडून जागा झाला. मोदींना शेपटी टाकावी लागली. मोदींच्या मुजोरीमुळे भाजपा-संघ यांचा विनाश नजीकच्या काळात अटळ आहेत. आणि काँग्रेसला त्याचा अनपेक्षित फायदा मिळणार आहे. तशी सुरुवात झाली आहे. 

     पाऊस अमृताचा असो, अत्तराचा असो की विषाचा, ज्याचं शेत मोठं त्याच्याच वाट्याला जास्त सरी येतील, हा निसर्गाचा नियम आहे. काँग्रेसचं शेत देशव्यापी आहे. आज भलेही ते उजाड, वैराण पडलेलं दिसत असेल, तरी देशव्यापी विस्तार असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, नाकारून चालणार नाही. त्या तुलनेत भाजपा हा पक्ष नाहीच. ती एक उचलेगिरी करणारांची टोळी आहे. स्वतःचा कोणताही माल यांच्याकडे नाही. स्वतःचा नेता सुद्धा नाही. म्हणून कधी सरदार पटेल, कधी गांधी, कधी आंबेडकर, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस तर कधी स्वामी विवेकानंद या महापुरुषांच्या नावाची उचलेगिरी हे लोक सोयीप्रमाणे करत असतात ! लोकांना उल्लू बनवत असतात !  

     गुजरात नरसंहाराच्या वेळी अडवाणींनी मोदींची पाठराखण केली होती, त्याची किंमत अडवाणींनी मोजली. 'राजधर्मका पालन करो' म्हणणाऱ्या बाजपेयींनी मोदींना बरखास्त करण्याची हिम्मत केली नाही. ती भाजपची दुसरी घोडचूक होती. त्यानंतर संघाने मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारण्याची सर्वात मोठी चूक केली, त्याची फळं भविष्यात संघाला व्याजासह भोगावी लागणार आहेत. जनता प्रचंड संतापली आहे. त्याचा फायदा अर्थातच काँग्रेसला मिळणार आहे. कारण त्यांचं शेत देसभर पसरलं आहे. जास्तीत जास्त सरी त्यांच्याच वाट्याला येणार आहेत. अशी अचानक चालून आलेली संधी, हे काँग्रेससाठी वरदान आहे. अजून अडीच वर्षे हातात आहेत. मात्र, आलेल्या संधीचं सोनं करण्याची हुशारी आणि दूरदृष्टी काँग्रेसनं दाखवली पाहिजे. त्यावर सविस्तर नंतर कधीतरी ! 

बघू या..!
पण काँग्रेसनं मात्र मोदींचे मनोमन आभार मानलेच पाहिजेत !

तूर्तास एवढंच !

ज्ञानेश वाकुडकर,  अध्यक्ष, लोकजागर 9822278988

Satyashodhak, obc, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर

Top News

MahaJyoti gives Tab to obc students.jpg
ओबीसी विद्यार्थ्यांना मिळाले 'टॅब'
mahajyoti for Other Backward class Students
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी  मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, टॅब, दररोजचा सहा जीबी इंटरनेट डेटा - महाज्योती - महाराष्ट्र शासन स्वायत्त संस्था
OBC vs bhonga
ओबीसींनी भोंग्यांच्या भानगडीत पडू नये !
obc aarakshan for all lingayat Samaj in maharashtra
राज्यातील लिंगायत समाजाची सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी.
phule shahu ambedkar OBC Mahila Sahitya Sammelan Swagat Adhyaksh Dr Adv Anjali Salve Vitankar
फुले शाहू आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी डॉ. ऑड. अंजली साळवे विटनकर
Rashtriya OBC mahasangam Mahaadhiveshan New Delhi
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ७ वे महाअधिवेशन ७ ऑगस्ट ला नवी दिल्ली येथे
Tailik Mahasabha Konkan Vibhag OBC janajagruti Konkan Daura
तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष डॉ.सतीश वैरागी यांचा ओबीसी जनजागृतीपर कोकण दौरा
prakash shendge meeting with Ramdas Athawale on obc reservation
ओबीसींना उमेदवाऱ्यांची भीक नको ! हक्काचे ओबीसी आरक्षण द्या
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209