काही ओबीसी मित्रांना माझ्या विधानामुळे राग येईल, याची मला कल्पना आहे. मला कुणाच्याही प्रामाणिक प्रयत्नाबद्दल आक्षेप घ्यायचा नाही किंवा अपमान करायचा नाही. तरीही ओबीसींच्या भल्यासाठी काही गोष्टी स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. सरळ, स्पष्ट, प्रामाणिक आणि दूरदर्शी लढाई उभी करण्याची ही वेळ आहे. २०२४ ला होवू घातलेला महासंग्राम ओबीसीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे. काही लोक अज्ञानामुळे प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधले जातात, त्यांना सावध करण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वांनी विचार करावा आणि आपल्या चुका दुरुस्त कराव्यात, ही अपेक्षा आहे.
आंदोलन म्हणजे काय, त्याचे धोरण कसे असावे, हितशत्रूंनी कोंडी केल्यानंतर त्याला काटशह कसा द्यावा, दूरदृष्टी म्हणजे काय आणि राजकीय परिपक्वता कशाला म्हणतात, याचा आदर्श वस्तुपाठ शेतकरी आंदोलनाने देशाच्या समोर ठेवला आहे. पुन्हा एकदा गांधींची अहिंसात्मक चळवळ आणि अहिंसेची नैतिक ताकद साऱ्या जगाला दिसली. निदान आतातरी गांधी म्हणजे टवाळीचा विषय नाही, हे मुकाट्याने मान्य करण्यावाचून पर्याय नाही. सुमारे सातशे लोकांचे बलिदान आणि मंत्रीपुत्राने दिवसाढवळ्या गाडी चढवून चार शेतकऱ्यांची केलेली हत्या, यानंतर देखील शेतकरी शांत राहिले. संयमाने आपली मागणी करत राहिले. ही ताकद कुठून आली ? हे तत्वज्ञान, ही प्रेरणा आंदोलकांना कुठून मिळाली ? शेतकरी पुस्तकी पंडिती करण्यापेक्षा एकाचवेळी आंदोलनाच्या ठिकाणी आणि पब्लिक मीटिंगमध्ये ऊन-वारा अंगावर घेत राहिले. सत्ताधाऱ्यांच्या लाठ्या-गोळ्या झेलत राहिले. अशावेळी महात्मा गांधीची अहिंसा आणि असहकार त्यांच्या सोबतीला होता.
सत्ताधारी पक्ष आणि त्यातही मोदी-शहा यांच्या विकृतीने उन्मदाचे शिखर गाठले होते. संसद खिशात घातली, न्यायव्यवस्था वेठीस धरली, इलेक्ट्रॉनिक मीडिया लोणी लावण्याच्या कामी लावला, मोठी वृत्तपत्रे सकाळी सकाळी आपली पुसण्याच्या कामी लावली, देशाची राज्यघटनाही चोळामोळा करून कोपऱ्यात भिरकावून दिली होती. अशावेळी शेतकऱ्यांचा निर्धार, असहकार, अहिंसा आणि प्रभावी डावपेच यांच्या ताकदीवर हा एकतर्फी सामना शेतकऱ्यांनी खेचून आणला, हे नाकारता येणार नाही. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! पण खरी लढाई अजून संपलेली नाही.
देशाची राज्यघटना अजूनही लुळीपांगळी अशाच अवस्थेत आहे. ओबीसींचे हक्क, जनगणना, आरक्षण हे सारे कचऱ्याच्या टोपलीत गेलेले आहेत. तरीही ओबीसींना अजून जाग आलेली दिसत नाही. अजूनही खरे आंदोलन उभे झालेले नाही. ज्या काही संघटना सत्ताधारी किंवा प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांना बोलावून सामाजिक कुंभमेळा भरवण्याचे काम करत आहेत, ते ओबीसींची दिशाभूल करत आहेत. त्या त्या पक्षाने भरवलेले ते गुलामांचे बाजार आहेत. विविध पक्षांचे ओबीसी सेल म्हणजे अडगळीत पडलेल्या लोकांच्या चहापाण्याची सोय आहे, हे आपल्याला नीट समजून घ्यावे लागेल. ज्याअर्थी पक्षच ओबीसी विरोधी आहेत, त्याअर्थी ह्या लोकांच्या उड्या मारण्याला पक्षात काय किंमत असेल ? समाजाला काय फायदा ? साऱ्या पक्षांचे नेते एकत्र करून आयोजित करण्यात येणारी ओबीसी संमेलने म्हणजे नुसती नौटंकी आहेत ! त्यातून ठोस काहीही हाती लागले नाही. लागणार नाही. नुसत्या गोळ्या बिस्किटासाठी किती दिवस मूर्ख बनत राहणार ?निदान शेतकरी आंदोलन बघून तरी ओबीसी समाजाने शहाणे व्हावे, अशी अपेक्षा आहे.
ओबीसींचे आंदोलन उभे करण्यासाठी पुढील काळजी घ्यावी लागेल.
• प्रस्थापित पक्षाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला आंदोलनाचा नेता मानू नका. त्याच्या हातात आंदोलनाचे नेतृत्व देवू नका. त्यांनी बोलावलेल्या संमेलनात सहभागी होऊ नका. गर्दी वाढवू नका.
• त्याला स्टेजवर येवू देवू नका. गळ्यात हार घालू नका. त्याची बडबड ऐकून घेवू नका.
• कोणताही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल करून स्वतःची पाठ थोपटून घेवू नका. अशी निवेदने आणि फोटो या लोकांकडे रोज कचऱ्यासारखे येत असतात. त्यांना त्याचे काहीही कौतुक नसते.
• निवेदन दिले म्हणजे आपण फार मोठा तिर मारला, अशा भ्रमातून त्वरित बाहेर पडा. (शेतकरी आंदोलनात अनेक महिन्यांपासून संवादच बंद झाला होता. तरीही मोदी यांना लोटांगण घालावे लागले, हे लक्षात घ्या.)
• 'कोणत्याही पक्षातून असो, पण आपल्या समाजाचा माणूस निवडून आला पाहिजे' अशी मूर्खपणाची भूमिका घेवू नका. तशा पोस्ट टाकू नका. असे तुमच्या जाती-समूहाचे लोक विविध पक्षातून आधीच निवडून आलेले आहेत. पक्षाकडे नेवून समाजाला त्यांनीच गहाण ठेवले आहे, याची जाणीव असू द्या.
• कोणताही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री कधीही पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे वास्तव समजून घ्या. तो तुम्हाला केवळ मूर्ख बनवत आहे, येवढे लक्षात ठेवा.
• अशा कोणत्याही नेत्याच्या नादी लागून समाजाशी गद्दारी करू नका. लुटारुंच्या पापात भागीदार होऊ नका.
• 'ओबीसींच्या अनेक संघटना आहेत, त्या एकत्र येत नाहीत, ओबीसींची स्वतंत्र पार्टी झाली पाहिजे, सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र आले पाहिजे' अशी भावना किंवा भूमिका ऐकायला बरी वाटत असली, तरी ती व्यावहारिक नाही. तशी बालिश अपेक्षा करत बसू नका.
• एखाद्या संघटनेचे विचार, कार्यक्रम आणि प्रामाणिक पणा यांचा अभ्यास करा. योग्य त्या संघटनेला तुम्ही स्वतः ताकद द्या. सामील व्हा. सहकार्य करा. उगाच एक या, एक या, असं रडगाणं गात बसू नका.
• पुस्तकी पंडितीमध्ये, महापुरुषांच्या फोटोमध्ये, व्यक्तीपूजेमध्ये अडकून पडू नका. वर्तमानाचे भान ठेवून वागा. महापुरुषांच्या नावाने बढाई मारत बसू नका.
• 'नेता कोण ? पर्याय कुठे आहे ? पैसा कुठे आहे ? लोक सोबत येत नाहीत !' असल्या लंगड्या सबबी सांगत बसू नका. ह्या निस्क्रिय आणि निराशावादी लोकांच्या पळवाटा आहेत.
• लोकजागरचा अकरा कलमी कार्यक्रम समजून घ्या. ('समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत..' या पुस्तकात लोकजागरचा संपूर्ण कार्यक्रम दिलेला आहे. तो वाचा. समजून घ्या. खुली चर्चा करा.)
• ५२ टक्के ओबीसी, ५२ टक्के आरक्षण
• आमची जनगणना आम्हीच करणार !
• ओबीसी मुख्यमंत्री, बहुजन सरकार !
ही लोकजागरची त्रिसूत्री आहे.
• वाचा ! विचार करा ! कृती करा ! तूर्तास एवढंच..
ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष, लोकजागर 9822278988