पुणे - महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'महाज्योती'ची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र, सारथी, बार्टी या स्वायत्त संस्थांची मुख्य कार्यालये पुण्यात आहेत. परंतु 'महाज्योती'चे मुख्य कार्यालय नागपूर येथे आहे. हे ठिकाण सर्वच विद्यार्थ्यांना सोयीचे ठरत नाही. त्यामुळे महाज्योतीची किमान उपकेंद्र पुण्यात सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी, तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी बार्टी ही स्वायत्त संस्थेची मुख्य कार्यालय पुण्यात आहेत. त्यामुळे या संस्थेतील प्रशिक्षणाचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. मात्र 'महाज्योती'चे मुख्य कार्यालय नागपूरला असल्याने त्याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होत नसल्याचे दिसून येत आहे.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या घटकांच्या सर्वसमावेशक शाश्वत विकासासाठी 'महाज्योती' या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली. 'महाज्योती'मार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, संशोधक विद्यार्थ्यांना पाठ्यवृत्ती, प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन, कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या सर्व सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्याचे एक उपकेंद्र पुण्यात सुरू करावे, अशी मागणी स्टुडंड हेल्पिंग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी 'महाज्योती'चे संचालक दिवाकर गमे यांच्याकडे केली आहे.
ओबीसी, एनटी, व्हीजीएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'महाज्योती'मार्फत मोफत ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात येत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जेईई, नीट, एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मदत वाढविण्यात आली आहे. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या ऑनलाइन वर्ग असेल. त्यासाठी महाज्योती'च्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन महाज्योती'चे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan