- अनुज हुलके
ओबीसी आंदोलनात अलिकडे अनेकजण प्रविष्ट झालेले दिसत आहेत, हे खरे आहे. ओबीसी नसलेले उच्च जातवालेही यात दिसतात. मात्र ओबीसीचे खरे हितैषी कोण ? आणि विरोधक कोण ? याची चाचपणी ओबीसीला यथार्थपणे करावी लागेल. ओबीसी विरोधकांची ओळख पटवून घेत असताना किंवा ओळख पटवून देत असताना साधारणतः ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध करणारे किंवा मंडल आंदोलना विरोधात उभे ठाकलेले तथाकथित उच्चजातहित संबंधी नजरेसमोर येतात. ते दुसऱ्या कोणत्या धर्माचे नाहीत. ओबीसीच्या आरक्षणाचा मुस्लिम बांधवांनी कधी विरोध केला नाही. ख्रिश्चन, शिख या बांधवांनी कधी मंडलविरोधी आंदोलनात जाळपोळ केली नाही. बौद्ध आदिवासी तर, ओबीसी आरक्षणाचे नेहमीच पाठीराखे राहिलेले आहेत. मुस्लिम - ख्रिश्चन - शिखबौद्ध यांपैकी कुणीही ओबीसी आरक्षण विरोधात वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन करत नाही, मोर्चे काढलेले नाही, हिंसाचार करून ओबीसीची कत्तल केली नाही. तर, मग ओबीसीशिवाय उर्वरित उच्चजातवर्गातील हिंदूच ओबीसीच्या आरक्षणाला विरोध का करतात ? आपल्याच धर्मातील ओबीसी बांधवांचे आरक्षण उच्चजातवाल्यांना का खूपत असते.
वस्तुतः हिंदुहिंदु करून ओबीसींच्या बळावर हा उच्चजातीय कंपू मजा मारत आलेला आहे. मंदिर उभारणी करताना हेच ओबीसी राबतात. यांचेच रक्त आटते, त्यासाठी लागणारा निधी गोळा करणे, दगडविटा, माती, आदि बांधकाम साहित्य जुळवणी करणे, रचणे आणि श्रमातून मंदिर यांच्या उभे राहते. भक्तिभावाने त्याठिकाणी जाऊन दान देतात. त्या दानावर मंदिराचे संचालन - व्यवस्थापन चालते आणि आयत्या बिळात नागोबा या उक्तीप्रमाणे पुजारी तिथे आपले बस्तान मांडून बसतो.
मंदिर बांधण्यासाठी राबणारे भिन्न आणि दान-संपत्तीचा उपयोग घेणारे वेगळे ! ओबीसींना राशीभविष्य सांगणारे तेच, कुंडली-लमपत्रिका, तिथी - मुहूर्त सांगून धर्मविधी - संस्कार - व्रतविधी करून घेणारे हेच, परोहिताशिवाय खरच धार्मिक कार्य होऊच शकत नाही का ? मंदिरात बायाबापडे जेवढ्या श्रद्धेने पूजासामग्री घेऊन जातात, तेव्हा त्यांच्या हाताने ती मूर्तीला अर्पण करण्याऐवजी त्याठिकाणी असलेला पुजारी ती सामग्री त्या दैवतापुढे ठेवतो, म्हणजे अशा भाविकांना यथायोग्य पूजा करण्याचे साधे विधी समजत नाही ? की पुरोहिताशिवाय पूजा पावत नाही, याचा विचार ओबीसी करायला लागला तर, पूजाविधी करणारा श्रद्धाळूपेक्षा दीडशहाणा कसा असेल बरे ! आपल्याच धर्मातील दैवतांची आराधना आपण स्वहस्ते करू शकत नाही. म्हणजे दैवत पुरोहिताच्या ताब्यात आणि आपण ? पुरोहिताच्या जाळ्यात, ही आपलीच दैवते आहेत की परधर्मीय असं कधी वाटू लागले तर, ओबीसी आणि विरकोधक यांचा धर्म एक कसा ? असे प्रश्नचिन्ह उभे राहते..
हे पूजा करणारे. मंदिरातील पूजारी ओबीसी हिताबद्दल शेतकऱ्यांच्या हवांविषयी कधी बोलताना कुणालाही दिसणार नाही उलट, त्यांच्याजवळ जाणारा भाविक, अधिक अंधश्रद्धाळू कसा बनेल, त्यांच्या मस्तकात धर्मांधता, परधर्मद्वष कसा रुजवता येईल याची पद्धतशीर आखणी करण्यात हे वाकबगार. म्हणजे ओबीसी समूह जेवढा धर्माध - भोळसर राहील, मूढमती राहील तेवढे त्यांच्यासाठी बरे ! त्यांची कारस्थाने, मतलबीपणा, ओबीसींना उमजू शकणार नाही हा त्यामागील शुद्ध हेतू ! ओबीसीला धर्मशास्त्रानुसार शूद्र मानण्यात आल्याने हिंदुधर्मात चारही वर्णांचा विचार करता, चौथा वर्ण वरील तिन्ही वर्णापेक्षा नीच समजला गेला, त्यामुळे आजही ओबीसीच्या हिताला या वर्णधर्मबरहुकूम येणकेणप्रकारेन विरोध होतो, तो उच्चवर्णीयांनुसार, धर्मकर्म समजूनच, प्रत्येकानी आपल्या पायरीने वागावे' ही स्मृती - श्रुती ग्रंथांची शिकवण ओबीसींसाठी आजही कर्दनकाळ ठरत आहे. एवढी हीणकस गोष्ट ज्या जातिव्यवस्थेने निर्माण केली, ती जातिउतरंड शाबूत ठेवण्याचा आटापीटा करणाऱ्यांची भूमिका ओबीसींना समजली पाहिजे, तरच ओबीसींचा खरा धर्म समजू शकेल ?
ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणात कृषिआधारित कामावर उपजीविका करणारा वर्ग, श्रम-कष्ट करून इमाने-इतबारे एका दाण्याचे शेकडो दाणे निसर्गसाथीने तो उत्पन्न करणारा किमयागार त्याच्या अंगी हातचलाखी, लांडी-लबाडी जराही नाही. तो ज्या अन्नधान्याचे उत्पादन करतो त्यामुळे अखिल समाजाचे पोषण होते, मात्र त्याच्या सुरक्षेची हमी राहिलेली नाही. व्यापारी - दलालांमुळे शेतकऱ्याच्या अतोनात शोषणाची व्यवस्था बळकट केली आहे. वर्षभर शेतीत राबून अखेर त्यांच्या हातात काय पडते हे त्यालाच विचारलेले बरे! बाजारपेठांमध्ये होणारे शोषण सामाजिक कलंक आहे. बड़े व्यापारी एकीकडे मोठ्या दानधर्माचे देखावे करून, तो पापमुक्तीचा मार्ग समजतात, आणि दुसरीकडे आपल्याच कष्टकरी बांधवांचे अमानवीय पद्धतीने शोषण करतात. ओबीसी - कष्टकरी - शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण करणारे हे त्याचे धर्मबांधव आहेत का? शोषितांचा आणि शोषकांचा धर्म एक कसा ?
शेतीचा तुकडा नाही, हक्काचे घर नाही, उपजीविकेचे साधन नाही, पाल टाकून भटकत-फिरणारे, अर्थात विमुक्त भटके, यांचे तांडेच्या तांडे दिसतात. शिक्षणापासून हजारो वर्षे दूर ठेवलेले हे जनसमूह, आर्थिक सामाजिक-सांस्कृतिक दृष्ट्याही अतिशय मागास असलेले. डोक्यावर छप्पर नाही, कसण्यासाठी जमिनीचा तुकडा नाही, पोट भरण्यासाठी काय करत असतील हे हिंदुजन ? किती मोठा लोकसंख्येचा घटक अजूनही उपेक्षित असलेला. कोणत्या धर्माचा असेल तो ? त्यांची गणना हिंद म्हणूनच होते ना ? मग त्यांची ही परवड धर्मबांधवांना कशी काय बघवत असते ?
ओबीसी - विमुक्त भटके हा जनसमूह हिंदू लोकसंख्येचा मोठा भाग धार्मिक - सांस्कृतिक शोषणाचा बळी ठरलेला. त्यांच्या उत्थानासाठी शैक्षणिक आरक्षण, नोकरीतील आरक्षणाची तरतूद खूप महत्त्वपूर्ण असून त्याला विरोध करून या समाजाला सातत्याने आपल्या पंजाखाली दाबून ठेवण्यासाठी या देशातील व्यवस्था जद्दोजहद करत आलेली आहे. त्यासाठी धर्म आणि देवाचा आधार घेऊन मानवी हक्काची पायमल्ली होऊन बंधुभावाचे तत्त्व जाणीवपूर्वक पायदळी तुडवले जाते. या तमाम बाबींचा ओबीसी विमुक्त भटके यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा लागेल. कारण आमचा धर्म जर एकच आहे. तर तो धर्मच शोषणावर विषमतेवर आधारित असेल आणि बंधुभावाचा त्याग करणारा असेल तर असा धर्म शोषकाच्या हिताचा आणि ओबीसी अहिताचा असू शकेल ? मग ओबीसी आणि विरोधकाचा धर्म एक कसा ?
- अनुज हुलके, ९४०३२६७७११
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan